दिशाभूल करण्याचा सर्वपक्षीय खेळ..!

file photo
file photo

निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का, याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच; परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत आहेत. दिशाभूल करण्याचा हा सर्वपक्षीय खेळ असाच चालू राहणार काय?

नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे एक सुंदर, मनोहारी स्वप्न दाखवले आणि आम आदमी त्यावर पुरता भाळून गेला. त्याने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकली आणि मोदी यांचे राज्यारोहण सुलभ होऊन गेले. ‘बस हो गई महंगाई की मार; अब की बार मोदी सरकार!’ अशा घोषणा त्याला आकर्षित करू लागल्या आणि आता मोदी यांचे राज्य येऊन चार वर्षे उलटली, तरी सर्वसामान्यांचे ते स्वप्न काही प्रत्यक्षात उतरायला तयार नाही.

या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वस्तुस्थिती काय होती, ते स्पष्टपणे सांगून टाकल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कायमच मोकळ्या-ढाकळ्या आणि दिलखुलास पद्धतीने बोलणाऱ्या गडकरी यांनी ‘आम्ही सत्तेवर येऊ, अशी काही आम्हाला खात्री नव्हती... त्यामुळे निवडणूक प्रचारात भरमसाट आश्‍वासने दिली जात होती...’ अशा आशयाचे विधान केले.

विरोधात असताना चंद्र आणून देण्याची ग्वाही देणेच काय ते बाकी असते आणि सत्तेत आल्यानंतर मात्र वास्तवाचे भान येते, ही आपल्याकडची एकंदर रीत आहे. त्याची कबुली दिली गेली, एवढाच काय तो फरक. पण त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत आले. गडकरींच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीने ‘सही फरमाया! जनता भी यही सोचती है की सरकारने लोगों के सपने और उनके भरोसे का अपने लोभ का शिकार बनाया है!’ असे ट्विट केले आणि त्यामुळे गडकरी यांना त्यावर खुलासा करणे भाग पडले आहे. ‘राहुल यांना मराठी समजते काय?’ असा सवाल गडकरी यांनी विचारला आहे आणि आपण कोणाचेही नाव घेतले नव्हते, असे स्पष्ट केले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी दिलेली वारेमाप आश्‍वासने आता त्यांच्या अंगाशी येऊ लागली आहेत. ‘परदेशातून काळा पैसा परत आणू आणि प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५-१५ लाख जमा करू!’ या भाजपने प्रचारात दाखवलेल्या स्वप्नावरून आता असेच वादळ उठले आहे आणि मोदी यांनी तसे विधान प्रचारात कधीही केले नव्हते, असे भाजपची मंडळी सांगू लागली आहेत. खरे तर तो एक ‘चुनावी जुमला था!’ असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या वर्षीच सांगून टाकले होते आणि तेव्हाही वादळ उठले होते. त्या वेळी मग ‘प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख जमा करू, याचा अर्थ त्यांचे जीवन सुखावह करू,’ असे स्पष्टीकरण देणे भाजप नेत्यांना भाग पडले होते. ‘देशातील सव्वाशे कोटी लोकांना रोजगार देणे शक्‍य नाही,’ असे आणखी एक विधान शहा यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तेही आता असेच अंगाशी येऊ पाहत आहे; कारण रोजगारनिर्मितीत मोठी वाढ करण्याचे आश्‍वासनही याच नेत्यांनी प्रचारात दिले होते.

अर्थात, भाजपवर अशी आश्‍वासने अंगाशी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रात १९९५ मधील निवडणूक प्रचारात गोपीनाथ मुंडे यांनी ‘दाऊदला फरफटत आणू आणि एन्‍रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू!’ अशी आश्‍वासने दिली होती. त्यापैकी समुद्रात बुडवलेला ‘एन्‍रॉन प्रकल्प’ अमृतमंथन करून बाहेर काढण्यात आला आणि दाऊदला फरफटत तर सोडाच, अन्य कोणत्याही मार्गाने भारतात आणण्याचे आश्‍वासन हे त्यानंतर दोन दशकांनी केंद्रात भाजपचे ‘५६ इंची छातीचे’ सरकार येऊन चार वर्षे झाली, तरी त्याची ‘पूर्ती’ होऊ शकलेली नाही, हे किमान गडकरी यांना तरी आठवत असेलच! आता आपल्या खुलाशात गडकरी हे काही जुन्या गोष्टी सांगू पाहत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘टोल’ माफ करण्याचे आश्‍वासन देण्याचा विचार फडणवीस करत होते. मात्र, ते कठीण असल्याने आपण त्यांना त्यापासून परावृत्त केले, असे सांगतानाच ते आश्‍वासन (न दिलेले!) पूर्ण केल्याबद्दल त्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. वास्तविक मुख्य मार्गांवरचे टोल सुरू आहेत आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरचा टोल तर २०३० पर्यंत सुरू राहणार, असे आता सरकारनेच स्पष्ट केले आहे! अर्थात, गडकरी यांनी आपल्या खात्यामार्फत दिलेली काही आश्‍वासने पूर्ण केली असली, तरी त्यांनी टोलमाफी केल्याबद्दल फडणवीस यांना दिलेली शाबासकी अनाठायी आहे. अर्थात, तोही ‘चुनावी जुमला’ असू शकतोच! एकुणात काय हा सारा बनवाबनवीचाच खेळ आहे आणि त्यात कोणताही पक्ष मागे राहत नसतो. गडकरी मात्र खरे बोलून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com