भाषा संपन्न करणारे बोलीभाषांचे झरे

Language
Language

गेल्या शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांत "निवडप्रधान श्रेयांकन पद्धती'चा अवलंब करणारे विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ म्हणावे लागेल. मुंबई विद्यापीठाचा हा निर्णय अभिनंदनीय आहे.
कोणत्याही भाषेसाठी निवडप्रधान श्रेयांकन पद्धती अवलंबणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे. कारण, भाषेचा अवकाश खूप व्यापक असतो. तिच्या पोटात अनेक बोली दडलेल्या असतात आणि संस्कृतीचे झरे तिच्यातून सुप्त वा गुप्तपणे वाहत असतात, ते त्यातून लुप्त होऊच शकत नाहीत. कला शाखेच्या द्वितीय वर्षातील अभ्यासपत्रिका क्रमांक 3मध्ये मराठीच्या तीन बोली; मालवणी, आगरी आणि वाडवळी यांचा समावेश करण्यात आला आहे. मराठीच्या बोलींची संख्या फार मोठी आहे. या विविध बोलींमुळेच मराठीची प्रमाणभाषा समृद्ध झालेली आहे.

जागतिकीकरणोत्तर पंचवीस वर्षांनी सामाजिक- सांस्कृतिक बदलाचे अनुभव आपण घेतो आहोत. संपर्काची साधने वाढली आहेत; पण संवाद हरवला आहे. जो तो पोटाची भाषा बोलतोय. पण पोटातली भाषा बोलत नाहीये. पोटाची भाषा बोलायला संकोच वाटत नाहीये; पण पोटातली भाषा ओठावर आली, की काहींना अवघे विश्‍वच आक्रसून गेल्यासारखे वाटते.

कोणतीही बोली वा भाषा शुद्ध वा अशुद्ध नसते. "ती फुलराणी' नाटकातील सर्वश्रुत उदाहरण, "व्हतं' म्हणणारी फुलराणी आणि प्रमाण मराठीतील "नव्हतं' हा शब्द शुद्ध कसा, या संभ्रमात पडलेला मराठीचा प्राध्यापक. किंवा "हिकडं-तिकडं' असं "अशुद्ध' बोलणाऱ्या भाषेत "कड' म्हणजे बाजू - मग ही-कड आणि ती-कड हे शब्द "प्रमाण' मराठीत कसे, याचा उलगडा होऊ शकेल. बा. भ. बोरकर जेव्हा प्रमाण मराठीत "सुशेगात' हा पोर्तुगीज शब्द वापरतात. किंवा "घनात कुंकुम! खिरते गं' असं कवितेत म्हणतात, तेव्हा खिरणे म्हणजे शिरणे - आत घुसणे. तेव्हा ते बोलीतील शब्दांना प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. रा. भि. जोशी जेव्हा "थोडं मयेचं' असा वाडवळीतील शब्दवापर आपल्या लेखात करतात, तेव्हा प्रमाण मराठीतील प्रसन्नता लक्ष वेधून घेते.

"बोली'त तर लिंगभेदही मावळलेले दिसतात. ती लेक - तो लेक (मुलगा आणि मुलीलाही उद्देशून), तो पोर - ती पोर (तरुण- तरुणीला उद्देशून) असा शब्दवापर आजही प्रचलित आहे. खरे तर, बोली म्हणजे छोटे- छोटे झरे आहेत, जमिनीवरून व जमिनीखालून वाहणारे. आज भाषेत काही ओल आणि ताजेपणा राहिला असेल, तर तो बोलींच्या झऱ्या-झिऱ्यांमुळे! नद्या- नाले जसे समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे बोलींचे झरे, नद्या, प्रवाह प्रमाणभाषेच्या समुद्राला जाऊन मिळतात. पाब्लो नेरूंदा एका कवितेत म्हणतात; साऱ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात; पण तरीही समुद्राचे पाणी खारट कसे?, असाच प्रश्‍न प्रमाणभाषेतील तोचतोचपणा आणि रुक्षता टाळण्यासाठी बोलींचा गोडवा मध्ये मध्ये पेरला, तर त्याची लज्जत, त्याचा स्वाद अधिक आस्वादनयोग्य होतो.

लोकसाहित्य आणि बोलीतील साहित्य, उदाहरणार्थ रा. रं. बोराडेंची "पाचोळा', आनंद यादवांची "गोतावळा', उद्धव शेळकेंची "धग' या कादंबऱ्यांचा बी.ए., एम.ए.च्या अभ्यासक्रमात खूप वर्षांआधीच अंतर्भाव झालेला आहे. दलित साहित्यातील आत्मकथनात लक्ष्मण गायकवाडांच्या "उचल्या'चा संदर्भ देऊन म्हणता येईल, की लक्ष्मण गायकवाड "उचल्या'च्या प्रकाशनावेळी म्हणाले होते; "आतापर्यंत आम्ही तुमच्या भाषेत शिकलो. आता तुम्ही आमच्या भाषेत शिका.' तथापि, येथे एकेक कलाकृती अभ्यासक्रमात होती.

संतसाहित्य तत्कालीन यादवकालीन बोलीतच आहे. महानुभाव साहित्यातील बोलीभाषेची स्वभावसुंदर लय, दुडकी वाक्‍यरचना, प्रसन्नतेचा शिडकावा करण्याच्या गोष्टी, कोण विसरू शकेल?

आज अनेक बोलींचा अभ्यास होतोय, त्यावर संशोधन होतेय. 2009-10 च्या काळात, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, त्याची अंमलबजावणीही होऊ लागली होती. त्यात लोकसाहित्य आणि बोलीभाषेसाठी अध्यासन स्थापन करण्याची आणि संशोधनासाठी प्राधान्य देण्याची योजना मांडलेली आहे. त्यानुसार "बालभारती'च्या अभ्यासक्रमात बोलीतील साहित्य, लोकगीते यांचा समावेश करण्यात आलेला आहे. उच्चमाध्यमिक पाठ्यपुस्तकांत वऱ्हाडी- अहिराणी बोलींनाही स्थान मिळालेले आहे. बोलीतील लयबद्धता विद्यार्थी चटकन आत्मसात करतात. अभ्यासक्रमात बोली आल्यामुळे हरवलेला आपलेपणा पुन्हा गवसेल असे वाटते आणि विद्यार्थ्यांचा ओढा भाषांकडे होईल, यात शंका नाही. बदलत्या काळानुसार बोलीभाषांचे महत्त्व ओळखून अभ्यासक्रमात स्थान दिल्याने प्रमाणभाषेचा उद्‌गम आणि विकास, किंबहुना आपले पूर्वज, महाराष्ट्राचे लोकमानस समजून घेण्यासाठी, "माणूस' म्हणून समजून घेण्याची आपली आकलनक्षमता वाढीस लागण्यासाठीही साह्यभूत ठरेल.
प्रमाणभाषा मराठीला असलेले प्राधान्य आता हळूहळू कमी होऊ लागले आहे. याचा अर्थ प्रमाणभाषा माध्यम म्हणून आवश्‍यक आहेच आणि ती व्याकरणिक नियमानुसार असली पाहिजे हेही मान्य; पण त्यामुळे बोलीभाषांचे महत्त्व कमी होत नाही. एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते, की इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी घरी आणि अन्यत्र वावरताना आपली बोली/ मातृभाषा बोलताना दिसतात. मातृभाषा वा बोलीभाषेतील सुंदरता, सौकुमार्य आपल्या हृदयाला स्पर्श करणारे आणि आनंदाचा सडा पसरविणारे असते.

अभ्यासक्रमात "बोली' ही पत्रिकाच लावल्यामुळे आणि मालवणी, आगरी आणि वाडवळी या पालघर जिल्हा, पनवेल, कोकण विभाग या परिसरातील बोलींचा समावेश केल्यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. याचा अर्थच असा, की ग्रामीण आणि तळागाळातील जनमानस उच्चशिक्षणक्षेत्रात अभ्यासक्रमात आल्यामुळे शहरी वातावरणाला ते समजून घेणे सुलभ होईल. आजच्या काळात असा झिरपा होणे अत्यंत गरजेचे आहे. मराठी भाषकांसाठी "बोली'विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचाही मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com