वैचारिक आरोग्यासाठी...

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

युक्तिवाद म्हणजे फक्त वादविवादात वापरण्याचे बौद्धिक साधन नाही. जेव्हा "आपुलाचि वाद आपणासी' होतो, तेव्हाही युक्तिवाद उपयोगात आणावे लागतात

नुकतेच मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मनाचे आजार, त्यावरचे उपचार याबद्दलच्या जाणीव जागृतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी हाती घेतले गेले. शरीराला निरोगी राखण्याची गरज खूप पूर्वीपासूनच माणसाच्या लक्षात आली आहे. आजकाल अनेक कारणांनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवणाऱ्यांची संख्या वाढीला लागली आहे. सुदृढ शरीरात सुदृढ मन असते, हे आपण खूप वर्षे ऐकले आहे. आज आपल्याला हेही माहीत आहे, की मनाचे रोग हे शारीरिक रोगांनाही निमंत्रण देतात. वैद्यकशास्त्रात अशा आजारांना मनोकायिक म्हटले जाते. माणसाच्या आयुष्यात शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बुद्धीच्या आरोग्याचा, सुदृढतेचाही विचार व्हायला हवा. जी बौद्धिक क्षमता घेऊन व्यक्ती जन्माला येते, त्या क्षमतेचा जास्तीत जास्त विकास घडवून आणण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जायला हवेत. बुद्धी अविकसित राहण्याने विचारशक्ती कमकुवत होते आणि या सगळ्यांचा परिणाम भावनिक परिपक्वतेवर, आचारांवर म्हणजे खरे तर एकूण जगण्यावरच होतो.

माणूस हा एक विलक्षण प्राणी आहे. सर्वसाधारण माणसे ज्या क्रिया जन्मजात सहजतेने करतात, त्यांचाही सखोल अभ्यास करून त्याच क्रिया पूर्ण क्षमतेने करण्याची योग्य पद्धत कोणती हे शोधून काढणारी शास्त्रे तो निर्माण करतो. मग ती अन्नग्रहणाची क्रिया असो, अन्न शिजवण्याची कृती असो, क्रीडा असो वा कला, प्रत्येक क्रियेला शास्त्रीय बैठक देता येते. योग्य प्रकारे विचार कसा करावा, याचा अभ्यास करणारे तर्कशास्त्र हे असेच एक शास्त्र आहे. तर्कशास्त्र ही तत्त्वज्ञान या विषयाची एक शाखा आहे. रोजच्या जीवनात तर्क करणे याचा अर्थ आपण अंदाज करणे असा करतो. काही वेळा हे अंदाज काही पूर्वानुभवावर, माहितीवर आधारित असतात, पण काही वेळा मात्र कुठलाच शेंडा-बुडखा नसलेले, निव्वळ "ठोकून दिलेले' असतात. तर्कशास्त्राला मात्र बिनबुडाच्या अंदाजांमध्ये स्वारस्य नसते. विचारशक्तीचा वापर करून उपलब्ध माहितीच्या आधारे योग्य निष्कर्ष कसे काढावेत, याचा अभ्यास तर्कशास्त्र करते. निष्कर्ष काढण्याच्या तर्कावर (म्हणजे एकाअर्थी बुद्धीवर) आधारित या प्रक्रियेला युक्तिवाद असे म्हणतात. युक्तिवाद म्हणजे फक्त वादविवादात वापरण्याचे बौद्धिक साधन नाही. जेव्हा "आपुलाचि वाद आपणासी' होतो, तेव्हाही युक्तिवाद उपयोगात आणावे लागतात. युक्तिवादांचे मुख्य कार्य उपलब्ध माहितीची सुसंगत मांडणी करून त्यातून कोणता निष्कर्ष निघतो हे ठरवण्याचे असते. कुठल्या प्रकारे केलेली मांडणी योग्य असते, मांडणी करताना कुठल्या प्रकारच्या चुका होऊ शकतात, या संबंधीचे मार्गदर्शन तर्कशास्त्र करते. त्यामुळेच तर्कशास्त्राचा अभ्यास कुठल्याही विषयासाठी महत्त्वाचा असतो. एवढेच नव्हे, तर दैनंदिन जीवनातही आपल्या विचारपद्धतीतील दोष काढून तिचे आरोग्य सांभाळण्याचे कार्य तर्कशास्त्र करू शकते.

Web Title: enriching thought process