पर्यावरणबदलांच्या धोक्‍याच्या पाऊलखुणा

- डॉ. रामचंद्र नऱ्हे (पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक)
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. पॅरिस करारनाम्यातील वचने पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे.

‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. पॅरिस करारनाम्यातील वचने पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे.

मागील काही दशकांत भूतलावरील आणि त्याचबरोबर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारणपणे १ अंश सेंटिग्रेडमध्ये वाढले आहे. या तापमानवाढीने पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील प्रत्येक जिवाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
मागील काही शतकांतील मोठ्या प्रमाणातील जीवाश्‍म इंधनाच्या ज्वलनाने आणि अलीकडच्या मोठ्या प्रमाणातील जंगलांच्या ऱ्हासामुळे वातावरणातील कार्बन मोनोऑक्‍साइड, कार्बन डायऑक्‍साइड, मिथेन अशा हरितगृह वायूंच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणातील एकंदरीत रासायनिक घटकांचे एकूण प्रमाण बदलून गेले आहे. इतकेच नाही, तर समुद्रांचे खाऱ्या आणि भूतलावरील व भूगर्भातील गोड्या पाण्यातसुद्धा आता मोठा रासायनिक बदल झाला आहे. वातावरणातील तापमानवाढीने ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक घटनांचा काळ, वेळ आणि परिणाम यांचा एकंदरीत समतोल बिघडला आहे. पर्यावरणबदलांचा सजीवसृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत आतापर्यंत ३०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय जागतिक पातळीवरच्या अनेक नामांकित संस्थांनी अहवाल प्रसिद्ध केले आहेत. या सर्वांच्या निष्कर्षांचा बारकाईने विचार केला पाहिजे.

नोव्हेंबर २०१६ च्या ‘सायन्स’ या नियतकालिकात ’The broad footprint of climate change from genes to biome to people’ हा डोळ्यांत अंजन घालणारा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. जगातील १९ विद्यापीठांनी आणि संशोधन संस्थांनी यात वाटा उचलला आहे.सजीवसृष्टीच्या साखळी प्रणालीतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा एकूण ९४ प्रक्रिया (३४ भूपृष्टावरील, ३१ खाऱ्या पाण्यातील आणि ३१ गोड्या पाण्यातील) पैकी ८२ टक्के म्हणजे ७८ प्रक्रियांवर पर्यावरणबदलांचे दुष्परिणाम झाले आहेत. सजीव सृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्र पर्यावरणबदलांना सामोरे जाताना शरीररचनेत उत्क्रांतीच्या हेतून जनुकीय पातळीवर बदल घडवून आणत आहेत.

तापमानवाढीला अनुकूल ठरेल या उद्देशाने प्राणिमात्रांच्या शरीराचे आकारमान आता आंकुचनाकडे झुकत चालले आहे. याशिवाय पक्ष्यांच्या पंखांच्या आकारात व रचनेतही बदल घडून येत आहेत. जास्त तापमानाला अनुकूल ठरेल अशा बदलांमध्ये प्रामुख्याने सजीवांची जीवनप्रणाली, त्याचे संख्याप्रमाण, लैंगिक प्रमाण, जातीनुसार विभागणी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. समशीतोष्ण कटिबंधातील वनस्पती आपल्या जीवनचक्रात मोठे बदल घडवून आणत आहेत. वनस्पतींना वसंत ऋतूत येणारे बहर, आता शरद ऋतुमध्ये येताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे गोड्या व खाऱ्या पाण्यातील माशांच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतील काळात वाढत्या तापमानानुसार मोठे बदल होत आहेत. तर भूपृष्टावरील प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या ऋतुमानानुसार पूर्वी होणारे स्थलांतर आता वेगळ्याच काळात दिसून येत आहे.

समशीतोष्ण/शीत कटिबंधीय वातावरणात आढळणाऱ्या सजीवांच्या संख्येत आणि वयानुसारच्या संख्या श्रेणीच्या विभागणीत अनुक्रमे वाढ/घट आहे. त्याचप्रमाणे पशू-पक्ष्यांच्या जातींनुसार पुनर्विभागणी झाली आहे. आता वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांच्या जातींमध्ये नव्यानेच संवाद प्रक्रिया उदयास येत आहेत. दऱ्या-खोऱ्यांतील आणि सखल भागातील पशू-पक्ष्यांमध्ये तापमानवाढीला अनुसरून एकमेकांत सहकार्याची भावना वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. पिकांच्या प्रकारातील जनुकीय विविधता कमी होत चाललेली आहे. अन्नधान्य उत्पादनतील चढ-उतार, मत्स्य आणि फलोत्पादनात घट होत आहे. अशा अनेक गोष्टींमुळे मानवाची ‘अन्नसुरक्षा’ धोक्यात येऊ शकते. शिवाय तापमानवाढीमुळे नव्यानेच अस्तित्व दाखवणारे इबोलासारखे महाभयंकर रोग, पिकांवरील हल्ला करणारे नवीन प्रकारचे कृमी कीटक अशा अनेक गोष्टी मानवाचे आणि त्याचबरोबर पशू-पक्षी आणि वनस्पतींचे आरोग्य धोक्‍यात आणू शकते.  एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे, की मानवजातीचे अस्तित्व हे निसर्गातील अतिसूक्ष्म जिवांपासून ते महाकाय सजीवांच्या नैसर्गिक जीवन प्रणालीवलच अवलंबून आहे. त्याचबरोबर जीवसृष्टीतील (जमिनीवरील किंवा पाण्यातील) जीवनसाखळ्या या मानवजातीसाठी फक्त वाढत्या तापमानवाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नाहीत, तर त्या स्थानिक पातळीवर वातावरणबदलांच्या दृष्टिकोनातून एक दुवा म्हणूनही महत्त्वाच्या आहेत. शिवाय जैवविविधता अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना असाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच पर्यावरणबदलाच्या या धोक्‍याच्या पाऊलखुणांद्वारे दिलेला इशारा दुर्लक्षून चालणार नाही. 

राष्ट्रसंघाच्या पर्यावरणबदलाच्या आराखडा समिती आणि २०१६ च्या पॅरिसच्या कॉप २१ करारानुसार वाढत्या तापमानवाढीला सौम्य करण्यासाठी कोणत्या कोणत्या सुयोग्य आणि निर्णायक उपाययोजना करता येतील हे पाहिले पाहिजे. मानव जातीला या बदलांमुळे कमीत कमी दुष्परिणाम भोगावे लागले पाहिजेत, असे जर वाटत असेल तर संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या ‘सहस्रक उद्दिष्टे’ आणि ‘शाश्‍वत विकासांच्या उद्दिष्टांनां’ युद्धपातळीवर लागू केले पाहिजे. ‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक देशाच्या सरकारांकडून पॅरिस करारनाम्यातील आपल्या वचनांवर ठाम राहून ‘करून दाखवले’ हेच अपेक्षित आहे. नाही तर इशारा मिळूनही दुर्लक्ष केल्यामुळे ‘जे घडू नये ते घडले’ अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: environment changes risk footprints