राजकीय कौल आणि पर्यावरणीय जाणीव

राजकीय कौल आणि पर्यावरणीय जाणीव

नैसर्गिक वनांनी समृद्ध पर्वतरांगा, टेकड्या, जैवविविधता, असंख्य नद्या, पश्‍चिमेकडील ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्याच्याकाठावरील तिवरांची जंगले हे महाराष्ट्रातील पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचल्यास राज्यातील पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत या घटकांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच मुंबईतील आरे असो किंवा पुण्यातील टेकड्या अबाधित राहणे महत्त्वाचे आहे. पण आज विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगल आणि वृक्षतोड सुरू आहे, टेकड्याफोड सुरू आहे. त्यामुळे जैवविविधतेचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संतुलन झपाट्याने बिघडत चालले आहे. अवकाळी पाऊस, महापूर, दुष्काळ, गारपीट, वादळे, भूस्खलन, पाणीटंचाई, हवामानबदल, तापमानात वाढ अशा अनेक गंभीर नैसर्गिक संकटांमुळे जनतेचे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आजही निम्मा महाराष्ट्र तहानलेला आहे. गेले दोन- तीन वर्षे इतका पाऊस होऊनसुद्धा काही ठिकाणी अद्याप टॅंकर सुरूच आहेत. राज्यात कचरा व्यवस्थापन हा पर्यावरणाचा सगळ्यांत गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय झाला आहे. नागपूर शहरातसुद्धा भांडेवाडी कचरा डेपो गैरव्यवस्थापनामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी जाहीर झाली, पण तरीही प्लॅस्टिक उत्पादन सुरूच आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये तुंबलेली गटारयंत्रणा अनेक पर्यावरण समस्यांना जन्म देत आहे. शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांना गटाराचे स्वरूप आले आहे, या नद्यांमध्ये अनियंत्रितपणे सांडपाणी सोडण्यात येत आहे. परिणामी अनेक नद्या मृत झाल्या आहेत. नद्यांच्या परिसरातील जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. तुंबलेल्या मृत पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार फैलावत आहेत. मोठ्या प्रमाणात वातावरण दूषित करणाऱ्या आणि हवा प्रदूषित करणाऱ्या उद्योगांना परवानगी दिल्यामुळे अनेक ठिकाणी हवा आणि पाण्याचे प्रदूषण जीवघेणे ठरत आहे. राज्यातील भूजल साठा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाला आहे.  अनियंत्रित पाणीउपसा, बेकायदा बोअरवेल, विहिरी संवर्धनाकडे दुर्लक्ष, तसेच नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर करत आपण पर्यावरणात अनेक बदल केले; ते विनाशकारी ठरत आहेत. त्यामुळे भविष्यातील मानवी पिढ्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे.

समुद्रकिनाऱ्यांवरही वाढते प्रदूषण 
गोवा, महाराष्ट्र व गुजरातमधील समुद्रकिनारे पर्यटनाच्या नावाखाली अतिक्रमित केले जात आहेत. पर्ससिन-नेट मासेमारीवर जगात बहुसंख्य ठिकाणी बंदी आहे, तरीही समुद्री जीवन उद्‌ध्वस्त करणारी ही मासेमारी महाराष्ट्रात सुरूच आहे. परंपरागत मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे मच्छीमार यामुळे चिंतेत आहेत. वेळीच हा प्रकार थांबला नाही तर कदाचित शेतकरी आत्महत्यांप्रमाणे परंपरागत मासेमारी करणारे आत्महत्या करण्याचा धोका आहे. समुद्राचे प्रदूषण कमी करण्याबाबत सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. तिवरांच्या जंगलाची आजही बेसुमार तोड होत आहे. जगभर बंदी असलेली २२ पैकी जवळपास १८  कीटकनाशके अजूनही राज्यात वापरली जात आहेत. वाळू परवाने मिळविण्यासाठी होणारा भ्रष्टाचार व हिंसाचार दहशत निर्माण करणारा आहे. पाणथळ जागांवर होणारे अतिक्रमण ही तितकीच चिंतेची बाब आहे. अवैध खाण उद्योग फोफावत आहे. वाढलेल्या भूस्खलनाच्या घटना राज्यातील पर्यावरणाची स्थिती गंभीर असल्याचे द्योतक आहे.

पर्यावरण सुव्यवस्थापनाची गरज
पर्यावरण सुव्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात संसाधनांचा विचारपूर्वक वापर करण्याचे तंत्र वापरले जाते. भविष्यात मानवी समाजाच्या कल्याणासाठी परिसंस्थांचे रक्षण करणे व परिसंस्थांतील अखंडत्व राखणे हे पर्यावरण व्यवस्थापनाचे ध्येय आहे. जैवविविधतेचे संरक्षण व परीरक्षण करणे हे कायमस्वरूपी काम आहे. बदलत्या वातावरणाविषयीचे धोरण आखताना जागतिक समुदायाला भारत खलनायक वाटता कामा नये. दुसरी बाब म्हणजे सर्वच राजकीय पक्ष लोकांना विकासाची भव्य, पण खोटी स्वप्ने दाखवत आहेत. आकडेवारीची चिकित्सा करणाऱ्यांना विकासाचे शत्रू मानले जात आहे. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना निसर्ग ओरबडला जाणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. अशावेळी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी संबंधित संस्था- संघटनांची आणि पर्यावरणप्रेमींची अभेद्य फळी निर्माण करण्याचे मोठे आव्हान आज आपल्यासमोर आहे. ते आपण किती यशस्वीपणे पेलतो यावरच शाश्वत विकासाच्या रथाची वाटचाल अवलंबून आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत मतदारांची जबाबदारी कधी नव्हे इतकी वाढली आहे. भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी पर्यावरण शहाणीव असलेल्या उमेदवारांना पाठबळ देणे आवश्‍यक आहे आणि मतदारराजा आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडेल अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com