सत्कार्याचा वसा (पहाटपावलं)

विनय पत्राळे
सोमवार, 24 जुलै 2017

काही वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये शाळा चालविणाऱ्या संस्थेने असाच एक उपक्रम केला. एका घरून जुनी साडी मागायची. त्या साडीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सहा पिशव्या शिवायच्या. त्यातील एक त्या साडीच्या मालकिणीला भेट द्यायची व 'भाजीसाठी जाताना ही पिशवी घेऊन जा,' असे आवाहन करायचे.

नाशिकला 'संक्रमण' नावाचा युवक- युवतींचा ग्रुप आहे. पर्यावरणाविषयी संवेदना असणारी, समाजकार्याची आवड असणारी ही मंडळी प्रतिवर्षी उन्हाळ्याची सुटी सुरू होण्यापूर्वी वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी शाळाशाळांतून फिरतात. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना त्यांच्या वह्या देण्याचे आवाहन करतात. प्रत्येक वहीत शेवटची 15-20 पाने कोरी असतात. ती पाने वेगळी करून ते त्यांच्या नवीन वह्या तयार करतात. गोदावरीच्या किनाऱ्यावरील झोपडपट्टीत कुणी गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थी असेल, तर त्याला या वह्या दिल्या जातात. पर्यावरणाचे जतन, गरिबांना मदत व आपल्यासाठी एक चांगले काम असे सर्व त्यातून होते. 

काही वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये शाळा चालविणाऱ्या संस्थेने असाच एक उपक्रम केला. एका घरून जुनी साडी मागायची. त्या साडीच्या वेगवेगळ्या आकाराच्या सहा पिशव्या शिवायच्या. त्यातील एक त्या साडीच्या मालकिणीला भेट द्यायची व 'भाजीसाठी जाताना ही पिशवी घेऊन जा,' असे आवाहन करायचे. उर्वरित पिशव्या एक रुपये प्रति पिशवी घेऊन विकायच्या व लोकांना 'भाजी घेण्यासाठी रिकाम्या हाताने जाऊ नका. झबला प्लॅस्टिक पिशवीत भाजी आणू नका, घरून पिशवी घेऊन जा,' असे आवाहन करायचे. किती लहानशी गोष्ट, पण किती उपयोगी. 

मंगळूरला केम्पैया नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले, की त्यांनी रोज सायंकाळी दोन तास वाहतूक पोलिसांना मदत करावी. विशेषतः ऑफिस सुटण्याच्या वेळी रस्त्यांवर चौकामध्ये खूप गर्दी होते. इंधनाचे नुकसान, पर्यावरणाचे नुकसान, वेळेचे नुकसान... उपाय काय? सेवानिवृत्तांनी कसलीही अपेक्षा न ठेवता स्वेच्छेने वाहतूक पोलिसांना मदत करणे, हा उपाय! दीडशे लोकांनी यासाठी नावे नोंदविली. त्यासाठी प्रशिक्षण घेतले. रिफ्लेक्‍टर बॅंड्‌स असलेले कपडे विकत घेतले. त्यांच्यामुळे वाहतूक पोलिसांना मदत झाली नि लोकांचीही सोय झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवृत्त लोकांना काम मिळाले. नुसते घरी बसून राजकारणावर मते व्यक्त करण्यापेक्षा किंवा समस्यांची चर्चा करण्यापेक्षा एखाद्या निराकरणाचा भाग होण्याचे समाधान त्यांना मिळाले. 

कोल्हापूरच्या भावे काकांनी गरीब महिलांना अथर्वशीर्ष, गीतेचे अध्याय शिकवले. त्यांचे मंडळ तयार केले. कोठेही धार्मिक अनुष्ठान असेल, तेथे हे मंडळ कार्यक्रम करते. या श्‍लोकपठणामुळे मनावर चांगला परिणाम होतो, असा त्यांना अनुभव आला. त्यांनी कैद्यांना ते शिकविण्याचा प्रस्ताव जेलरपुढे मांडला. दोन- तीन कार्यक्रमांनंतर यामुळे कैद्यांची आपसांतील भांडणे, मारामारी, शिवीगाळ कमी होते, हे जेलरच्या ध्यानात आले. त्यांनी भावे काकांसाठी साप्ताहिक दिवस ठरवून दिला व त्यांच्या घरापासून नेण्या- आणण्यासाठी जीपची व्यवस्था केली. 

'मी काय करू,' 'मी एकटा काय करू' असा प्रश्‍न अनेकांना पडतो. काम आवडीचे व स्वभावाला रुचेल, असेही पाहिजे, तर त्यात आनंद असतो. पण शोधले की सापडते आणि कर्जाची रक्कम चुकती करताना आपणाला हलके झाल्याचा आनंद होतो, तसाच आनंद हे समाजाचे देणे चुकते करताना होत असतो. 

Web Title: esakal news sakal news article by vinay patrale