'महागठबंधना'चा बिहारी तिढा! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नितीशकुमार यांना 'मिस्टर क्‍लीन' ही आपली प्रतिमा व सरकारही टिकवायचे आहे आणि त्याच वेळी आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या हातातील 'हुकमाचे पान' आपणच आहोत, हा टेंभाही मिरवायचा आहे. 

भारतीय राजकारणात नैतिकतेच्या गप्पा सर्वच पक्षांचे नेते मारत असले, तरी आपण या सर्वांपेक्षा कसे चार अंगुळे वरून चालत आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी चालविला आहे. त्यामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधील पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतल्यावरही, सत्तारूढ 'महागठबंधना'त गेला महिना-दीड महिना उभा राहिलेला तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध यंत्रणांनी घातलेल्या छाप्यांमुळे नितीश यांना आपली नैतिकता आणि स्वच्छ चारित्र्य यांचा झेंडा फडकवण्याची संधी मिळाली. त्यातच उपमुख्यमंत्री, तसेच लालूप्रसादांचे चिरंजीव तेजस्वी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नितीश यांच्या 'मिस्टर क्‍लीन' या प्रतिमेवरच शिंतोडे उडाले आणि त्यांच्यापुढे तेजस्वी यांचा राजीनामा मागण्यावाचून पर्याय उरला नाही. लालूप्रसादांनी मात्र त्यास साफ नकार दिला आणि उलट 'केवळ राजकीय सूडबुद्धीने हे आरोप व कारवाई होत असल्याची' अपेक्षित मखलाशी त्यांनी केली! तेव्हाच या 'महागठबंधना'ची नौका आता डुबू घातली आहे, याची चिन्हे दिसू लागली होती.

बिहारमधील भाजप नेते तर तेव्हा ऐन आषाढात दिवाळी साजरी करण्याच्या बेतात होते आणि नितीश यांनी भाजपचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्यामुळे तर बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांच्या घरावर फक्‍त रोषणाईच बाकी होती. आता 'महागठबंधना'ची नौका कोणत्याही क्षणी बुडणार आणि बिहारात चार वर्षांनंतर पुनश्‍च नितीश-सुशीलकुमार यांचे सरकार येणार, असे मांडे मनातल्या मनात भाजपची नेतेमंडळी खात होती. मात्र, आता राहुल गांधी यांना जातीने साकडे घातल्यामुळे नितीश यांच्या दोन्ही दरडींवर पाय ठेवून स्वतःच्या स्वच्छ प्रतिमेचा झेंडा फडकवण्याचे पितळ उघडे पडले आहे. नितीश यांना एकाच वेळी आपले सरकारही वाचवायचे आहे आणि त्याच वेळी दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या हातातील 'हुकमाचे पान'ही आपणच आहोत, हा टेंभाही मिरवायचा आहे. बिहारमधील 'महागठबंधना'त निर्माण झालेल्या तिढ्यामागील खरे रहस्य हेच आहे. 

अर्थात, कॉंग्रेसपुढे विद्यमान राजकीय नेपथ्यात नितीश यांना शरण जाण्यावाचून पर्याय नाही. 'राहुल'नामक पानाची उतारी गेल्या अनेक निवडणुकांत करून झाली; मात्र एकही हात पदरी पाडून घेता आलेला नाही, हे खरे तर कॉंग्रेसच्या केव्हाच ध्यानात आले होते. त्यामुळेच 2015मधील बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमारांचे संयुक्त जनता दल, लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल यांच्या 'महागठबंधना'त कॉंग्रेस सामील झाली. या 'महागठबंधना'ने नरेंद्र मोदी यांच्या अश्‍वमेधाच्या घोड्यास लगाम घालत बिहारची सत्ता प्रचंड बहुमताने काबीज केली, तेव्हा सत्तेसाठी एकत्र आलेले नितीश आणि लालूप्रसाद यांचा दोस्ताना किती काळ कायम राहणार, याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर झालेल्या उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत मात्र अशाच 'महागठबंधना'चा प्रयोग फसला आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष व राहुल गांधी यांचे एकत्रित आव्हान फुसके ठरवत मोदी लाटेचे तुफान उसळले. त्यानंतर बिहारमधील या 'गठबंधना'त कोलदांडा घालण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले होते. लालूप्रसादांच्या कुटुंबीयांवरील छाप्यांमुळे त्या प्रयत्नांना आपोआपच गती मिळाली आणि बिहारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजेच नितीश-तेजस्वी यांच्यातील संवादच संपुष्टात आला. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणून तेजस्वी यांनी नितीश यांची भेट घेऊन, त्यांच्यापुढे आपली बाजू मांडली तरी तिढा कायम राहिला आणि त्याचीच परिणती राहुल गांधी यांनी नितीशकुमारांची भेट घेण्यात झाली आहे. 

मात्र, या भेटीनंतरही नितीश हे तेजस्वी यांच्या राजीनाम्यावर ठामच आहेत; कारण भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात ठेवल्यास आपल्या 'यूएसपी'लाच म्हणजे- युनिक सेलिंग पॉइंट- तडा जाईल, याची त्यांना पुरती जाणीव आहे. यापूर्वी भाजपबरोबर आघाडी करून सरकार स्थापन केलेले असताना, बी.एड.च्या खोट्या पदवीप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप होताच जीतन मांझी या आपल्या विश्‍वासू आणि दलित नेत्याची त्यांनी ताबडतोबीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्यामुळेच आता तेजस्वी यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास त्यांचीही हकालपट्टी करण्याशिवाय नितीश यांच्यापुढे पर्याय नाही. तेव्हा आता राहुल गांधी हे लालूप्रसादांचे त्यासाठी मन वळवतात काय हे बघावे लागेल; कारण देशपातळीवरील राजकारणात लालूप्रसाद हेच कॉंग्रेसचे, दिवस सुगीचे असो की दुष्काळाचे, निष्ठावान दोस्त राहिले असल्याचे इतिहास सांगतो. या पार्श्‍वभूमीवर नितीश हे मोदी पंतप्रधानांच्या मेजवान्यांना सातत्याने उपस्थित राहून, आपल्यापुढे दुसरा पर्याय असल्याचे सूचित करू पाहत आहेत. तेव्हा आता खरे तर निर्णय घ्यायचा आहे तो लालूप्रसाद व राहुल यांनाच! त्यामुळे मग राहुल यांनी घेतलेल्या नितीश यांच्या भेटीतून काहीच निष्पन्न न झाले, तर त्यात नवल ते काय?

Web Title: esakal news sakal news editorial