'युरो' स्पर्धेतून प्रेरणा घेऊयात

'युरो' स्पर्धेतून प्रेरणा घेऊयात

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची फ्रान्समध्ये नुकतीच सांगता झाली. मैदानावरील निकाल वगळता काहीही अनपेक्षित घडले नाही. ही स्पर्धा सुरळीत पार पडणे केवळ संयोजकांसाठी, ‘युएफा‘ या शिखर संघटनेसाठीच नव्हे तर युरोप खंडासाठी आणि फुटबॉलच नव्हे, तर एकूणच खेळासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. स्पर्धेपूर्वी पॅरिसवर दहशतवादी हल्ले झाले होते. स्पर्धेपूर्वी मी युरोपमध्ये होतो. त्यामुळे तेथील वातावरणाच्या तीव्रतेची मला कल्पना आली होती. म्हणूनच एक तज्ज्ञ या भूमिकेतून नव्हे तर एक सामान्य फुटबॉलप्रेमी म्हणून मी स्पर्धेचे सुरक्षित, सुरळीत संयोजन महत्त्वाचे व आनंददायक मानतो. 

स्पर्धची अनेक वैशिष्ट्ये दिसतात. पोर्तुगालच्या रूपाने नवा युरो विजेता उदयास आला. हे घडताना काही मातब्बर संघांची पीछेहाट झाली, तर नवोदित संघांनी क्षमतेची चुणूक दाखविली. युरो स्पर्धा अशामुळे आगळीवेगळी आहे, की येथे एक-दोन नव्हे तर बहुतेक प्रमुख संघ हॉट फेव्हरिट असतात. या स्पर्धेने प्रस्थापितांना धक्का दिला. यात गतविजेत्या स्पेनसह इंग्लंड, इटली यांचा समावेश होता. जगज्जेत्या जर्मनीला हा लौकिक सार्थ ठरविता आला नाही. प्रस्थापितांची पीछेहाट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या संघातील दुसऱ्या फळीतील खेळाडू प्रामुख्याने आपल्या देशातील, तर काही प्रमुख खेळाडू इतर देशांतील लीगमध्ये खेळतात. हा मोसमाचा अंतिम टप्पा होता. त्यामुळे अव्वल श्रेणीच्या लीगशिवाय, स्थानिक करंडक, युरोपा, चॅंपियन्स लीग अशा स्पर्धांत ते खेळून आले होते. साहजिकच त्यांची दमछाक झाली होती. याचा त्यांच्या आणि पर्यायाने संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. 

आइसलॅंड, वेल्स अशा ज्या संघांनी लक्षवेधी कामगिरी केली, त्यात सांघिक कामगिरी निर्णायक ठरली. वेल्सचा गॅरेथ बेल सोडल्यास इतर खेळाडूंची नावे फारशी माहीत नव्हती. आइसलॅंडचा संघ तर अगदीच अपरिचित होता. या संघातील खेळाडू प्रमुख लीगमध्ये प्रमुख क्‍लबकडून खेळले नसल्यामुळे ताजेतवाने होते. ते प्रेरित झाले होते आणि हेच निर्णायक ठरले. 

विजेत्या पोर्तुगालसाठी हीच प्रेरणा विलक्षण होती. पोर्तुगाल म्हटल्यावर ख्रिस्तियानो रोनाल्डो हेच एकमेव नाव समोर येते आणि रोनाल्डो म्हटल्यावर अलिशान मोटारी, फॅशन, लाखो डॉलरचे करार अशा गोष्टी चर्चेला येतात. कारकिर्दीच्या प्रारंभापासून या स्पर्धेपूर्वीपर्यंत तो देशासाठी प्रमुख विजेतेपद मिळवू शकला नव्हता. त्यामुळे तो टीकेचा धनी झाला होता. त्यातच या स्पर्धेचा निर्णायक टप्पा सुरू होण्यापूर्वी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला निराशाजनक अपयशामुळे निवृत्ती घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर रोनाल्डोवरील दडपण वाढले होते. अंतिम सामना सुरू झाल्यानंतर वेगळेच संकट ओढविले. त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. यानंतरही रोनाल्डोने हार मानली नाही. प्रशिक्षक सॅंटोस यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना अनेकदा झपाटून त्याने सारथ्य केले. तेव्हा मैदानावर नसूनही ऍक्‍शनमध्ये राहिलेला रोनाल्डो त्याच्या चाहत्यांनाही नवा होता, तर टीकाकारांना धक्का होता. 

पोर्तुगालने आणखी एक धक्का दिला. त्यांच्याकडे रोनाल्डो असूनही रिकार्डो करीझ्मा, नॅनी, एडर, रॅफेल ग्युरैरो, गोलरक्षक रुई पॅट्रिसीओ अशा खेळाडूंनी ठसा उमटविला. यावरून हा संघ एकांड्या शिलेदाराचा (अर्थातच रोनाल्डो) नसून देशासाठी, संघासाठी, संघातील सहकाऱ्यांसाठी जीव तोडून खेळणाऱ्या खेळाडूंचा असल्याचे स्पष्ट झाले. यामुळेच पोर्तुगाल यथार्थ विजेता मानावा लागेल. रोनाल्डोला दैवाची साथ लाभली, असे त्याचे टीकाकार म्हणतील; पण शेवटी नशीब हे शूरांना साथ देते. फ्रान्सविरुद्ध त्यांच्याच मैदानावर दोन हात करताना पोर्तुगालचा संघ कर्णधार जायबंदी झाल्यानंतरही खचला नाही. त्यांनी पेनल्टी शूट आऊटवर म्हणजे दैवावर निकाल सोपविला नाही. बदली खेळाडू एडरने अतिरिक्त वेळेत केलेला गोल हेच दाखवून देतो. 

याप्रसंगी आणखी काही मुद्यांचा विचार करावा लागेल. गोल्डन बूटचा बहुमान फ्रान्सचा अँटोईन ग्रीझमन, तर सर्वोत्तम नवोदित खेळाडूचा मान पोर्तुगालच्या रिनाटो सॅंचेसने पटकाविला. मातब्बर संघांमधील दिग्गजांचा सहभाग लक्षात घेतल्यास या स्पर्धेने भावी स्टारची झलक सादर केली. ग्रीझमन 25, तर रिनाटो केवळ 18 वर्षांचा आहे. युरोसारखे व्यासपीठ या प्रतिभाशाली तरुणांनी गाजविले. त्यामुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळाली असेल. हाच धागा धरून छोट्या संघांचाही पुन्हा उल्लेख करावा लागेल. वेल्स, आइसलॅंड अशा संघांनी दिग्गजांपेक्षा सरस कामगिरी केली. 

कोणत्याही स्पर्धेत असे अनपेक्षित निकाल लागणे खेळातील चुरस, दर्जा वाढल्याचे द्योतक असते. हे खेळासाठी पोषक असते. इंग्लंड, स्पेन, इटली किंवा जर्मनीचेच नव्हे, तर या संघांचे जगभरातील समर्थक खट्टू जरूर झाले असतील; पण अखेरीस सरशी झाली ती फुटबॉलची. 

युरोच्या अनुषंगाने भारत कुठे असा मुद्दा आता उपस्थित करूयात. युरोच नव्हे तर आशिया खंडातही भारत कुठे हे जागतिक क्रमवारीवरूनच लक्षात येईल. ऍथलेटिक्‍स, जलतरणाखालोखाल फुटबॉलमध्ये दर्जात्मक तफावत मोठी आहे. ती भरून काढायची असेल तर आपल्याला युवा खेळाडू विकास उपक्रम नेटाने राबवायला लागतील. हे खेळाडू घडविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने शिकविणारा प्रशिक्षक एका मर्यादेपलीकडे जाऊ शकणार नाहीत. त्यासाठी आशिया, युरोप, जागतिक अशा संघटनांचे मान्यताप्राप्त कोर्स करून लायसन्स मिळविणारे प्रशिक्षक लागतील. तरच आपले खेळाडू काळागणिक बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊ शकतील. आज व्यावसायिक आणि आधुनिक खेळात शास्त्र आणि पद्धतीला (सायन्स अँड सिस्टिम) महत्त्व आले आहे. पायाभूत सुविधा अद्ययावत असाव्या लागतात. 

आपल्याकडे वयचोरी ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे बीसीसीआयने युवा विश्वकरंडक स्पर्धेत एकदाच खेळण्याचा नियम केला, तशी काही कठोर पावले उचलावी लागतील. 

रिनाटो सॅंचेस याला आपण रोलमॉडेल ठेवून हे करायला हवे. त्यास कदाचित एक-दीड दशक लागेल; पण भारतीय फुटबॉलधील आय-लीग क्‍लब, आयएसएल फ्रॅंचायजी, महासंघ अशा विविध सहभागी घटकांनी (स्टेकहोल्डर्स) हे काम करायला हवे. त्यादृष्टीने काही प्रयत्न नक्कीच सुरू आहेत, हेसुद्धा मी नमूद करू इच्छितो. काही क्‍लब-फ्रॅंचायजींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. भविष्यात भारतीय फुटबॉलचा विकास नक्कीच झालेला असेल याची मला खात्री आहे. 

(लेखक भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com