
आध्यात्मिक ज्ञानाच्या क्षेत्रात स्वामींचे स्थान फार वेगळे आणि मोठे आहे. भारत ही तशीही अध्यात्माची भूमी आहे. मात्र, त्या मार्गावर प्रत्यक्ष चालल्याखेरीज अध्यात्म म्हणजे नेमके काय हे कळत नाही आणि त्यासाठी स्वामीजींसारखा गुरू असावा लागतो. एक नम्र शिष्या या नात्याने मी स्वामीजींच्या शिबिरात सहभागी होणे सुरू केले, तेव्हापासून अध्यात्माच्या क्षेत्रातील माझ्या वैयक्तिक प्रवासाला एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
- कांचन नितीन गडकरी
मानवी जीवन, भोवतालचा निसर्ग-सृष्टी, पर्यावरण-प्रतिसृष्टी आणि या साऱ्यांच्या पाठीशी असलेल्या ब्रह्मतत्त्वाशी तादात्म्य साधायचे असल्यास अध्यात्म आणि साधना हाच मार्ग असतो. मला अनेक आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन लाभले, हे माझे भाग्य.
त्यातही अयोध्येच्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे खजिनदार स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात एक साधक म्हणून मी व्यक्तिशः आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला आणि घेते आहे. स्वामीजी अध्यात्म अतिशय सोप्या शब्दांत सांगतात.
गीतेवरील त्यांचे मार्गदर्शन ही खरोखर अपूर्वाई असते. गेल्या काही वर्षांपासून स्वामीजींच्या गीता अध्ययन शिबिराला उपस्थित राहण्याची संधी मला मिळते आहे. या शिबिरांच्या काळात ते केवळ साधकांना उपदेशातून मार्गदर्शन करतात असे नाही, तर कृतीतून उदाहरणही देत असतात.
साधकांसोबत ते स्वतः पहाटे सव्वा चारला उठवतात आणि प्रातःस्मरणाला सोबत उपस्थित असतात. साधकांसोबत ते वेळ घालवतात. त्यांच्याशी सहजतेने संवाद साधतात. त्यांच्या जिभेवर सरस्वती नांदते याचा अनुभव माझ्यासह अनेक साधकांना आहे.
स्वामीजी गीतेवर भाष्य करतात तेव्हा अगदी सहज आणि अनौपचारिक पद्धतीने दासबोधाचा, संत तुकारामांच्या गाथेचा संदर्भ देतात. संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यातील व शिकवणीतील संदर्भ त्यांच्या तोंडून आवर्जून ऐकावे असे असतात.
अनेक विषयांच्या अनुषंगाने ते संतांच्या शिकवणीतील उदाहरणे सांगतात आणि त्यातील प्रत्येक उदाहरण आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा एक नवा सोपान असतो. मी स्वामीजींना अनेकदा प्रत्यक्ष भेटले आणि आमच्या घरी त्यांचे आतिथ्य करण्याचे भाग्यही मला मिळाले. त्यांच्या प्रत्येक भेटीत आध्यात्मिकतेची एक अलौकिक दरवळ मी अनुभवलेली आहे.
स्वामीजींच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त आपल्या भावना शब्दबद्ध करीत असताना मला हे आवर्जून सांगावेसे वाटते, की अध्यात्म हीच शक्ती मानवी जीवनात शांती आणि समतोल प्रदान करू शकते.
याचा अनुभव घ्यायचा असल्यास त्यांच्या गीतेवरील भाष्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानाच्या क्षेत्रात स्वामींचे स्थान फार वेगळे आणि मोठे आहे. भारत ही तशीही अध्यात्माची भूमी आहे.
मात्र, त्या मार्गावर प्रत्यक्ष चालल्याखेरीज अध्यात्म म्हणजे नेमके काय हे कळत नाही आणि त्यासाठी स्वामीजींसारखा गुरू असावा लागतो. एक नम्र शिष्या या नात्याने मी स्वामीजींच्या शिबिरात सहभागी होणे सुरू केले, तेव्हापासून अध्यात्माच्या क्षेत्रातील माझ्या वैयक्तिक प्रवासाला एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
जणू काही साक्षात परमेश्वरानेच मला ही संधी व दिशा दिली, असे मला सतत वाटत असते. स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराजांच्या शिकवणीतून भगवद्गीतेचे कालातीत ज्ञान पाझरत असते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संभाषण हे कोणत्या अर्थाने जीवनाच्या, तसेच आपल्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गदर्शक आहे, हे आपल्याला कळते.
त्यांच्या तोंडून गीतेमधील तत्त्वांचे स्पष्टीकरण समजून घेणे हा आपल्या जीवनात, दृष्टिकोनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या दैवी अंतर्दृष्टीचा प्रवास असतो. स्वामीजींचे विवेचन शाब्दिक अर्थाच्या पलीकडे जाऊन गीतेतील प्राचीन तत्त्वज्ञान वर्तमानाच्या अनुषंगाने समकालीन संदर्भांसह आपल्या काळजात आणि मनात प्रतिबिंबित होत असते, रुजत असते.
परमात्म्याकडे नेणाऱ्या सर्व मार्गांना जोडणारी अंतर्निहित एकता आणि समस्त जीव-जडातून प्रवाहित होत असलेल्या चैतन्याच्या माहात्म्याबद्दल आपण त्यातून सजग होत जातो. त्यांची शिकवण मला जीवनातील आव्हाने, द्विधा आणि आनंदाच्या क्षणांमध्ये मार्गदर्शन करीत असते.
स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराजांच्या शिकवणीने चैतन्यशील आध्यात्मिक समुदाय निर्माण केला आहे. विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले साधक त्यांच्या सत्संगात सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. तो एका दैवी सहवासाचा सामूहिक अनुभव असतो.
शिबिरादरम्यान किंवा सत्संगात निर्माण होणारी सामूहिक ऊर्जा वैयक्तिक आणि सामूहिक आध्यात्मिक वाढीसाठी शक्तिशाली उत्प्रेरक म्हणून काम करीत असते. स्वामीजींच्या शिकवणीत आध्यात्मिक विकास आणि मानवतेची निःस्वार्थ सेवा यांच्यातील अविभाज्य संबंधावर जोर दिला जातो.
निःस्वार्थ सेवा ही संकल्पना हा केवळ आपल्या नैतिक कर्तव्याचा भाग नसून, तो हृदय शुद्ध करण्याचा आणि अहंकाराच्या पलीकडे जाण्याचा मार्ग असतो, हे मी स्वामीजींच्या मार्गदर्शनातून शिकले. महाराजांच्या स्वतःच्या जीवनात हे तत्त्व प्रतिबिंबित होत असते.
कारण त्यांनी नेहमीच स्वतः विविध सेवाभावी कामांसाठी पाठबळ दिले आणि गरजू लोकांचे जीवन उन्नत केले. आजही त्यांचे ते सेवा कार्य सुरू आहे. त्यांची मानवतेच्या सेवेची शिकवण परमार्थाच्या पलीकडे असून, सर्व सजीवांचा परस्पर संबंध त्यातून उलगडत असतो.
अशा या स्वामीजींचा जन्म दिवस हा त्यांच्या शिकवणीची उजळणी करण्याचा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंग आहे, असे मी मानते. स्वामीजींना ७५व्या जन्मदिनानिमित्त माझे नमन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.