पेटलेल्या काश्‍मीरमधील फैजल शाहची वेदना

पेटलेल्या काश्‍मीरमधील फैजल शाहची वेदना

फैजल शाह हे नाव आठवतंय? पाच वर्षांपूर्वी, 2010 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे "यूपीएससी‘ परीक्षेत "टॉपर‘ आलेला हा तरुण सनदी अधिकारी. काश्‍मीरमधील भरकटलेल्या तरुणाईला कर्तबगारीचा नवा मार्ग दाखवणारे ते त्याचे यश देशभर अक्षरश: साजरे केले गेले. योगायोगाने फैजल शाह यांना गृहराज्याचे ‘केडर‘ मिळाले अन्‌ आता ते तिथल्या शालेय शिक्षण खात्याचे संचालक आहेत. आता पुन्हा ते चर्चेत येण्याचं कारण वेगळे आहे. किंबहुना, सगळ्यांनाच, विशेषतः प्रसारमाध्यमांना, काश्‍मीरविषयी तज्ज्ञ असल्याचा आव आणून बोलणाऱ्यांना तारतम्याची जाणीव करून देणारेही ते आहे. 

सैन्यदलाच्या कारवाईत बुऱ्हाण वणी नावाचा अतिरेक्‍यांचा कमांडर मारला गेल्यानंतर काश्‍मीर खोरे पेटले. हिंसाचाराचा आगडोंब उसळला. अगदी अमरनाथ यात्राही रोखावी लागली. अतिरेकी संघटना व पाकिस्तानही या घटनेचा लाभ उठवण्यासाठी सरसावला. ...अन्‌ अर्थातच परंपरागत माध्यमांना दर तासाला चघळण्यासाठी नवा विषय मिळाला. काही अपवाद वगळता आपल्या माध्यमांना तसंही तारतम्याचं वावडं आहेच आणि अशा संवेदनशील विषयाच्या वेळी तर ते अधिकच सोडले जाते. आपल्या वृत्तांकनामुळे काश्‍मीरची परिस्थिती अधिक चिघळणार नाही, द्वेषाची दरी अधिक रुंदावणार नाही, याचा विचार करून काय टाळायला हवं, याचा विसर पडलेल्या मंडळींनी बुऱ्हाण वणीची तुलना फैजल शाहशी केली. तशीही तुलना कोणालाच आवडत नाही. त्यात, बुऱ्हाण हा कसा धनवान कुटुंबातला बिघडलेला तरुण होता, तर वडील अतिरेक्‍यांकडून मारले जाऊनही मध्यमवर्गीय कुटुंबातला फैजल कशी राष्ट्रसेवा करतोय, अशी जाहीरपणे तुलना मांडली. बुऱ्हाणने बंदूक जवळ केली तर फैजलने पुस्तक. बुऱ्हाण हिंसाचाराचे कारण बनला, तर फैजल गेल्या पाच वर्षांमध्ये असंख्य तरुणांच्या नागरी सेवेकडे, स्पर्धा परीक्षांकडे वळलेल्या पावलांचा उद्‌गाता, अशी रंजक फोडणीही या तुलनेला देण्यात आली. त्या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि फैजल शाह हा तरुण सनदी अधिकारी संतापला. 

त्याने या उतावीळ व उठवळ तुलनेविरुद्ध सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, "हे थांबवा अन्यथा मी सरकारी नोकरीचा राजीनामा देईन,‘ असा इशारा दिला. सोबतच "दिल्लीतल्या स्टुडिओमध्ये बसून विश्‍लेषण करणाऱ्या मंडळींना काश्‍मीरचे खरे दुखणे कळलेलेच नाही. त्यांनी मला यात ओढू नये. मला माफ करावं‘, अशी काही वृत्तवाहिन्यांची नावे घेऊन टीका केली. त्या त्याच्या प्रतिक्रियेची दखल "सोशल मीडिया‘नं तर घेतलीच, शिवाय माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तो इशारा "रिट्‌विट‘ केल्यामुळे देशभर, जगभर त्यावर चर्चा झाली. 

यानिमित्ताने फैजल शाह यांचाच गेल्या मे महिन्याच्या अखेरीस एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात प्रकाशित लेख चर्चेत आला आहे. त्या लेखाचे निमित्त होते, "यूपीएससी‘ परीक्षेत अनंतनागचा अतहर आमीर उल शफी खान देशात दुसरा आल्याचे आणि त्याचे शीर्षक होते, "टिल "आझादी‘ कम्स‘. फैजलने त्यात कश्‍मिरी युवकांपुढील दोन मार्गांची तुलना केली होती. पहिला मार्ग म्हणजे काश्‍मीरच्या आझादीसाठी दहशतवादाचा रस्ता पकडायचा, भारतीय सैन्याशी गनिमी युद्ध लढायचं, शहिदांच्या अंत्ययात्रांमध्ये सहभागी होत युवकशक्‍तीचं प्रदर्शन करायचे व शेवटी स्वत:ही शहीद व्हायचं. दुसरा मार्ग, जम्मू-काश्‍मीर किंवा बाहेर कुठेही चांगलं शिक्षण घ्यायचं, "आयआयटी-आयआयएम‘ अथवा अन्य पदव्या मिळवायच्या, "करिअर‘ घडवायचं व झालंच केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवांमध्ये जाऊन जनतेची सेवा करायची. तुम्ही "आझादी‘ची स्वप्ने जरूर पाहा; पण ती येईपर्यंत हा दुसरा मार्गच पत्करा, असा सल्ला तरुण मित्रांना फैजलने त्या लेखात दिला होता. तेव्हा, दोन मार्गाची तुलना करणारा फैजल शाह या वेळी का चिडला, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर कदाचित असे असावं, की या वेळच्या तुलनेतून अप्रत्यक्षरीत्या का होईना ध्वनित होते, की चुकीच्या मार्गाने जाऊनही बुऱ्हाण वणी हा भरकटलेल्या काश्‍मिरी तरुणांचा हीरो झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com