पडवे माजगावात काजू गोदाम खाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मालाला विमा संरक्षण
सह्याद्री कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेने कर्जरूपाने अर्थपुरवठा केला आहे. जिल्हा बॅंकेचे सुमारे सव्वाकोटीचे कर्ज आहे. याला विमा संरक्षण आहे. त्याव्दारे मालासाठी सुमारे 1 कोटी 60 लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच जिल्हा बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

कळणे- पडवे माजगाव (ता. सावंतवाडी) येथील सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखान्याच्या गोदामाला आग लागून सुमारे 1 कोटी 44 लाखांच्या कच्चा व प्रक्रिया केलेल्या काजूचे नुकसान झाले. शिवाय इमारतीचे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पडवे माजगाव येथे सह्याद्री काजू कारखाना गेली काही वर्षे सुरू आहे. तळकट दशक्रोशीतील अनेक महिलांना तेथे रोजगार मिळतो. कारखान्याच्या परिसरातच कच्चा काजू ठेवण्यासाठी व प्रक्रिया केलेल्या काजूबियांसाठीचे गोदाम आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास या गोदामातून अचानक धूर येऊ लागला. हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात यायला वेळ लागला. कारण याच दरम्यान दाट धुकेही होते. आग लागल्याचे लक्षात येताच याची माहिती कारखान्याचे व्यवस्थापक व इतरांना देण्यात आली. तातडीने सावंतवाडी आणि कुडाळमधून अग्निशमन बंब मागविण्यात आले; मात्र बंब घटनास्थळी पोचायला सुमारे तीन तासांचा अवधी लागला. बंबांनी आग विझविण्यात आली; मात्र नुकसान टाळता आले नाही.

या आगीमुळे कारखान्याचे सुमारे 1कोटी 69 लाखांचे नुकसान झाले आहे. गोदामातील 51 लाखांची 40 हजार 575 किलो काजू बी, 70 लाख 50 हजार किमतीचा प्रक्रिया केलेला काजू, 22 लाख 20 हजार किमतीचा न सोललेला काजूगर असे मिळून 1 कोटी 44 लाखांच्या मालाचे नुकसान झाले. इमारतीचे सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती बांदा येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पंचनाम्यावेळी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक चंद्रशेखर देसाई, तलाठी किरण राझणीकर उपस्थित होते.

Web Title: Fire at cashew godown in Padwe