वर्षाचा पहिला दिवस

वर्षाचा पहिला दिवस

रोज सकाळी शेजारचे वसंतराव माझ्याकडे येतात. त्या निमित्तानं थोड्या गप्पा होतात. पण आज साडेसात वाजले तरी ते आले नाहीत. मग लक्षात आलं, ते फिरायला गेले असतील. नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून त्यांनी वजन कमी करण्याचा संकल्प सोडला होता. गेले वर्षभर त्यांची बायको रोज त्यांच्या कानीकपाळी ओरडत होती- पोट किती सुटलंय, काहीतरी करा. वैतागून त्यांनी नवीन वर्षात फिरायला जाण्याचं ठरवलं होतं. ते आता काही आठ-साडेआठपर्यंत येत नाहीत, असा विचार करत असतानाच, ‘काय अरुणराव, काय चाललंय?’ असं म्हणत वसंतराव आले.

‘अरे, हे काय? तुम्ही आजपासून फिरायला जाणार होतात ना?’ मी विचारलं.
त्यांनी हातानं थांबण्याची खूण केली. आरामखुर्चीत बसून म्हणाले, ‘तुम्हाला तो पुलंचा किस्सा माहितेय का?’ मी म्हणालो ‘कोणता?’ ते म्हणाले, ‘एकदा काय झालं, एकजण पुलंची मुलाखत घ्यायला आला. त्यानं पहिलाच प्रश्‍न विचारला - तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतो? मग पुलंनी त्यांचा दिनक्रम सांगायला सुरवात केली. ते म्हणाले; त्याचं काय आहे, सकाळी मी जरा उशिराच उठतो. चहाबिहा, पेपरबिपर, नाष्टाबिष्टा झाल्यावर फिरायला बाहेर पडतो. रस्त्यानं कुणीकुणी भेटतात. मग याची टिंगल कर, त्याची टवाळी कर, या कट्ट्यावरून त्या कट्ट्यावर गप्पा मारताना अकरा-साडेअकरा कसे होतात कळत नाही. घरी आल्यावर अंघोळ करतो. तोपर्यंत जेवायची वेळ होते. मग दुपारची वामकुक्षी. पाच वाजता उठतो. तोपर्यंत कुणी ना कुणी भेटायला येतात. त्यांच्याशी अघळपघळ गप्पा होतात. तोपर्यंत रात्रीची जेवायची वेळ होते. मग जेवणबिवण झाल्यावर दूरदर्शनवर एखादं नाटक किंवा जुना चित्रपट असेल तर बघतो. साडेअकरा-बारा होतात झोपायला. मग झोपतो.त्या मुलाखतकारानं विचारलं, ‘मग लिहिता केव्हा?’ पुलं म्हणाले, ‘दुसऱ्या दिवशी.’

वसंतरावांनी हा किस्सा सांगितल्यावर अर्थपूर्ण नजरेनं माझ्याकडं बघितलं. मी मान हलवत म्हणालो, ‘आलं लक्षात. म्हणजे तुम्ही फिरायला गेला नाहीत.’ ‘करेक्‍ट.’ वसंतराव म्हणाले, ‘तसा मी उद्यापासूनच जाणार होतो, पण आमची ‘ही’ म्हणाली- ‘तुम्ही फिरायला जाणार आहातच तर एक काम करा. चौकातून कांदे, बटाटे, कोथिंबीर घेऊन या; आणि किराणा दुकान उघडं असेल तर थोडंसं बेसन  आणि अर्धा लिटर करडीचं तेल आणा.’ त्यांच्या पिशवीकडे बघत विचारलं, ‘सगळं नीट आणलंय ना? नाहीतर वहिनी रागावतील.’ त्यांनी पिशवीतून मोठं पुडकं काढलं आणि म्हणाले, ‘अगदी न विसरता सगळं आणलंय. बघा.’ त्या पुडक्‍यात बघितलं आणि आश्‍चर्यानं विचारलं. ‘अहो, हे तर बटाटेवडे आहेत!’ वसंतराव म्हणाले, ‘त्याचं काय झालं, मी बाहेर पडलो खरा. पण तो आपला महाराजा वडेवाला, बटाटेवडे तळत होता. माझ्यासमोर त्यानं पहिला घाणा काढला. मला राहवेना. बटाटेवडे तुमच्यासाठीपण आणलेत.’ ‘अहो, पण वहिनींनी तुम्हाला कांदे-बटाटे आणायला सांगितले होते ना?’ ‘मग यात काय आहे? तेच तर आहे सगळं!’ असं म्हणून त्यांनी एक वडा उचलला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com