स्थलांतरितांचे विजयगीत! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

हा विश्‍वविजय फ्रान्ससाठी नव्हे, तर जगातील एका मोठ्या मानवी समूहासाठी खूप मोलाचा होता व आहे. कारण फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. एका अर्थाने हे स्थलांतरितांचे विजयगीत आहे.

हा विश्‍वविजय फ्रान्ससाठी नव्हे, तर जगातील एका मोठ्या मानवी समूहासाठी खूप मोलाचा होता व आहे. कारण फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. एका अर्थाने हे स्थलांतरितांचे विजयगीत आहे.

रंगील्या पॅरिसनगरीतील सुप्रसिद्ध शाँज एलिजे आणि आर्क द त्रुफां या अन्य शहरभागात सुरू असलेली ‘पार्टी’ अद्याप संपलेली नाही. लाखो फुटबॉल चाहते फ्रेंच तिरंगी ध्वज नाचवत धूमधमाल करत आहेत. या विजयसोहळ्याची झिंग इतक्‍यात ओसरेल, अशी शक्‍यताही नाही. का ओसरावी? तब्बल वीस वर्षांनंतर फ्रान्सच्या तरण्याबांड संघाने ‘फिफा’ फुटबॉल विश्‍वकरंडक घरी आणला आहे. एका सोनेरी स्वप्नाला प्रारंभ झाला आहे, एक भळभळती जखम पूर्ण बरी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी याच फ्रेंच संघाने मायभूमीत पोर्तुगालकडून नामुष्कीची हार खात ‘युइएफए युरो’ करंडकाचा अंतिम सामना गमावला होता. फ्रेंच संघाचे माजी खेळाडू आणि व्यवस्थापक दिदजे देजां यांना शिव्याशापांचे धनी व्हावे लागले होते. त्याच देजां यांच्या पत्रकार परिषदेत घुसून फ्रेंच विश्‍वकरंडक संघातील त्यांच्या चेल्यांनी त्यांना शॅम्पेनने न्हाऊ घातले, यात सारे आले! फ्रान्सने यंदा रशियात अक्षरश: क्रांती घडवून आणली. क्रोएशियाचे तिखट आव्हान सहजी परतवत अखेर ४-२ असा निर्भेळ विजय मिळवला. १९९८ मध्ये फ्रान्सने विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हा स्वतंत्र क्रोएशिया नावाचा देश अवघा आठ वर्षांचा होता. सोव्हिएत संघराज्याची शकले झाल्यानंतर, १९९१ मध्ये क्रोएशियाला स्वातंत्र्य मिळाले, पण पुढली पाचेक वर्षे या देशाने जी होरपळ अनुभवली, त्याला तोड नव्हती. त्या फुफाट्यातून तावून सुलाखून निघालेल्या या चिमुकल्या देशाने उपविजेतेपद पटकावले, हीदेखील एक ऐतिहासिक घटनाच मानावी लागेल. अवघ्या ४२ लाख लोकसंख्येचा देश. शेजारच्या सर्बियाच्या निमलष्करी दलाने केलेले अनन्वित अत्याचार, कत्तली, लाखो निर्वासितांच्या उग्र समस्या अशा अनेक भस्मासुरांशी एकाच वेळी लढणाऱ्या क्रोएशियाचा धडाका अखेर फ्रान्सने अंतिम फेरीत रोखला. हेच स्वप्न साकारण्यासाठी क्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल लढला, लायनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने आकाश-पाताळ एक केले, नेमारच्या ब्राझीलने आपली पूर्वपुण्याई पणाला लावली, हॅरी केनच्या इंग्लंडने चिकाटीने लढा दिला. परंतु, अखेर फ्रान्सचा संघ जगात सर्वश्रेष्ठ ठरला.

या करंडकासाठी ३२ देशांचे संघ जिवाच्या कराराने खेळले. फ्रान्स यंदा बाजी मारू शकेल, अशा अटकळी बाद फेरीतील अव्वल संघांच्या पडझडीनंतर बांधल्या जाऊ लागल्या. ‘इज इट कमिंग होम?’ हा सवाल इंग्लंडवासीही करत होते. रशियातील बुयान नामक भविष्यवेत्त्या अस्वलाने क्रोएशिया जिंकेल, असे भाकित केले होते. परंतु, रविवारी रशियातील मॉस्कोमधल्या लुझिनिकी स्टेडियममध्ये जातीने उपस्थित असलेले फ्रेंच पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या साक्षीने फ्रेंच संघाने आपला तिसरा विश्‍वविजय नोंदवला आणि अनिश्‍चितता संपली. आपल्या विजयीवीरांना प्रेमभराने गळाभेट देणाऱ्या पंतप्रधान मॅक्रॉन यांच्याकडे पाहून अनेकांना विस्मय वाटला असेल. काहींनी नाकेही मुरडली असण्याची शक्‍यता आहे. कारण फ्रान्सच्या या दिग्विजयाकडे केवळ एका खेळातला देदीप्यमान विजय किंवा ३७ लाख डॉलरच्या अफाट बक्षीस रकमेच्या मोजपट्टीसह बघता येणार नाही. हा विश्‍वविजय फ्रान्ससाठी नव्हे, जगातील एका मोठ्या मानवीसमूहासाठी खूप मोलाचा होता व आहे. कारण फ्रान्सच्या संघातले तब्बल दहा खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. स्थलांतरितांच्या अस्तित्वाला नाके मुरडणारे, त्यांना ‘उपरे’, ‘परप्रांतीय’, ‘खायला काळ...’ अशी नावे ठेवणारे वर्णवर्चस्ववादी लोक फ्रान्समध्ये आणि इतरत्र आहेतच. पण, उपऱ्यांनाही महत्त्वाकांक्षांचे पंख असतात, हे अधोरेखित करणारा हा विश्‍वकरंडक होता. फ्रेंच संघातील किलियन एम्बापे हा स्थलांतरिताचा एकोणीस वर्षांचा मुलगा दिग्विजयाचा वाटेकरी होतो काय, फुटबॉल जगतातला नवा महासितारा म्हणून लखलखू लागतो काय, सारेच स्वप्नवत आहे. पॉल पोग्बा, उमिती, एम्बापे हे आफ्रिकन वंशाचे खेळाडू आता फुटबॉल जगताच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. अर्थात, स्वित्झर्लंड, बेल्जियम, स्पेन, रशिया अशा किती तरी सहभागी देशांचे बिनीचे खेळाडू हे स्थलांतरितांचे वारसदारच होते. नव्या जगाच्या नकाशावर स्थलांतरितांचा वावर गेली काही दशके ठळकपणे दिसू लागला आहे. स्वत:ची मायभू गमावलेल्यांची ही नवी पिढी हाच नकाशा बदलून टाकण्याची क्षमता राखून आहे, याची चाहूल या ‘फिफा’ विश्‍वकरंडक स्पर्धेने दिली आहे. म्हणूनच कदाचित पंतप्रधान मॅक्रॉन यांनी आपल्या खेळाडूंना मारलेल्या मिठीत शाबासकी होतीच, पण बहुधा थोडीशी कृतज्ञतेची भावनाही असावी.

Web Title: france beat croatia football world cup final