नाममुद्रा  : प्रवासाचा असाही ‘झपाटा’

French researcher Frankie Zapata
French researcher Frankie Zapata

फ्रेंच संशोधक फ्रॅंकी झपाटा (वय ४०) यांनी फ्रान्समधून ‘फ्लायबोर्ड’द्वारे उड्डाण करून इंग्लिश खाडी पार केली. त्यांनी ब्रिटनमध्ये यशस्वी लॅंडिंग केले आणि दहा दिवसांपूर्वीचे अपयश धुवून काढले. मुळात २५ जुलैला त्यांनी केलेले पहिले उड्डाणहेदेखील अपयश मानायचे कारण नाही. प्रवासाचे नवे साधन जगाला देण्याचा हा प्रयत्न यशाचाच एक भाग होता. एका ताटाएवढ्या आकाराच्या आणि जेट इंजिनावर चालणाऱ्या फ्लायबोर्डच्या साह्याने इंग्लिश खाडी पार केलेली पहिली व्यक्ती म्हणून झपाटा यांचे नाव इतिहासात नोंदविले गेले आहे.  

फ्रॅंकी यांना लहानपणापासून यंत्रांमध्ये रुची होती. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत घेत त्यांनी जेट स्किइंगमध्ये प्रावीण्य मिळविले. या प्रकारात त्यांनी युरोपीय आणि जागतिक अजिंक्‍यपदही पटकाविले आहे. १९९८ ला त्यांनी त्यांचे वडील क्‍लॉड झपाटा यांच्याबरोबर पर्सनल वॉटरक्राफ्टची ‘झपाटा रेस’ सुरू केली. जलशक्तीचा वापर करून पाण्यावर चालणारी छोटी वाहने अथवा यंत्रे तयार करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळविले. हे तंत्र विकसित करत असताना त्यांना फ्लायबोर्डची कल्पना सुचली आणि अथक प्रयत्न करून त्यांनी आपल्या गॅरेजमध्ये त्याची निर्मिती केली. २५ जुलैला त्यांनी केलेले उड्डाण अयशस्वी झाल्यानंतर निराश न होता त्याच दिवशी त्यांनी पुन्हा उड्डाण करण्याचा निश्‍चय बोलून दाखविला होता. याच निश्‍चयाच्या बळावर त्यांनी रविवारी (४ ऑगस्ट) आपले नाव अजरामर केले.

झपाटा यांनी चीनमधील एका कार्यक्रमात सर्वप्रथम ‘फ्लायबोर्ड’ जगासमोर आणला. त्यानंतर अनेक ठिकाणी ते याचे प्रात्यक्षिक दाखवीत होते. फ्लायबोर्डचा वाहन म्हणून वापर प्रथमच करत त्यांनी समुद्रासी टाकिले मागे... साध्य केले.   फ्लायबोर्ड हे प्रवासाचे नवे साधन होऊ शकते, हा त्यांचा विश्‍वास असून याद्वारे तुम्ही कोठेही प्रवास करू शकता, असा त्यांचा दावा आहे, त्यामुळेच त्यांच्या आजच्या यशाचे अधिक महत्त्व आहे. लॅंडिंग यशस्वी झाल्यानंतर झपाटा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ते म्हणाले, की हवेत उडण्याचे हे नवे साधन आहे. तुम्ही पक्ष्याप्रमाणे उडू शकता. हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. फ्लायबोर्ड लवकरच व्यावसायिक बाजारपेठेत येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com