गांधी - एकविसाव्या शतकासाठी

रवींद्र रुक्‍मिणी पंढरीनाथ
शनिवार, 17 डिसेंबर 2016

‘गांधी-१५०’ या महाराष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ तिबेटच्या परागंदा सरकारचे माजी पंतप्रधान प्रा. रिम्पोचे यांच्या हस्ते पुण्यातून होत आहे, त्यानिमित्त.

आज जगभरात धर्माच्या नावावर अंधश्रद्धा, द्वेष व कट्टरता थैमान घालत आहेत, तर धर्म नाकारणारा ईहवादी (सेक्‍युलर) विचार उतरणीला लागला आहे. अशा वेळी धर्मापलीकडच्या मानवतेशी व आध्यात्मिकतेशी नाते सांगणारा महात्मा गांधींचा धर्मविचार सर्वधर्मीयांना, तसेच नास्तिकांनाही जवळचा वाटू लागला आहे. गेल्या शतकातील सारे जुने विचारव्यूह एकविसाव्या शतकात कालबाह्य ठरत असताना गांधींच्या अनेक विचारांची सार्थकता, प्रासंगिकता मात्र काळाच्या छातीवर आपली तप्त मुद्रा कोरताना दिसते आहे. गांधी नावाच्या महात्म्याच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे पुनर्वाचन करण्यास एवढे कारण पुरेसे असायला हरकत नाही.

विशेष म्हणजे २०१९ हे त्याच्या सहचारिणीच्या जन्माचेही दीडशेवे वर्ष आहे (कस्तुरबा त्यांच्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या.) पारंपरिक हिंदू पती-पत्नीच्या नात्यापासून सुरू झालेल्या ह्या भावबंधाने नंतर कितीतरी रूपे घेतली. कितीतरी संघर्ष, पुरुषी अहंकार, धर्म-जातीचे संस्कार, अपत्यांवरील प्रेम व व्यापक समाजनिष्ठा यातील टक्कर पार करून परस्परांना समृद्ध करणारे सहजीवन त्यातून आकाराला आले. कस्तुरबांनी मोहनदासशी केलेल्या चिवट संघर्षातून त्याला प्रेममय प्रतिकाराचे व स्त्रीशक्तीच्या आंतरिक शक्तीचे सूत्र सापडले. आज सर्वधर्मीय कट्टरपंथीय स्त्रीला ‘चूल, मूल व कर्मकांड’ ह्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्त्रीमुक्तीची चळवळ दिशाहीन झाली आहे व आधुनिकतेच्या वाटेवर फक्त देहात्मकतेचे चकवे आहेत. अशा वेळी दीडशे वर्षांचे बा-बापू आपल्याला स्त्री-पुरुषांमधील सुंदर निरामय नाते उलगडून दाखवीत आहेत.

म्हणूनच गांधी-विचारांशी नाते सांगणारे अनेक जण- व्यक्ती, संस्था, संघटना ‘गांधी-१५० अभियान’ सुरू करण्यासाठी धडपडत आहेत. हे अभियान म्हणजे २ ऑक्‍टोबर २०१९ रोजी महासांगता होणारा मेगा इव्हेंट नाही. हा सोहळा नाही कुणा व्यक्तीच्या गौरवाचा किंवा ‘आमचाच नेता थोर’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा. गांधींना अशा सोहळ्याची किंवा समर्थनाची गरज नाही. मात्र त्यांचा वारसा बनू पाहणाऱ्यांच्या दृष्टीने ही संधी आहे. एकविसाव्या शतकाच्या आरशात स्वतःला व गांधी विचारांना पारखून पाहण्याची. ह्या निमित्ताने गांधी-विचारांवर बसलेली काजळी पुसली जाईल, त्याचबरोबर सत्य-अहिंसा, अपरिग्रह अशा त्यांच्या तत्त्वांची पुनर्मांडणी केली जाईल. जागतिकीकरणाच्या रूपाने विकासाचे एकसाची प्रतिमान अमेरिकेपासून चीनपर्यंत लोकांना भुरळ घालत असताना त्यामुळे आपण आपली मुले-नातवंडे ह्यांच्यासाठी फक्त वैराण वाळवंटाचा वारसा शिल्लक ठेवणार आहोत, हे भान जागविले जाईल. समतेचे मूल्य मानणाऱ्या सर्व विचारधारांशी संवाद करून एका व्यापक लढ्याची चाचपणी केली जाईल. ग्लोबल खेड्याचा भाग बनायच्या खटाटोपात शेजार व साथ हरवलेल्या एकाकी माणसांना खरेखुरे नातेसंबंध जोडण्यास प्रवृत्त केले जाईल. मुख्य म्हणजे उद्याच्या जगाचे शिल्पकार असणाऱ्या तरुणांची गांधीच्या विचारांशी रुजवात करून दिली जाईल.

शनिवार १७ डिसेंबरला पुण्यात विचारवंत व तिबेटच्या ‘परागंदा सरकार’चे माजी प्रधानमंत्री प्रा. रिम्पोचे यांच्या हस्ते ‘गांधी-१५०’च्या महाराष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ होत आहे. देशात, जगभरात, असंख्य माणसांच्या मनात ते पसरत जाईल आणि द्वेष-हिंसा, स्वार्थाने काळवंडलेल्या एकविसाव्या शतकात प्रेम, शांती व मानवतेचा प्रकाश उजळत जाईल, अशी आशा करावी काय?

Web Title: Gandhi - for the twenty-first century