निरोगी समाजासाठी सकारात्मक शिक्षा

gauri janwekar
gauri janwekar

मुलांना शिक्षा करण्यासाठी छडीचा वापर करू नये, अशी सूचना ‘बाल हक्क आयोगा’ने नुकतीच शाळांना केली. आयोगाने घालून दिलेले हे मार्गदर्शक तत्त्व स्वागतार्ह आहे. शिस्तीच्या सकारात्मक पद्धती म्हणूनच जाणून घ्यायला हव्यात.

‘बाल हक्क आयोगा’ने कोणत्याही मुलासाठी शिक्षा म्हणून छडीचा वापर करू नये, असे मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे; परंतु अशावेळी शिक्षा नाही करायच्या, तर काय करायचे, याविषयी शिक्षक-पालकांचा संभ्रम होऊ शकतो. विशेषत: जिथे विद्यार्थिसंख्या खूप असते, अशा ठिकाणी मुलांना शांत बसवून, अभ्यासक्रम पूर्ण करणे, हे मोठे आव्हान वाटते. म्हणूनच शिस्तीच्या सकारात्मक पद्धतींचा अभ्यास आवश्‍यक आहे. त्यांचा अवलंब करणारे वाढू लागले आहेत, हे आशादायी आहे. शिक्षा व शिस्त यातील मूलभूत फरक उद्देशामध्ये असतो. शिस्त ही उद्दिष्टपूर्तीसाठी नवीन वर्तन शिकणे किंवा आवश्‍यक वर्तन दृढ करण्यासाठी असते, तर शिक्षा भूतकाळातील चुकांच्या भरपाईसाठी केल्या जातात. अमेरिकेतील शिक्षणअभ्यासक जेन नेल्सन यांनी मुलांना शिस्त लावताना सकारात्मक पद्धती कशा वापरता येतील, यावर बराच अभ्यास केला. त्यातून ‘तीन आर आणि वन एच’ हे शिस्तीचे सूत्र मांडले.

१.  Related (वर्तनाशी संबंधित परिणाम असावा) समजा मुलाने कोणाची वस्तू न विचारता घेतली आणि त्याला रात्रभर घराबाहेर उभे केले, तर मुलाला काय शिकायचे आहे, हे कळणार नाही. तर ज्याची वस्तू घेतली त्याला ती परत करणे, त्यांबद्दल माफी मागणे व त्यानंतर मुलाशी आदरपूर्ण संवाद साधल्याने ते वर्तन का टाळावे हे त्याला/तिला समजेल.
२. Respectful (मुले व मोठी माणसे यांचा आदर वाढविणाऱ्या पद्धती.) उदा. मूल चुकले आणि त्याला लाज वाटावी, या उद्देशाने सगळ्यांसमोर बोलले गेले तर त्यातून न्यून, राग अशा प्रतिकिया येतात. आदर राखून संवाद साधला तर तो दीर्घकाळ उपयोगी पडतो.
३.Reasonable (चुकांमुळे भोगावे लागणारे परिणाम चुकांच्या प्रमाणात असावे.) उदा : मुलाने अभ्यास केला नाही तर आठवडाभर त्याने खेळायला जाऊ नये, ही अवाजवी शिक्षा. वर्तनाचे परिणाम/किंमत हे मुलांच्या सहभागाने ठरवावेत.
४.  Helpful (शिस्त ही सहाय्यकारी असते) ठरवलेले वर्तन जमत नसेल तर त्याला त्याची आठवण द्यावी. टोमणे मारून, नावे ठेवून त्याला मदत होत नाही. ही तत्त्वे मुलांच्या निरोगी आत्मस्वीकारासाठी आवश्‍यक आहेतच; पण मोठ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत. नियम ठरविण्यातील मुलांच्या सहभागाने ते पाळण्यातील जबाबदारी वाढते. त्यांना हे समजते की नियम उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असतात, त्यांना चूक किंवा बरोबर ठरविण्यासाठी नाही. नियम हे दीर्घकाळ उपयोगी पडतील, असे ठरविल्याने मुलांवर सतत होणाऱ्या सूचनांचा भडिमार थांबतो, त्यामुळे त्यांची स्वप्रतिमा चांगली होण्यास मदत होते. ते स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला शिकतात, आणि परावलंबित्व हळूहळू कमी होते.

या विषयावर पुण्यातील अ-भय अभियान हा गट काम करतो. शिक्षेचे परिणाम समजावून देणे व सकारात्मकता शिस्तीच्या पद्धती रुजविण्यासाठी कार्यशाळा, व्याख्याने या माध्यमातून या गटाचे काम चालते. जेन नेस्लन यांनी सांगितलेल्या वर्गसभेचा प्रयोग अ-भय अभियानने करून पाहिला. वर्गसभांमध्ये वर्गातील प्रत्येक मुलाने सहभागी होऊन, वर्गातील प्रश्न सर्वांच्या सहभागाने सोडविणे अपेक्षित असते. या प्रयोगामुळे वर्गातील बेशिस्त वर्तनाचे तसेच शिक्षांचे प्रमाण घटलेले आढळले. म्हणूनच शिस्तीच्या सकारात्मक पद्धती समजून घेणे आवश्‍यक आहे.

शिक्षांचे दूरगामी परिणाम माणसांवर होत असतात म्हणून शिक्षा टाळल्या पाहिजेत. हे परिणाम समजण्यासाठी माणसाचे मन कसे काम करते हे समजून घेणे आवश्‍यक आहे. बहुतेकवेळा मोठ्या माणसांचे शिक्षेमागचे हेतू १. मुलानी अभ्यासात लक्ष द्यावे. २. मुलांनी चांगले वर्तन करावे. ३. मुलांनी चांगले नागरिक बनावे, असे असतात. पण शिक्षेतून ते साध्य होतात का, हे पाहावे लागेल. त्यासाठी आधी मेंदू कसे काम करतो, हे समजणे आवश्‍यक आहे.

माणूस आणि माणसाचा मेंदू उत्कांतीच्या अनेक आवर्तनांतून तयार झाला आहे. सगळ्यात आधी सरपट मेंदू, मग भावनिक मेंदू, आणि मग वैचारिक मेंदू आणि उत्क्रांतीचा सगळ्यात नवीन टप्पा म्हणजे नवमस्तिष्क अशा क्रमाने मेंदूचा विकास झाला आहे. सगळ्या भावनांचा उगम हा माणसाला जिवंत ठेवण्यासाठी झाला आहे. आपल्या मेंदूमध्ये जिथे भावनांचा उगम होतो तिथे अगदी छोटा, बदामाच्या आकाराचा एक भाग आहे ज्याला Amygdala असे म्हणतात. याचे काम संकटाची चाहूल घेणे, त्याबद्दल आपल्याला सावध करणे असे असते. मुलाना जेव्हा शिक्षा केली जाते तेव्हा हा amygdala काम करायला लागतो. अशा वेळी मेंदूचा जो भाग शिकण्यासाठी आवश्‍यक असतो तो काम करणे बंद करतो व केवळ आहे त्या परिस्थितीमधून सुटका करण्याचा मेंदू विचार करायला लागतो. अशावेळी कोणतेही नवीन शिकणे बंद होऊन जाते. म्हणजे शिक्षेचा हेतू अशावेळी साध्य होत नाही.
शिक्षा बऱ्याचदा मानसिकही असतात. उदा : अबोला. व्यंगावरून बोलणे, टोमणे मारणे, उपाशी ठेवणे इत्यादी. हे प्रकार मारापेक्षा गंभीर ठरू शकतात. माणूस शिकार करायला शिकला तिथून त्याचे समाजजीवन सुरू झाले. टोळीत राहणे, टोळीचे नियम पाळणे जगण्यासाठी आवश्‍यक आहे, हे त्याला कळू लागले, कारण जंगलातील जगणे अतिशय अवघड होते. त्या टप्प्यावर माणसाच्या दोन भावनिक गरजा निर्माण झाल्या. आपण गटाचा भाग असणे. तिथे महत्त्वाचे स्थान मिळणे. हे दोन्ही असेल तरच जगू शकतो, असे समीकरण उत्क्रांतीत पक्के झाले. त्यानंतर माणसाने गटात राहण्याच्या नवनवीन पद्धती शोधल्या. आता माणूस या टप्प्यावर आहे, की एखाद्या गटाच्या काही गोष्टी नाही पटल्या तर तो गट सोडू शकतो, बदलू शकतो; पण हे बाह्य बदल आहेत. मेंदूला याची सवय लावावी लागणार आहे. मोठ्या माणसांनाही हे अवघड जाते, तर लहान मुलांवर याचे परिणाम किती होत असतील? अबोला धरण्याचा परिणाम असा होतो, की मुलांना ते त्यांच्या चुकीबद्दल आहे, हे न समजता व्यक्ती म्हणूनच नाकारले जात आहे, अशी त्यांची भावना होते. त्यातून असुरक्षित वाटू लागते. मेंदू याचा अर्थ जैविक धोका असे घेतो आणि मग त्याला बरे वाटावे म्हणून त्या वेळी त्याला जे उपाय सुचतात ते ते करू लागते. वर्तन समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकतात. चिंता वा नैराश्‍य वाढू लागते. शिक्षांचा परिणाम विचारप्रक्रियेवरही होतो. शिक्षेपासून वाचण्यासाठी इतरांना काय बरोबर वाटेल याचाच विचार होतो आणि उत्स्फूर्त विचार मागे पडून चाकोरीबद्धता येते. समूहशरणताही वाढीस लागते.
शिक्षांमुळे एकूणच विश्वासाला तडा जातो आणि त्याचा परिणाम नातेसंबंध व पुढे वैवाहिक आयुष्यावरही नकारात्मक होतो.  त्यामुळे कोणत्याही विवेकी व शांतताप्रिय समाजासाठी अशा शिक्षा मारक ठरतात. म्हणून आनंदी बालपण व निरोगी समाजासाठी शिस्तीच्या सकारात्मक पद्धती सगळ्यांसाठीच आवश्‍यक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com