esakal | कलाबहर : ‘चित्रातील भावदर्शन महत्त्वाचे’ I Maruti Patil
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Patil

कलाबहर : ‘चित्रातील भावदर्शन महत्त्वाचे’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- गायत्री तांबे देशपांडे

आधी रेखाकला व रंगकला (पेंटिंग), मग उपयोजित कला आणि मग पुन्हा पेंटिंग... ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील यांचा हा प्रवास. ते जरी उपयोजित कला विभागाचे शिक्षक असले तरी आम्हा पेंटिंगच्या मुलांमधेही त्यांच्या कामाची चर्चा कायम असायची. बेळगावमधे शालेय शिक्षणानंतर चित्रमंदिरमधे ज्येष्ठ कलाकार के. बी. कुलकर्णीकडे त्यांचा पेंटिंगचा प्रवास सुरू झाला खरा; पण दोन वर्षांनी ते पुण्याला आले. परिस्थिती बेताची असल्याने `कमवा व शिका’ या तत्त्वावर जाहिरात कंपनीत काम करताना पुढील शिक्षण पुणे व नंतर मुंबईत घेतले. उपयोजित कलेचे शिक्षण घेतानाही पेंटिंगची, विशेषत: ड्रॉईंगची ओढ त्यांना कायम होती. दिवसभर काम केल्यावरही रात्री स्टेशनवर जाऊन स्केचिंग केल्याशिवाय त्यांना झोप येत नसे. मुंबईत काही काळ त्यांनी जाहिरात क्षेत्रात काम केले. पण ड्रॉईंगची ओढ स्वस्थ बसू देईना. पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात त्यांनी कलाशिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९६९ ची ही गोष्ट.

शिकवण्यात सर चांगले रमले आणि उरलेल्या वेळात निसर्गचित्र व स्केचिंगही ते करत. १९७०मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये म्हणून नेमणूक झाल्यावर ते मुंबईला निघाले, तेव्हा त्यांना अपघात झाला. मग त्यांनी पुण्यातच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचे ‘अभिनव’चे प्राचार्य डेंगळे सरांचा त्यांना पाठिंबा मिळाला आणि कुबड्या घेऊन पाटीलसर वर्गावर पुन्हा हजर झाले! सर पुन्हा आल्याने मुलांना आनंद झाला. हेड स्टडी आणि ड्रॉईंग शिकवताना सर रमून जात.

उपयोजित कलेचे तंत्र व विषय शिकवतानाच ड्रॉईंगची भूक सरांनी इलस्ट्रेशनची कामं करून भागविली. १९९२मध्ये व्यावसायिक कामं बंद करून पुन्हा एकदा पेन्सिल धरली आणि सराव सुरु केला तो परत मागे वळून न बघता.

१९९४ मध्ये राज्य पुरस्कार मिळाल्यावर त्यांना अतीव समाधानी मिळाले, याचे कारण त्यांचे पहिले प्रेम हे पेंटिंगच! पेन्सिलमधे भरपूर स्केचिंग, निसर्गचित्र, मग कलर पेन्सिल, वॉटरकलर, मग ऑइल आणि अॅक्रेलिक कलर असा सरांचा प्रवास पुढे गेला. ऑईल कलर त्यांचे आवडते माध्यम. "मला चित्राची आवड आहे आणि त्या आनंदासाठीच मी कायम चित्रं केली, विक्रीसाठी नव्हे!’ असे ते सांगतात. सरांच्या प्रत्येक चित्रातील रंग लेपण हे त्या चित्राच्या गरजेप्रमाणे त्याला पूरक असते. ते त्या चित्राच्या विषयानुरूप असावं, असं त्यांचं मत आहे. एकाच विशिष्ट रंग लेपणाच्या पद्धतीत अडकून त्याच पद्धतीत सर्व विषय मांडणे त्यांना योग्य वाटत नाही. सरांच्या चित्रांतील विषय म्हणजे त्यांच्या सुट्टीत गावात मुक्कामी असतानाच्या लहानपणीच्या अनुभवांचे चित्रण असावे.

अनेक माध्यमं हाताळताना सरांनी चित्रात अपेक्षित परिणाम मिळवण्याकरिता लागणारं तंत्र प्रत्येक वेळी वापरले. हे सर्व करताना त्यांच्या चित्रांवर व्यावसायिक व जाहिरातसंबंधित कामाचा प्रभाव कुठेही दिसत नाही. त्यांच्या डोक्यात त्या दोन गोष्टी त्यांनी वेगळ्या ठेवल्या. चित्रकलेबद्दल बोलताना ते सांगतात पेंटिंग बघताना माणूस पेंटिंगसमोर थांबला, की समजायचं त्या चित्रानी जिंकलंय त्याला. मग ते चित्र कुठल्याही शैलीतले असो. चित्रात जो एक वेगळेपणा लागतो, तो असल्याशिवाय चित्राचा दर्जा ठरत नाही. चित्र बघत बसावंसं वाटणं महत्त्वाचं. विषय साधा असला तरी चित्रकाराने तो कसा मांडलाय हे महत्त्वाचे. त्यात एक भाव असावा: तंत्राच्या पलीकडे जाऊन जेव्हा चित्रकार स्वतःशी एकरूप होऊन प्रामाणिकपणे ते चित्र करतो, तेव्हा ते रसिकांपर्यंत पोहोचतं." के.बी. कुलकर्णी सरांच्या तालमीत पाटील सरांचा रेखाकला व रंगकलेचा पाया मजबूत झाला. ‘त्यांच्यासारखे गुरू लाभले हे आमचे भाग्य ’असं ते सांगतात. "चित्र कशी बघायची हे शिकवून येत नाही. ती बघून बघूनच समजतात, कारण ही ''दृश्यकला'' आहे.’, हे सरांचे सांगणे मनापासून पटते.

loading image
go to top