महाजनांची मुक्ताफळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

"हे आपण विनोदाने बोललो होतो. तरीही कोणी दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्‍त करतो, माफी मागतो', अशी सारवासारव महाजनांनी नंतर केली. मात्र, त्यामुळे त्यांची स्वत:ची व सरकारची, पक्षाची जी बेअब्रू झाली ती भरून निघणार नाही. सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे त्यातून स्पष्ट झाले आहे

जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण वगैरे मोठमोठ्या खात्यांचा कारभार सांभाळणारे गिरीश महाजन यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या वादांची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कधी जाहीर कार्यक्रमात कमरेला रिव्हॉल्व्हर लावून भाषण, कधी अनावधानाने का होईना दाऊद इब्राहीमच्या नातलगांकडील लग्नाला हजेरी, कधी (कै.) आर. आर. पाटील यांच्या बंधूंना न मिळालेल्या कर्जमाफीचा आकडा, तर कधी जलसंपदा खात्यातल्या कंत्राटदारांकडून दाखवलेली लाचेची लालूच, अशा एका मागोमाग एका प्रकरणांमध्ये ते वादग्रस्त ठरत आले आहेत. ताजे प्रकरण त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे केलेल्या, साखर कारखान्यांमध्ये मळीपासून तयार होणाऱ्या दारूच्या ब्रॅंडला महिलांचे नाव देण्याच्या वक्‍तव्याचे आहे. (कै.) पी. के. अण्णा पाटील यांनी स्थापन केलेल्या व त्यांचे पुत्र दीपक पाटील चालवित असलेल्या सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ महाजन व जयकुमार रावल या खानदेशातील दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी कारखान्याचा "महाराजा' हा दारूचा ब्रॅंड फारसा विकला जात नाही, या तक्रारीच्या अनुषंगाने महाजनांनी वादग्रस्त वक्‍तव्य केले. ""भिंगरी, ज्युली वगैरे राज्यातल्या अन्य कारखान्यांचे ब्रॅंड महिलांच्या नावाने असल्याने ते विकले जातात. तेव्हा "महाराजा' नव्हे, तर "महाराणी' असे नाव ठेवा'', असा अजब सल्ला त्यांनी दिला.

"हे आपण विनोदाने बोललो होतो. तरीही कोणी दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्‍त करतो, माफी मागतो', अशी सारवासारव महाजनांनी नंतर केली. मात्र, त्यामुळे त्यांची स्वत:ची व सरकारची, पक्षाची जी बेअब्रू झाली ती भरून निघणार नाही. सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, हे त्यातून स्पष्ट झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाजनांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन झाले. चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांत तक्रार दाखल झाली.

जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वादात माजी मंत्री एकनाथ खडसे व गिरीश महाजन ही दोन टोके आहेत. पक्षाने खडसेंना दूर व महाजनांना जवळ केले आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यातूनच दरवेळी वाद उद्‌भवला, की पक्षांतर्गत व बाहेरचे विरोधक त्यांच्यावर तुटून पडतात आणि महाजनांना सांभाळून घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येते. तेव्हा, "या गिरीश महाजनांचं करायचं तरी काय', हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्‍न खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही पडलेला असल्यास नवल नाही.

Web Title: girish mahajan bjp