माओवाद्यांना द्या संघटित उत्तर

मिलिंद महाजन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

माओवाद्यांच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे  माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे. परंतु केवळ लष्करी कारवाईवर विसंबून न राहता सर्व आघाड्यांवर  माओवाद्यांच्या विरोधातील लढाई लढावी लागणार आहे. याचे कारण मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून भारतीय राज्ययंत्र खिळखिळे करणे हा त्यांचा उद्देश आहे.   

माओवाद्यांच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे  माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे. परंतु केवळ लष्करी कारवाईवर विसंबून न राहता सर्व आघाड्यांवर  माओवाद्यांच्या विरोधातील लढाई लढावी लागणार आहे. याचे कारण मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून भारतीय राज्ययंत्र खिळखिळे करणे हा त्यांचा उद्देश आहे.   

त्यांच्या संघटनेचे तीन भाग आहेत. एक, माओवादी पक्ष (सी.पी.आय. माओवादी), दोन, माओवादी लष्कर (पीएलजीए) आणि तीन माओवादी फ्रंट संघटनांची संयुक्त आघाडी (युनायटेड फ्रंट). माओवादी पक्ष हा सर्वोच्च असून, त्याच्या आदेशाप्रमाणे माओवादी लष्कर आणि फ्रंट संघटना काम करतात. जंगल भागात बंदुका घेऊन फिरणारे माओवादी सैनिक आणि शहरी भागातून त्यांचे समर्थन करणारे फ्रंट संघटनांमधील विद्वान ही एकाच माओवादी पक्षाच्या हातातील दोन हत्यारे आहेत. माओवादी लष्कराने जंगलात हत्यासत्र चालवायचे आणि शहरातील माओवादी फ्रंट संघटनांनी पोलिस व सरकारी यंत्रणेच्या पाठीत खंजीर खुपसायचा, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. 

माओवाद्यांच्या तात्त्विक गप्पा नेहमीच आकर्षक वाटतात; पण त्यांचे खरे रूप त्यांनी केलेल्या कृतीतूनच लक्षात येते. माओवाद्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कृत्यांची थोडी माहिती खाली देत आहे. त्यावरूनच त्यांचे योग्य मूल्यमापन करता येईल. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात पोलिस स्टेशन गंगालूरच्या हद्दीत तोळका हे एक खेडे आहे. या खेड्यात ताती आयतू हा आपल्या मुलाबाळांसह राहत होता. तातीला चार महिन्यांचा सोमरू नावाचा मुलगा होता.

माओवाद्यांनी गावाजवळ एक ‘जन अदालत’ आयोजित केली. गावागावांतील अनेक लोक तेथे उपस्थित होते. ताती आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांना ‘जन अदालत’समोर उभे करण्यात आले आणि कुठल्यातरी फुसक्‍या आरोपावरून सर्व गावकऱ्यांसमक्ष माओवाद्यांनी तातीला बेदम मारहाण करणे सुरू केली. आक्रोश करणाऱ्या त्याच्या पत्नी व बहिणीला न जुमानता तातीला मारणे सुरूच होते. ‘जनअदालत’मध्ये मारहाण सुरू असताना एका गाफिल क्षणाचा फायदा घेऊन ताती आयतू माओवाद्यांच्या तावडीतून निसटला आणि जिवाच्या आकांताने जंगलात पळून गेला. सर्व जनतेसमोर ताती अशा रीतीने पळून गेल्यामुळे माओवाद्यांची फजिती झाली. संतापलेल्या माओवाद्यांनी तातीच्या पत्नीच्या कडेवर असलेल्या चार महिन्यांच्या सोमरूला हिसकले आणि रानटीपणाचा कळस म्हणजे लोखंडी सळाखींनी सोमरूला ठेचून ठार मारले आणि भयंकर आकांत करणाऱ्या त्याच्या आईचा डोळ्यांदेखत सोमरूच्या मृतदेहाला जमिनीत पुरले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते.

क्षुल्लक कारणावरून नेहमीच आरडाओरड करणाऱ्या माओवादी फ्रंट संघटनांनी या अमानुष घटनेचा साधा निषेधदेखील केला नव्हता. सरकार आणि पोलिस यांच्याविरोधात सतत आक्रस्ताळेपणाने आंदोलने करणाऱ्या माओवादी फ्रंट संघटनांनी चार महिन्यांच्या निष्पाप आदिवासी बालकाचा नृशंस खून करणाऱ्या माओवाद्यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारू नये, यातूनच सारे चित्र स्पष्ट होते. माओवादी स्वतःला महान क्रांतिकारक म्हणवून घेतात. एका चार महिन्यांच्या असहाय्य अजाण आदिवासी बालकाला ठेचून मारल्याने माओवाद्यांनी अशी कोणती क्रांती केली आहे, याचे स्पष्टीकरण माओवादी फ्रंट संघटनांमधील विद्वान मंडळींनी द्यावे, असे वाटते. खून आणि कत्तली करून समाजात जी दहशत निर्माण होते, त्या दहशतीच्या जोरावर भारताची राजकीय सत्ता ताब्यात घेणे, हेच खरे माओवादी उद्दिष्ट आहे. म्हणून याबाबत सविस्तर माहिती असणे आवश्‍यक आहे.

‘स्ट्रॅटेजी ॲन्ड टॅक्‍टिक्‍स ऑफ इंडियन रिव्हॉल्यूशन’ हे माओवाद्यांनी छापलेले त्यांचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक आहे. याच पुस्तकावरून त्यांच्याबद्दल खरी व अस्सल माहिती उपलब्ध होते. माओवाद्यांनी काय साध्य करावयाचे आहे आणि ते निश्‍चित कोणत्या प्रकाराने साध्य करणार आहेत, या सर्व बाबींचा यात स्पष्ट उल्लेख आहे. 

सुरवातीलाच माओवादी लिहितात, ‘‘आज अस्तित्वात असलेली राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि संपूर्ण सामाजिक व्यवस्था नष्ट करून त्या जागी नवीन माओवादी व्यवस्था स्थापन करणे, हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.’’ (पान नं. २६).

माओवादी पुढे लिहितात, ‘‘शस्त्रबळावर भारताची राजकीय सत्ता कब्जात घेणे सत्ताप्राप्तीचा हा विषय युद्धाद्वारे निकाली काढणे हेच आमचे ध्येय आहे आणि यासाठी माओवादी लष्कर उभारून युद्धाद्वारे भारतीय लष्कर पोलिस आणि संपूर्ण प्रशासन व्यवस्था नष्ट करणे, हे क्रांतीचे मुख्य स्वरूप आहे. चीनच्या क्रांतीचा मार्ग हाच आमचा मार्ग आहे आणि तो मार्ग आहे प्रदीर्घ युद्धाचा.’’ (पान २९).

माओवाद्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे आणि देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट करून हिंसक मार्गाने देशाची राजकीय सत्ता उलथविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच माओवाद्यांच्या ‘फ्रंट संघटनां’च्या विरोधात सर्वसामान्य भारतीय नागरिक संघटित होऊन संघर्ष करतील आणि मोओवाद्यांचा देशद्रोही, समाजद्रोही डाव हाणून पाडतील, हा विश्‍वास अवाजवी ठरणार नाही.

Web Title: Give the Maoists an organized answer milind mahajan article