इतने बडे देश में...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

गोरखपूर येथील "बालकांडा'नंतर कॉंग्रेसने आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला आहे. त्यावरही शहा यांच्याकडे "रोखठोक' उत्तर होतेच. "कॉंग्रेसचे कामच राजीनामे मागणे, हे आहे. आमचा पक्ष चौकशीविना कोणाचाही राजीनामा घेणार नाही!' असे बाणेदार उत्तर शहा यांनी पत्रकारांना दिले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर या बालेकिल्ल्यातील बाबा राघवदास इस्पितळात प्राणवायूचा पुरवठा खंडित झाल्यामुळे किमान 63 बालकांचा बळी गेला आणि देशातील घर आणि घर हळहळले. त्यानंतर सोशल मीडियावर प्रख्यात कवी गुलजार यांच्या नावाने "जनाजेपर फूल हम हमेशा देखते है... लेकिन फुलों का जनाजा हमने पहिली बार देखा...' अशा चार पंक्‍ती फिरवल्या गेल्या. त्यामुळे अनेकांना हुंदका आवरला नसेल. मात्र, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या घटनेपेक्षाही मोठा धक्‍का अवघ्या भारतवर्षाला आपल्या उद्दाम वक्‍तव्याने दिला. "इतने बडे देश में बहुत सारे हादसे हुअे... पहिली बार ऐसा हादसा नहीं हुआ है...' असे जाज्ज्वल्य उद्‌गार शहा यांनी बंगळुरातील पत्रकार परिषदेत काढले आणि अशा प्रसंगीही आपण "मृदुनि कुसुमादपि...' होण्याऐवजी "वज्रादपि कठोराणि...' होऊ शकतो, याचीच प्रचिती आणून दिली. अर्थात, राज्यकर्त्या पक्षाच्या प्रमुखाला भावनांना आवर हा घालता आलाच पाहिजे आणि प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होऊन निर्णय घ्यायला हवेत, याच भूमिकेतून शहा यांनी हे कठोर उद्‌गार काढले असणार, यात शंका नाही.

मात्र, सर्वसामान्य आणि मूढ जनांच्या मनात त्यामुळेच काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत आणि एका जुन्या प्रसंगाची त्यांना आठवण होणेही साहजिक आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा तोल गेला आणि "इतने बडे शहर में कही छोटे छोटे हादसे होते है...' अशा आशयाचे उद्‌गार त्यांच्या तोंडून निसटले. त्यामुळे प्रचंड गदारोळ उठला आणि आबांना त्याची किंमत राजीनामा देऊन मोजावी लागली. मात्र, तो जमाना कालबाह्य झाला असून, आता भावनांना दूर सारून कठोरपणे कर्तव्य बजावणाऱ्या राज्यकर्त्यांचा जमाना आला आहे, हेच शहा यांनी दाखवून दिले. गोरखपूर येथील "बालकांडा'नंतर कॉंग्रेसने आदित्यनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला आहे. त्यावरही शहा यांच्याकडे "रोखठोक' उत्तर होतेच. "कॉंग्रेसचे कामच राजीनामे मागणे, हे आहे. आमचा पक्ष चौकशीविना कोणाचाही राजीनामा घेणार नाही!' असे बाणेदार उत्तर शहा यांनी पत्रकारांना दिले. मात्र, ते पत्रकार बंगळूरचे असल्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचा राजीनामा मात्र चौकशीविना का घेतला होता, असा प्रश्‍न त्यांना पडला नाही. अर्थात, तो कोणी विचारला असताच, तर त्यालाही काही तडाखेबंद उत्तर कर्तव्यकठोर शहा यांनी दिले असतेच, ही बाब निराळी!

Web Title: gorakhpur tragedy uttar pradesh amit shah