गुरूंचाच पाया हवा पक्का!

Sampadak
बुधवार, 6 जुलै 2016

2 जुलै 2016 च्या "सकाळ‘मधील "गुरू बिनज्ञान‘ हा संपादकीय लेख वाचला. संपादकांनी बिहार व उत्तर प्रदेशमधील शैक्षणिक (अ)ज्ञानाचा खरमरीत समाचार घेतला. शेवटी महाराष्ट्रातील विद्यापीठांविषयी, त्यांच्या कामकाजाविषयी चिंता व्यक्त केली व समाजमनाला जागे केले, धन्यवाद! 

2 जुलै 2016 च्या "सकाळ‘मधील "गुरू बिनज्ञान‘ हा संपादकीय लेख वाचला. संपादकांनी बिहार व उत्तर प्रदेशमधील शैक्षणिक (अ)ज्ञानाचा खरमरीत समाचार घेतला. शेवटी महाराष्ट्रातील विद्यापीठांविषयी, त्यांच्या कामकाजाविषयी चिंता व्यक्त केली व समाजमनाला जागे केले, धन्यवाद! 

महाराष्ट्राची शैक्षणिक परंपरा थोर आहे. अनेक थोर शिक्षणमहर्षींनी समाजोपयोगी आणि जीवनोपयोगी शिक्षण देऊन समाज ज्ञानी बनवला, घडवला. पण आजची स्थिती काय आहे? आजची शैक्षणिक धोरणे खरेच विद्यार्थी घडवत आहेत का? विशेषतः प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का होतोय का? वाचन -लेखन कौशल्ये विकसित होत आहेत का? किती विद्यार्थी न पाहता चार वाक्‍य शुद्ध, अचूक लिहू शकतात? माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतही अंतर्गत गुण मिळत असल्याने जे विद्यार्थी कमी प्रयत्नात बोर्ड परीक्षा सुटतात ते पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात प्रविष्ट होतात. वाचन-लेखनाचा पाया कच्चा असूनही याच पद्धतीने पदवी घेऊन बाहेर पडतात.
देणग्या घेऊन प्रवेश देणारी ट्रेनिंग कॉलेजेस विद्यार्थ्यांना कागदोपत्री पदवी देण्याचे काम करतात. शिक्षक म्हणून तयार करून घेणे राहूनच जाते. यातले जे मूळचेच हुशार आहेत ते त्यांची पुढील वाटचाल यशस्वीपणे करू शकतात; पण ज्यांचा पायाच कच्चा आहे तेही शिक्षक झालेत.
पाया पक्का न होताच, नापास करायचेच नाही, म्हणून आठवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी वरच्या वर्गात घालणे कितपत योग्य आहे? अंतर्गत मूल्यमापनासह विद्यार्थ्यांची टक्केवारी हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे बाळसे नसून सूज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे. त्यांच्या आयुष्यातील घडण्याचा महत्त्वाचा काळ असा वाया जातोय. ठोस पावले उचलून प्राथमिक शिक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे.

Web Title: guruncha paya pakka hava