esakal | सर्च-रिसर्च : ‘शतायुषी’चे जपानी रहस्य
sakal

बोलून बातमी शोधा

Japan-Food

जपानी लोकांचे आयुष्यमान खूपच अधिक असते व त्याबद्दल कायमच आश्‍चर्य व्यक्त केले जाते. जपानी लोक असे काय खातात की त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते, हा प्रश्न आता जगभरात विचारला जात आहे. जपानी लोक काय खातात यापेक्षा ते कसे खातात, हे महत्त्वाचे आहे, असे संशोधकांच्या निष्कर्षांतून समोर आले.

सर्च-रिसर्च : ‘शतायुषी’चे जपानी रहस्य

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

जपानी लोकांचे आयुष्यमान खूपच अधिक असते व त्याबद्दल कायमच आश्‍चर्य व्यक्त केले जाते. जपानी लोक असे काय खातात की त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते, हा प्रश्न आता जगभरात विचारला जात आहे. जपानी लोक काय खातात यापेक्षा ते कसे खातात, हे महत्त्वाचे आहे, असे संशोधकांच्या निष्कर्षांतून समोर आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपानमध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमधील ४८ लोक शंभरी ओलांडतात. इतर लोक असे काय करतात जे जपानी करीत नाहीत, वयोमानाचा संबंध त्यांच्या खाद्यसंस्कृतीशी जोडला जातो काय, हे प्रश्‍न संशोधकांना पडले. अमेरिकेतील संशोधक ॲन्सेल किज यांनी १९७०मध्ये केलेल्या अभ्यासात इटलीमधील शंभरी ओलांडलेल्यांच्या अन्नात ॲनिमल फॅट कमी असल्याचे दिसून आले. आहारतज्ज्ञ वॉल्टर विलेट यांच्या १९९०मधील संशोधनात जपानमधील शंभरी ओलांडलेल्यांचा उल्लेख प्रथम आला व त्यांनी जपानमध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण जगात सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट केले. या व अशा अनेक संशोधनांमुळे आयुष्यमानाचा खाद्यसंस्कृतीशी संबंध आहे काय, हा प्रश्न उपस्थित झाला. जपानमधील साथीच्या आजारांचे तज्ज्ञ क्षी झांग यांच्या मते, ‘‘जपानची खाद्यसंस्कृती एक विस्तीर्ण संकल्पना आहे. फक्त सुशी डिश घ्या, असे ती कधीच सांगत नाही. या खाद्यसंस्कृती संदर्भातील विविध ३९ संशोधनांचा विचार केल्यास, मासे, भाज्या, सोयाबीन, त्याचबरोबर सोया सॉस, भात व मिसो सूप यांचा समावेश जपान्यांच्या जेवणात आढळतो. याच डाएटमुळे जपानमध्ये हृदयविकार व कर्करोगाचे कमी रुग्ण आढळतात आणि त्याचबरोबर आयुष्यमानही अधिक असते.’’

जपानमधील टोहोकू विद्यापीठातील संशोधक टुयोशी सुडुकी यांनी जपानमधील नक्की कोणत्या डाएटमुळे आयुष्यमान वाढते, यावर संशोधन केले. जपान व अमेरिकेत १९९०मध्ये घेतलेले जाणारे डाएट त्यांनी उंदरांना तीन आठवड्यांसाठी दिले. विशेष म्हणजे, दोन्ही डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने व कर्बोदकांचे प्रमाण सारखेच असूनही, जपानी डाएट घेतलेल्या उंदरांच्या उदरामध्ये व रक्तात चरबीचे प्रमाण कमी आढळले. म्हणजेच, तुमच्या ताटात मांस आहे की मासे, तांदूळ आहे की गहू या गोष्टी निर्णायक ठरतात. मात्र, जागतिकीकरणानंतर जपानी खाद्यसंस्कृतीही बदलली असल्याने गेल्या ५० वर्षांचा अभ्यास करण्याचे ठरले. त्यासाठी १९६०, १९७५, १९९० व २००५ मधील जपानी खाद्यसंस्कृती निवडली गेली. या काळातील खाद्यपदार्थ उंदरांना देऊन आठ महिने निरीक्षणे नोंदवण्यात आली. त्यातून सर्वच जपानी डाएट एकसमान नसल्याचे दिसले. १९७५ च्या डाएटवर पोसलेल्या उंदरांमध्ये मधुमेहाची शक्‍यता सर्वांत कमी आढळली आणि त्यांच्यात फॅटी लिव्हर हा आजारही इतर डाएट घेणाऱ्यांपेक्षा कमी आढळला. हेच डाएट घेतलेल्या उंदरांच्या यकृतांचा अभ्यास केल्यावर त्यांच्यात फॅटी ॲसिड निर्माण होण्यास प्रतिबंध करणारी जनुकेही तयार झाल्याचे दिसली.

१९७५च्या या डाएटमध्ये समुद्री शैवाल व मासे, कडधान्ये, फळे, आंबवलेले पदार्थ विपुल होते. त्याचबरोबर अतिवजन असलेल्या दोन गटांना सध्याचे व १९७५चे जपानी डाएट  दिल्यानंतर, १९७५च्या गटाचे वजन अधिक कमी झाल्याचे व कोलेस्टरॉलचे प्रमाणही नियंत्रणात आल्याचे दिसले. सुडुकी यांच्या मते, ‘‘जपानी डाएटचे फायदे त्यातील शैवाल किंवा सोया सॉसमुळे नसून, अन्नघटकांत असलेल्या विविधतेत आहे. जपानमध्ये पदार्थ तळण्यापेक्षा उकडले किंवा वाफवून घेतले जातात. या डिशेस सजवण्यासाठी वरून साखर किंवा मिठाऐवजी तीव्र चवीचे पदार्थ कमी प्रमाणात घातले जातात.’’ संशोधकांचा हा सल्ला सर्वांच्याच उपयोगाचा आहे. मात्र, तो न ऐकल्याने आता जपानमध्ये मधुमेहासारख्या समस्या डोकावू लागल्या आहेत आणि त्यांचा ‘शतायुषींचा देश’ हा मानही जाण्याचा धोका आहे.

loading image