सर्च-रिसर्च : ‘कोरोना’ चाचणी नि काठिण्य पातळी

Corona-Test
Corona-Test

जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यात त्याच्या चाचण्या सर्वांधिक महत्त्वाच्या ठरत आहेत. काही देशांनी चाचण्यांत आघाडी घेतली असली, तरी लागणारा वेळ, नमुने गोळा करण्यातील अडचणी, चाचण्यांसाठीचा कच्चा माल आणि उपकरणे व बिनचूक निदान करणारे तज्ज्ञ यांबाबतीत सर्वच देशांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

चाचण्या कठीण का?
‘कोरोना’च्या चाचण्यांसाठी अनेक प्रक्रियांमध्ये समन्वय गरजेचा असतो. सर्वप्रथम चाचण्यांसाठीचे किट, नाकातून नमुना गोळा करणारे लांब स्वॅब आणि त्यावर प्रक्रियेसाठीची रसायने लागतात. हे स्वॅब निष्णात तंत्रज्ञ असलेल्या प्रयोगशाळेत पाठवले जातात. ते पीसीआर मशिनद्वारे नमुन्यांचे पृथःकरण करतात व त्याचे निकाल अधिकृत संस्थेकडे पाठवतात. कोरोना विषाणू नवा असल्याने प्रयोगशाळांकडे ही सर्व व्यवस्था नाही.

चाचण्यांसाठीचा कच्चा माल, त्याची शुद्धता आणि सुमारे वीस रसायनांचे योग्य मिश्रण, किटचा विशिष्ट ब्रॅण्ड या गोष्टीही जुळून याव्या लागतात व त्यामुळे चाचणी प्रक्रिया किचकट बनते. याच्या जोडीला सरकारी मान्यताप्राप्त उपकरणांची कमतरताही जाणवते. काही देशांनी प्रयोगशाळांना स्वतःच्या चाचण्या विकसित करण्याची परवानगी दिली असली, तरी त्यांना उपकरणाच्या गरजेनुसार त्यात बदल करावे लागत आहेत. चाचणी जितकी सोपी, तितकी तिच्या उपकरणाची निर्मिती अवघड असते. ‘कोविड -१९’च्या सुरुवातीच्या चाचण्यांना चार तास लागत होते. रोच आणि ॲबोट कंपनीची उपकरणे मात्र एकाच वेळी ८० ते १०० नमुने तपासू शकतात, मात्र, वेगवान व स्वस्त उपकरणांचा बाजारात मोठा तुटवडा आहे. ही सर्व सिद्धता झाल्यानंतर प्रत्यक्ष चाचण्या सुरू होतात. त्यासाठी घशातून नमुना गोळा करणाऱ्या स्वॅबची गरज असते. कान साफ करणाऱ्या बडसारखे दिसणारे, मात्र नायलॉन किंवा फोमपासून बनवलेले हे स्वॅब खूप लवचिक असणे गरजेचे असते. सध्या त्यांचा तुडवडा आहे. काही कंपन्यांनी थ्री डी प्रिटिंग तंत्राद्वारे स्वॅबची निर्मिती सुरू केली असली, तरी त्यात अनेक समस्या आहेत. विक्रेते स्वॅबसाठी दहापट अधिक किंमत आकारत आहेत.

पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?
रुग्णाची चाचणी घेतल्यानंतर हे स्वॅब काचेच्या निर्वात पेटीमध्ये ठेवावे लागतात. ही प्रक्रिया अत्यंत थोकादायक असते. कारण नमुन्यातील एका कणामध्ये ‘कोरोना’चे लाखो विषाणू असतात व ते तंत्रज्ञांसह सर्व प्रयोगशाळेला संसर्ग पोचवू शकतात. तो कण दुसऱ्या नमुन्यापर्यंत पोचल्यास चाचण्यांचे निकाल चुकीचे येऊ शकतात. एक चूक खूप नुकसान करू शकते, असे डॉ. किंबर्ले चॅप्लिन हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात. ‘कोरोना’ चाचणीमध्ये स्वॅबवर नाकातून घेतलेल्या चिकट द्रव्यातून संभाव्य विषाणू वेगळा करणे आणि त्याची खात्री पटवणे या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया असतात. सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असलेले तंत्रज्ञ नमुना असलेल्या ट्यूब उपकरणावर चढवतात. तेथे कोरोना विषाणूचे कवच (क्राउन) तोडले जाते व शुद्ध ‘आरएनए’ वेगळा केला जातो. तो एका काचपट्टीवर घेऊन ती मशीनमध्ये ठेवतात. तेथे रसायने या विषाणूच्या जिनोमचे अब्जावधी तुकडे करतात. फ्युरोसंट प्रोबद्वारे या तुकड्यांची ओळख पटवली जाते. ‘कोविड -१९’चा विषाणू असल्यास प्रोब उजळतो, अन्यथा उजळत नाही. अशाप्रकारे रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे ठरते.

एकंदरीत, अनेक अडचणी असलेली ‘कोरोना’ चाचणी ही डॉक्‍टर व तंत्रज्ञांपुढे मोठे आव्हान ठरली आहे. भविष्यात जगाला सतत नव्या विषाणूच्या चाचण्यांसाठी सज्ज राहावे लागणार, हा धडा ‘कोरोना’ने नक्कीच दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com