esakal | सर्च-रिसर्च : ...तर मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ही फायद्याचा! 
sakal

बोलून बातमी शोधा

Screen-Time

‘कोरोना’मुळे जग बदलतेय हे तर निश्‍चितच. रोज शाळेत जाणारी मुले आता मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळेच मुलांचा स्क्रीन टाइम हा पारंपरिक विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. संशोधकांच्या मते, स्क्रीन संवादी (इंटरॲक्‍टिव्ह) असल्यास त्याचा मुलांना फायदाच होतो.

सर्च-रिसर्च : ...तर मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ही फायद्याचा! 

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

‘कोरोना’मुळे जग बदलतेय हे तर निश्‍चितच. रोज शाळेत जाणारी मुले आता मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळेच मुलांचा स्क्रीन टाइम हा पारंपरिक विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. संशोधकांच्या मते, स्क्रीन संवादी (इंटरॲक्‍टिव्ह) असल्यास त्याचा मुलांना फायदाच होतो. मुलांच्या हातात लहानपणापासूनच टीव्हीचा रिमोट, टॅब्लेट किंवा फोन आल्यामुळे त्याचा परिणाम विपरीतच होतो, हा मुद्दा संशोधक खोडून काढतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाचनामुळे मुलांच्या आकलनविषयक क्षमता अधिक विकसित होतात. मात्र त्याचवेळी सध्याच्या पिढीच्या आजूबाजूला केवळ स्क्रीन आणि स्क्रीनच आहेत. एका पाहणीनुसार शून्य ते दोन वयोगटातील मुलांचा रोजचा स्क्रीन टाइम तीन तास असून, तो गेल्या दोन दशकांत दुप्पट झाला आहे. त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या मुलांमधील ४९ टक्के जणांचा स्क्रीन टाइम दोन तास, तर १६ टक्के जणांचा चार तासांपेक्षा अधिक आहे. स्क्रीन टाइम वाढताच मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होतात, बॉडी मास इंडेक्‍स वाढतो, झोप कमी होते. स्वतःच्या बेडरूममध्ये टीव्ही असलेल्या मुलांची झोप रोज ३१ मिनिटांनी कमी होत असल्याचे ही पाहणी सांगते. मात्र, टीव्हीवर शैक्षणिक कार्यक्रम पाहणे फायद्याचे ठरते, असेही आढळून आले. हा फायदा दोन वर्षांपुढील मुलांमध्येच दिसून येतो. शैक्षणिक कार्यक्रमांमुळे मुलांची वर्तणूक, साक्षरता व आकलन क्षमतेत वाढच होते. फिलाडेल्फियामधील टेम्पल युनिव्हर्सिटीतील संशोधक कॅथे पॅसेक यांच्या मते, ‘‘शैक्षणिक टीव्ही मुलांसाठी वाईट नाहीच, उलट त्याचा उपयोग शिकवणी वर्गासारख्या इतर सुविधा कमी असलेल्या मुलांना होतो. मात्र, बातम्या आणि इतर आक्षेपार्ह कार्यक्रम मुलांसाठी मारक ठरतात.’’ 

मुले स्क्रीन टाइम अविचाराने, निष्क्रियपणे (पॅसिव्ह) घालवतात हे घातक ठरते. एका अभ्यासानुसार, मुले एखादा नवा शब्द स्क्रीनवर निष्क्रियपणे शिकण्यापेक्षा शिक्षक आणि पालकांकडून किंवा संवादी व्हिडिओ कॉलद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. लहान मुलांचा मेंदू वेगाने विकसित होत असतो. त्यांचा पालकांशी संवाद महत्त्वाचा ठरतो. स्क्रीन टाइम वाढल्यास मुलांच्या त्रिमितीय विश्वाची कल्पना करण्याच्या शक्तीवर विपरीत परिणाम होतो. पंधरा महिन्यांची मुले टॅब्लेटचा उपयोग करून नवे शब्द शिकतात, मात्र त्याचा उपयोग व्यवहारात करताना त्यांना अडचण निर्माण होते. 

‘टीव्हीचा अतिवापर आणि सर्जनशील कल्पनाशक्ती यावर अनेक संशोधने झाली आहेत. ताज्या संशोधनात शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्क्रीन टाइम वाढल्यास त्यांची कल्पनाशक्ती कमी होत असल्याचे आढळले. कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण न पाहिलेल्या ठिकाणी पोचू शकतो, तसेच एखादी क्रिया फक्त पाहून, ती प्रत्यक्ष न करता मेंदूमध्ये साठवू शकतो. यासाठी ३ ते ९ या वयोगटातील २६६ मुलांच्या कल्पनाशक्तीचा अभ्यास केला गेला. मुलांना गुळगुळीत दगड हाताला मऊ लागतो, तर टाचणी टोचते हे त्यांच्या मेंदूत तयार झालेल्या अनुभवांतून कळते, फक्त स्क्रीनवर शिकवून नाही. त्यामुळे टीव्हीसारखा पॅसिव्ह किंवा गेमिंगसारखा इंटरॲक्‍टिव्ह स्क्रीन टाइमही मुलांच्या कल्पनाशक्तीत घटच करतो. याचे कारण स्क्रीन आपले डोळे आणि कानांना माहिती पुरवतात, मात्र स्पर्श, चव किंवा तोल सांभाळण्यासारख्या गोष्टींना सहभागी करीत नाहीत. आता या संवेदना जागृत करण्याची वेळ आली आहे.

क्रिएटिव्ह खेळ खेळण्यास देऊन, व्हिडिओ कॉलवर व्हर्च्युअल गोष्टी सांगून, चांगल्या प्रकारे विकसित केलेल्या इंटरॲक्‍टिव्ह स्क्रीनचा वापर करून, लाईव्ह व्हिडिओ दाखवून, स्क्रीनचाच माध्यम म्हणून वापर करीत आपण मुलांची कल्पनाशक्ती वाढवू शकतो. अशा वेळी सर्व स्क्रीन्सना ‘स्क्रीन टाइम’च्या नावाखाली दडपून टाकत त्यापासून दूर जाण्याची गरज पालकांना पडणार नाही,’’ असे जर्मनीतील रेगेन्सबर्ग विद्यापीठातील संशोधक सेबेस्टिअन सगेट यांनी स्पष्ट केले. 

Edited By - Prashant Patil