सर्च-रिसर्च : ‘कोरोना’वर व्हेंटिलेटरची मात्रा!

Ventilator
Ventilator

कोरोना विषाणूचे संकट जगभरात गंभीर स्वरूप धारण करीत आहे. या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने रुग्णांना वाचवणे अवघड बनत चालले आहे. या परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्‍टरांच्या हाती असलेले महत्त्वाचे उपकरण म्हणजे व्हेंटिलेटर. पण त्याच्या जगभरातील तुटवड्यामुळे अभियंते व संशोधकांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. संशोधक वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचे मार्ग शोधत आहेत.

मात्र, धातूचा वापर, संसर्ग टाळणारे सुटे भाग, डॉक्‍टरांना सहज वापरता येणारे तंत्र व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कधीही बंद न पडण्याची हमी ही मोठी आव्हाने आहेत. भारतामध्येही दहा लाखांवर व्हेंटिलेटरची गरज असताना केवळ ५० हजार उपलब्ध आहेत.

व्हेंटिलेटरमध्ये कोणतेही गुंतागुंतीचे तंत्र वापरले जात नाही. रुग्णाच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्यावर त्यांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करणारे हे साधे पंप असतात. मात्र, रुग्णाचे प्राण वाचवणे आवश्‍यक असताना हे पंप बंद पडू नयेत यासाठी व्हेंटिलेटर अत्यंत विश्‍वासार्ह असणे गरजेचे असते. या संदर्भात मॉरिको टोरो हे कोलंबियातील अभियंते सांगतात, ‘‘पंप बिघडल्यास रुग्ण दगावण्याची भीती असते व हेच व्हेंटिलेटरच्या निर्मितीतील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यांना विश्‍वासार्ह बनविण्यासाठी उत्पादन सुरू करण्याआधी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेणे गरजेचे असते. त्यासाठी किमान १८ महिन्यांचा कालावधी लागतो व सध्याच्या स्थितीत हा कालावधी खूपच मोठा आहे. यासाठी अनेक देशांच्या सरकारांनी वैद्यकीय उत्पादने न घेणाऱ्या व विद्यापीठांनाही युद्धपातळीवर प्रयत्न करून व्हेंटिलेटर बनविण्यास सांगितले आहे.’’ ‘फिलिप्स’ या वैद्यकीय उपकरणे बनविणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांची भरती करून व्हेंटिलेटरची मागणी पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, चीनमधून सुटे भाग पोचत नसल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. ‘डायसन’ या व्हॅक्‍युम क्‍लीनर बनविणाऱ्या कंपनीनेही दहा हजार व्हेंटिलेटर बनविण्याचे काम सुरू केले आहे.

अतिगंभीर परिस्थिती नसलेल्या रुग्णांसाठी ‘स्मिथ्स’ या कंपनीने झोपेच्या आजारावर वापरली जाणारी कंटिन्यूअस पॉझिटिव्ह एअर प्रेशर (सीपीएपी) ही उपकरणे देऊ केली आहेत. संशोधकांनी व्हेंटिल नावाचे मशीन तयार केले असून, ते व्हेंटिलेटरला जोडून एकाच वेळी दोन रुग्णांसाठी वापरता येते. आफ्रिका खंडातील आणि दक्षिण आफ्रिकेतील अनेक कंपन्या सध्या उपलब्ध असलेले हार्डवेअर व सुविधा वापरून मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरची निर्मिती करू शकतात. त्यांच्या डिझाईनवर कॉपीराइट नसल्याने इतर देशही निर्मितीत भाग घेऊ शकतात. जगभरातील संशोधक व गटांनी मिळून मागील महिन्यात व्हेंटिलेटरचे अनेक आराखडे तयार केले आहेत. यात ‘स्लॅक चॅनेल्स’, ‘फेसबुक ग्रुप’ व ‘गिटहब’ यांचा समावेश आहे. हे आराखडे कोणालाही वापरता येणारे (ओपन सोर्स) आहेत व ते ॲम्ब्युलन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘ॲम्ब्यु-बॅग’वर आधारित आहेत. थ्री डी प्रिंटिंगच्या तंत्रानेही व्हेंटिलेटर बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी×ॲल्युमिनिअम धातू व सहज उपलब्ध असणारी मोटर उपयोगात आणली जाते. ‘द एंड कोरोना व्हायरस’ नावाची कंपनी ‘आयर्न लंग’ हा आणीबाणीच्या परिस्थितीत मानवी फुफ्फुसाला ऑक्‍सिजन पुरवठा करणारा व्हेंटिलेटर विकसित करीत आहे. मात्र, वेळखाऊ चाचण्या, ऑक्‍सिजनमुळे गंज पकडणारे सुटे भाग, आग पकडणारे प्लॅस्टिकचे भाग, स्वच्छ करण्यास अत्यंत जिकरीचे असणारे थ्री डी प्रिंटेड भाग व डॉक्‍टरांना वापरण्यास सोपे व माहिती असलेले तंत्रज्ञान असणे ही आव्हाने संशोधक व उत्पादकांसमोर आहेत. मात्र, लोकांचा जीव वाचविण्यापुढे संशोधक व उत्पादकांना ही आव्हाने सोपी वाटत असून, दिवसरात्र मेहनत करून ते व्हेंटिलेटरच्या निर्मितीत गुंतले आहेत. ‘कोरोना’विरोधातील लढाईत हे संशोधन निर्णायक ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com