हवामानबदल : जंगलांपुढील आव्हान 

Forest
Forest

जंगले मोठ्या प्रमाणात कर्ब-संचयन करतात. त्यामुळे हवामानबदलाविरुद्धच्या लढ्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा असतो. पण वरकरणी सरळसोट वाटणाऱ्या या वाक्‍याला बरेच कंगोरे आहेत. या बदलाचे प्रतिकूल परिणाम भारतीय जंगले झेलत आहेतच. विविध धोके, बदल यांनाही तोंड देत आहेत आणि जोडीला शासकीय नियोजनामधील घोळ आणि त्रुटींचाही सामना करत आहेत. हे घोळ मुळात २०१५मध्ये जंगलांची व्याख्या सरकारी पातळीवर बदलली गेली तिथून सुरू होतात. आता ही व्याख्या, ‘वृक्षराजीची (canopy) घनता दहा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असलेल्या आणि विस्तार एक हेक्‍टरहून अधिक असलेल्या सर्व जमिनी’ (FSI:२०१५; २५) अशी सरसकट केल्याने लागवड केलेले वृक्ष आणि रसरशीत जंगल यात काहीच फरक उरला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्ब शोषून घेण्यापुरतेच पाहायचे झाले तर खरोखर दोन्हींमध्ये काहीच फरक नाही. पण एकसूरी लागवड आणि विविध प्रजातींनी युक्त घनदाट जंगल आणि त्यापासून मिळणाऱ्या परिसंस्थात्मक सेवा सुविधा यात प्रचंड फरक आहे. अगदी कर्ब-संचयनाबाबत पाहिले तरी प्रजातीसंपन्न जंगल एकरी लागवडीपेक्षा अधिक कर्ब धरून ठेवते हे गेल्याच वर्षी झालेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे.

त्यात असे दिसून आले, की सदाहरित, प्रजातीसंपन्न जंगले सुमारे तीनशे टन प्रतिहेक्‍टर इतका कर्ब शोषतात; तर सागवान आणि निलगिरी यांच्या लागवडींची ही क्षमता अनुक्रमे ४३ टक्के आणि ५५ टक्के इतकी कमी असते. जंगल ‘पुनर्निर्माण’ असे विनोदी नाव असलेल्या सरकारी कार्यक्रमात फक्त पाच प्रजातींच्या लागवडीवर भर दिलेला दिसतो त्यापैकी या दोन आहेत.

मुळात नियोजनाच्या पातळीवर जंगले ही फक्त मानवी उठाठेवींमुळे निर्माण झालेला कर्ब शोषण्यासाठी असतात असे मानणे हीच मोठी घोडचूक आहे. विश्वासार्ह संशोधन असे सांगते की एकविसाव्या शतकाचा पहिला निम्मा भाग (म्हणजे चालू वर्तमानकाळ!) भारतीय जंगले हवामान-बदलाचा कामे आणि तो सोडून अन्य संकटांचा सामना सर्वात आधी करतील;आणि दुसरा निम्मा भाग, म्हणजे २०५० नंतर त्यांना हवामान-बदलाशी झुंजावे लागेल. याचाच आणखी एक अर्थ म्हणजे आत्ता आपण त्यांना किती सांभाळू, त्यावर त्यांची भावी झुंज अवलंबून असेल.

सध्या मानवनिर्मित आगी-वणवे, गुराढोरांची अवैध चराई, वृक्षतोड, शेतीत/उद्योगासाठी अवैध रूपांतर अशा धोक्‍यांमुळे त्यांची संकट-प्रवणता वाढतेच आहे. त्यात हवामानबदलही भर घालते आहेच. असा परिणाम चार-पाच चल घटकांवर सर्वाधिक होत आहे, असे शास्त्रज्ञ सांगतात. हे घटक असे: जंगलाची उत्पादक-क्षमता, उभे जीवित वृक्ष, मातीतील कर्बाचा साठा, तिथल्या प्राणी-वनस्पती जीव-संहती म्हणजेच इंग्रजीत ‘बायोम’ म्हणतात त्यांच्या बदलत्या हालचाली व त्यामुळे होणारे परिणाम.

हवामान-बदलामुळे जंगले किती, कशी बाधित होतील हा गेली दोन दशके वैज्ञानिकांच्या जिज्ञासेचा विषय राहिला आहे. २०११ मधील एका अभ्यासाचा निष्कर्ष होता, की अधिक संकटप्रवण वने-जंगले ही हिमालयाच्या वरच्या भागात, मध्य भारताच्या काही भागात आणि पूर्व आणि पश्‍चिम घाटाची उत्तर बाजूकडील जंगले (महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटाचा भाग) म्हणता येतील. तर ईशान्य भारतातील, तसेच पूर्व आणि पश्‍चिम घाटाच्या दक्षिणेकडील भाग यांची संकटप्रवणता सर्वात कमी होती. पण अगदी अलीकडे (२०१९) मध्ये ‘आयआयटी’ खडगपूरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या विस्तृत संशोधनात असे आढळून आले की वाटले होते त्यापेक्षा भारतीय जंगलांची हवामानबदल पचवून पुनर्प्रस्थापित होण्याची क्षमता उत्तम आहे. त्याचे तपशील, वन्यजीवांवरील परिणाम आणि या विषयाचे केंद्रीय नियोजन पुढील लेखांकात पाहू.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com