
कालखंड केला निश्चित
चांद्रभूमीच्या वैशिष्ट्यांनुसार कोपर्निकन, इरातोस्थेनियन, इंब्रियन, नेक्टारियन, प्री नेक्टारियन असे कालखंड पाडण्यात आले आहेत. त्यांच्या कालावधी सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वीपासून आतापर्यंतचा आहे. त्या प्रत्येक भागाला पिवळा, हिरवा, जांभळा, निळा, गुलाबी, भगवा, करडा किंवा तपकिरी असे कालखंडानुसार रंग दिले आहेत. करड्या रंगाच्या भागातील भूवैशिष्ट्ये सर्वांत आधी तयार झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
आपण नुसत्या डोळ्यांनी जरी चंद्राचे निरीक्षण केले तरी त्यावर आपल्याला काही ठिकाणे काळपट तर काही उजळ दिसतात. चंद्रावरील डोंगर-दऱ्यांमुळे तसे आपल्याला दिसते हे त्याचे एक प्राथमिक कारण आहे. तसेच चांद्रभूमीच्या विविधतेचे ते एक लक्षण आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
चंद्राच्या जमिनीमध्ये असलेल्या खनिजांचा शोध घेण्याचा प्रयत्न कित्येक वर्षापासून होत आहे. त्यात आता काही प्रमाणात यश आले आहे. चंद्राचा भूशास्त्रीय नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. चंद्रावरील दगडांच्या रचनेचा आतापर्यंतचा सर्वांत सखोल नकाशा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
चांद्रगर्भाच्या सविस्तर माहितीबरोबरच भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी या नकाशाचा उपयोग होऊ शकणार आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा, टेक्सासमधील ‘लुनार प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट’ आणि अॅरिझोनातील ‘अॅस्ट्रॉलॉजी सायन्स सेंटर’मधील शास्त्रज्ञांना एकत्र येऊन हा नकाशा तयार केला आहे. अमेरिकी भूगर्भशास्त्र सर्वेक्षण संस्थेची (यूएसजीएस) यासाठी मदत झाली. अपोलो चांद्र मोहिमा, उपग्रहांची ताजी छायाचित्रे यांच्या वापर करून हा नकाशा तयार करण्यात आला आहे. सगळ्या छायाचित्रांची छाननी आणि एकीकरण करण्यासाठी संगणकाच्या सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली. याशिवाय आतापर्यंत झालेल्या संशोधनांतील माहितीचा आधार नकाशा तयार करताना घेण्यात आला. चंद्रावरील दऱ्या, डोंगर, भंगा, कडे आदींची माहिती विविध मोहिमांत आणि अभ्यासांत गोळा करण्यात आली आहे. त्यांना नावेही देण्यात आली आहेत. त्यांचाही वापर करण्यात आला. भविष्यात आणखी सविस्तर आणि सखोल नकाशा तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.
पृथ्वीवर जमिनीचे विविध स्तर आहेत आणि जमिनीची विविध प्रतले आहेत. तशा प्रकारची प्रतले चंद्रावर नाहीत. तेथील पृष्ठभाग आणि त्याखालील जमिनीची रचना वेगळी आहे. आता पुढील मोहिमांच्यावेळी नेमके कोणत्या भागात यान उतरवायचे, तसेच कोणत्या भागात खनिजे जास्त असण्याची शक्यता आहे, याची माहिती नकाशाच्या आधारे मिळू शकेल. नासाची नियोजित चांद्रमोहीम २०२४मध्ये आहे.
भौगोलिकदृष्ट्या प्रत्येक भागाचा कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्नही शास्त्रज्ञांनी केला. आधी वेगवेगळे सहा नकाशे तयार करण्यात आले. त्यानंतर ते सूत्रबद्ध पद्धतीने एकत्र केले गेले. अमेरिकेच्या ‘लुनार ऑर्बिटर लेसर अल्टिमीटर’ आणि जपानच्या ‘सेलेने कायुगा टेरिन कॅमेरा स्टिरिओ’ या उपकरणांचा वापर यासाठी केला गेला.