सर्च-रिसर्च : सोन्याऐवजी लिथिअमसाठी स्पर्धा!

महेश बर्दापूरकर
Wednesday, 2 December 2020

तुमच्या मोबाईल फोनमधील बॅटरी लिथिअम आयन बॅटरी असते, हे तुम्हाला माहिती आहेच. एकविसाच्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संशोधकांना मोबाईल फोन आणि लॅपटॉपसारख्या गॅजेट्समधील उपकरणांच्या बॅटरींपुरताच या धातूचा उपयोग माहिती होता. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच अपारंपरिक स्रोतांद्वारे निर्मित ऊर्जा साठवून ठेवण्यासाठीही लिथिअम बॅटरींचा उपयोग होऊ लागला असून, तो भविष्यात वाढणार आहे.

तुमच्या मोबाईल फोनमधील बॅटरी लिथिअम आयन बॅटरी असते, हे तुम्हाला माहिती आहेच. एकविसाच्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संशोधकांना मोबाईल फोन आणि लॅपटॉपसारख्या गॅजेट्समधील उपकरणांच्या बॅटरींपुरताच या धातूचा उपयोग माहिती होता. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच अपारंपरिक स्रोतांद्वारे निर्मित ऊर्जा साठवून ठेवण्यासाठीही लिथिअम बॅटरींचा उपयोग होऊ लागला असून, तो भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे लिथिअम धातूच्या खाणींना खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी लिथिअम मिळवतानाच होत असलेल्या कार्बन उत्सर्जनाबद्दल संशोधक चिंता व्यक्त करीत असून, ते कमी करण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लिथिअमच्या शोधाचा इतिहास १८६४पर्यंत मागे जातो. ब्रिटनमधील व्हेल क्लिफोर्डमध्ये जमिनीखाली ४५० मीटरवर गरम पाण्याचे झरे आढळले व या पाण्याचे पृथःकरण केल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर लिथिअम असल्याचे आढळले. मात्र, लिथिअमचे उपयोग माहिती नसल्याने पुढील १५० वर्षे या पाण्याची केवळ वाफच होत राहिली. त्यानंतर २०२०मध्ये याच ठिकाणाजवळील कॉर्नवेल येथे जगातील सर्वाधिक दर्जेदार लिथिअम मिळत असल्याचे आढळले. ब्रिटन, स्वीडन, हॉलंड, फ्रान्स आणि नॉर्वे या देशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जगाला कार्बन उत्सर्जनाचे ठरवलेले ध्येय २०५०पर्यंत गाठायचे असल्यास सध्याच्या पाचपट लिथिअम लागेल. मात्र, जमिनीतून लिथिअम बाहेर काढताना कार्बनचे उत्सर्जन, पाण्याचा अतिवापर व जमिनीची हानी होते. आज लिथिअम ऑस्ट्रेलियातील कठीण खडकाखाली असलेल्या खाणी व चिली आणि अर्जेंटिनामधील कोरड्या पडलेल्या तलावांतून मिळवले जाते आहे. पहिल्या प्रकारात जमिनीचे नुकसान होते, मोठ्या प्रमाणावर पाणी लागते व एक टन लिथिअम मिळवण्यासाठी १५ टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. ‘‘खडकांमध्ये असलेल्या अत्यंत खारट आणि गरम पाण्यात (जिओथर्मल ब्राइन) लिथिअम, बोरॉन आणि पोटॅशिअम विपुल प्रमाणात असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकांमधील एक लीटर पाण्यात २६० मिलिग्रॅम लिथिअम मिळते व एका सेकंदात ४० ते ६० लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेतून मिळणारे लिथिअम मोबाईल बॅटरींसाठी (एका बॅटरीत २ ते ३ ग्रॅम) पुरेसे आहे. मात्र, मर्सिडिझ बेंझ, फोक्सवॅगनसारख्या बड्या वाहन उद्योगांनी इलेक्ट्रिक कारसाठी लिथिअम बॅटरींच्या मागणी केल्याने येत्या काही वर्षांत लिथिअमची मागणी वाढणार आहे. यात जिओथर्मल ब्राईनद्वारे लिथिअम मिळवणाऱ्या कंपन्यांचे उखळ पांढरे होणार आहे,’’ असे या विषयाचा अभ्यास करणारे संशोधक अॅलेक्स केन्स सांगतात. ब्रिटनमध्ये लिथिअमसाठी दोन प्रकल्पांमध्ये काम सुरू आहे. पहिला आहे ब्रिटनमधील युनायटेड डाउन्स प्रकल्प. येथे जमिनीखाली ५.२ किलोमीटरवरील पाण्यात लिथिअम मोठ्या प्रमाणावर असून, त्यामध्ये सोडिअम आणि मॅगनेशिअम या अशुद्धींचे प्रमाण नगण्य आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटिश सरकारने या प्रकल्पासाठी ५.३ अब्ज डॉलरची मदत दिली आहे. दुसऱ्या प्रकल्पात एक किलोमीटर खोलीवरील पाण्यातून लिथिअम मिळवले जाते. त्याच्या जोडीला डायरेक्ट लिथिअम एक्सट्रॅक्शन या अमेरिका, जर्मनी व न्यूझीलंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा अवलंब या प्रकल्पांत करण्याचा विचार होत आहे.  

जिओथर्मल लिथिअमवर अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सल्टॉन समुद्र परिसरातील पाण्यात मोठ्या प्रमाणावर लिथिअम सापडते. येथे जगाच्या गरजेच्या ४० टक्के लिथिअम मिळेल असा दावा केला जातो आहे. येथून वर्षाला ६ लाख टन लिथिअमचा पुरवठा होऊ शकतो व त्याची किंमत ७.२ अब्ज डॉलर आहे. त्यामुळे लिथिअम मिळवण्यासाठी सर्वच कंपन्यांचे हात शिवशिवू लागले आहेत. ग्रीन कारला लागणारे ग्रीन लिथिअम मिळवण्यासाठी ‘झिरो कार्बन लिथिअम’ या संकल्पनेवर संशोधकांचे काम सुरू आहे. भविष्यात लिथिअमला सोन्याचा भाव येणार असून, त्यासाठीची स्पर्धाही तीव्र होणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write mahesh badrapurkar on Competition for lithium instead of gold