पर्यावरण : पर्यावरण रक्षणासाठी कृतीची वेळ

Environment
Environment

देशात सगळीकडे गेल्या चार वर्षांपासून डेंगी, हिवताप, चिकूनगुनिया अशा कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे स्पष्ट दिसते. त्याच्या कारणांचा शोध घेतल्यास पर्यावरणामध्ये त्याचं एक कारण सापडतं. ‘एडिस इजिप्ती’ या डासाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. थंडी वाढते तशी या डासाच्या प्रजनन क्षमता कमी होते. पण देशात गेल्या काही वर्षांमध्ये उबदार वातावरण आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत डेंगीचे निदान होत असल्याचे चित्र राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसते. त्याच वेळी स्वाइन फ्ल्यूच्या ‘एच१एन१’ विषाणूंसाठी पोषक अनुकूल नसते.

त्यामुळे स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या कमी राहिलेली दिसते. देशात १९०१ पासूनचे सातवे उबदार वर्ष म्हणून गेल्या वर्षीचा उल्लेख हवामान खात्यात झाला आहे. जानेवारी, मार्च आणि डिसेंबर या तीन महिन्यांचा अपवाद वगळता वर्षभरातील नऊ महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले. हवामानात बदलणाऱ्या प्रत्येक घटकाचा दुष्परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. प्रत्येक सजीवावर होतो. बदललेल्या हवामानामुळे सूक्ष्म जीवजंतूंपासून ते महाकाय प्राण्यांपर्यंत आणि पाण्यातील शेवाळ्यापासून ते वटवृक्षापर्यंत सगळ्यांवर कमी-जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. 

वाहने, औष्णिक वीजभट्ट्या, कारखाने अशांमधून बाहेर पडणारा धूर हा पर्यावरण ऱ्हासाचे एक प्रमुख कारण आहे. त्यातून उष्णता वाढते. पण देशाचा सर्वांगीण विकासासाठी रस्ते, वाहने, ऊर्जा, कारखाने अत्यावश्‍यक आहेच. पण हा विकास करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दळणवळणासाठी वाहनांची गरज आहेच. पण ती प्रदूषण न करणारी असावी. त्यासाठी इलेक्‍ट्रिक बसचा पर्याय पुढे येत आहे. अशा बसगाड्यांची संख्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये वाढविणे, ही नव्या काळाची गरज आहे. हरित ऊर्जेच्या वापरातून या एकामागून एक येणारी उष्ण वर्षे काही अंशी रोखता येतील.

पर्यावरणातील बदल हा पृथ्वीवरील दुसऱ्या कोणत्यातरी ध्रुवावर घडणारी घटना नाही. ती आपल्या आजूबाजूला घडत आहे. बदलणाऱ्या पर्यावरणाचा दुष्परिणाम हे आता आपल्या शहरात, आपल्या दारात, खरेतर घरातही स्पष्टपणे जाणवायला लागले आहेत. नद्या-नाल्यांचे आपल्या घरात शिरलेले पाणी हा याच मोठ्या घटनेचा परिणाम आहे. त्यामुळे ‘जागतिक तापमानवाढ’ हा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. हाच निःसंदिग्ध संदेश सरत्या वर्षानं संपूर्ण मानवजातीला दिला.

पर्यावरणाच्या दृष्टीने हे वर्ष खरंच हादरवून टाकणारं ठरलं. जागतिक पातळीवर ऑस्ट्रेलियातील महाभयानक वणवा, ही जशी धक्कादायक घटना. तशाच गेल्या चार-चार पिढ्यांमध्ये न घडलेल्या घटना गेल्या वर्षी भारतात घडल्या. शरीराची अक्षरशः काहिली करणारा उन्हाचा चटका अस्तंगत झालेल्या वर्षात आपण अनुभवला.

डोळ्यासमोर आपला घर-संसार, अंगणातील गोधन नदीच्या महापुरात वाहून जाताना आपल्यापैकी बहुतांश जणांनी पाहिले. एका पाठोपाठ एक आलेल्या वादळांमुळं नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पावसाळाही पाहिला, तसेच गेल्या वर्षीच्या सुरवातीला हाडे गोठवणारी थंडीही आपण सगळ्यांनी सहन केली. आपण सगळेच या हवामान बदलाचे साक्षीदार आहोत. उच्चांकी हिमवर्षा, ढगांच्या गडगडाटासह अत्यंत कमी वेळेत कोसळणारा प्रचंड मोठा पाऊस, विजा पडण्याचे वारंवार झालेले प्रकार, धुळीचे वादळ, महापूर हे सगळं-सगळं गेल्या वर्षभरात घडलं. देशभर दोन हजारांहून जास्त जणांचे प्राण या नैसर्गिक आपत्तीने घेतले. यापैकी पूर, उष्णतेची भयंकर लाट किंवा वीज पडल्याने महाराष्ट्रातील २३१ लोकांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com