सर्च-रिसर्च :  कोरोनाच्या लसीकरणाचे प्रयोग  

सर्च-रिसर्च :  कोरोनाच्या लसीकरणाचे प्रयोग  

मराठीत ‘दृष्टीआड सृष्टी’ असा वाक्‍प्रचार आहे. जिवाणूंच्या आणि विषाणूंच्या सृष्टीने आपल्याला सतत घेरलेले असते. जिवाणूला अनुकूल वातावरण मिळाले, की ते पुनरुत्पत्ती करतात. एखाद्या परजीवाची जैविक यंत्रणा वापरायला मिळाली, तरच विषाणू वाढतात. धूलिकणांमध्ये सूक्ष्मजीवांची वस्ती असते. त्यातील काही प्राणघातक आणि संसर्गजन्य असतात. अपायकारक सूक्ष्मजीवाने शरीरात आक्रमण केलेच तर प्रतिकार करण्याची क्षमता पेशींनी मिळवलेली असते. शिवाय डॉक्‍टरांकडून लसीकरण करून आपण अनेक संसर्गजन्य रोगांना दूर ठेवू शकतो. क्वचित एखादा अज्ञात आणि जीवावर बेतणारा सूक्ष्मजीव झपाट्याने पसरून प्राणहानी करतो. 

काही वर्षांपूर्वी इबोला, झिका, सार्स, मर्स या श्वसनेंद्रियाशी संबंधित रोगांनी जगाला वेठीस धरले होते. उत्तम प्रतिकारशक्ती, स्वच्छता, लसीकरण आणि वैद्यक उपचारामुळे गंभीर परिणामाला थोपवणे शक्‍य झालेय. आता कोरोना (कोविद-१९) या रोगाने जगाला पछाडलंय. कोरोनाचे प्रकार-उपप्रकार आहेत. चीनमधील वुहान प्रांतात कोविद-१९ विषाणू गेल्या वर्षी लक्षात आला.  संस्कृतमध्ये एक श्‍लोक आहे- ‘जात: मात्रम्‌ नय: शत्रु व्याधींच शमनन्‌ न येत, अतिपुष्टांग युक्तोसपि न पश्‍चान्तेन मान्यते’ (आपण कितीही बलवान असलो तरी घातक रोग सावधपणे नष्ट करावा आणि धोका टाळावा.) इलाजापेक्षा प्रतिबंधक उपाय जास्त श्रेयस्कर असतो. प्राप्तपरिस्थितीत कोरोनाची लस उपयोगी पडली असती. पण अजून ती तयार झालेली नाही. लस संसर्गजन्य रोग बरा करण्यासाठी वापरली जात नाही, तर विशिष्ट रोगाच्या संभाव्य संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरली जाते. ज्या संसर्गजन्य रोगापासून आपल्याला स्वतःचे संरक्षण करायचे आहे, त्याच रोगाच्या निष्प्रभ जिवाणू किंवा विषाणूंपासून लस तयार करता येते. त्यामुळे शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशींची किंवा संरक्षक प्रति-प्रथिनांची निर्मिती होऊ शकते. 

घातक विषाणूच्या डीएनएच्या क्रमवारीचा अभ्यास करून लस तयार करता येते. चीनने १० जानेवारी २०१० रोजी कोविद-१९ या विषाणूच्या डीएनएची क्रमवारी जगजाहीर केली. सॅन डिएगो येथील इनोव्हिओ प्रयोगशाळेत केट ब्रॉडेरिकने उपलब्ध डीएनएच्या क्रमवारीमधील एक छोटासा तुकडा निवडला. तसाच डीएनएचा तुकडा प्रयोगशाळेत तयार केला. नंतर त्या तुकड्याचे एका विशिष्ट जिवाणूच्या डीएनएमध्ये रोपण (जोडणी) केले. या क्रियेला ‘रिकॉम्बिनंट डीएनए तंत्र’ म्हणतात. असा जेनेटिकली ‘इंजिनियर्ड’ जिवाणू अनुकूल माध्यमात वाढवतात. ते पुरेसे वाढले की बाजूला काढतात. जिवाणू वाढताना त्याच्या डीएनएमध्ये कोविद-१९ या विषाणूमधील जोडलेला छोटासा डीएनए तयार होतो. तो अलग करता येतो. त्यापासून प्राथमिक स्वरूपातील लस तयार होते. ‘मॉडेर्ना’ (सियाटल) सह जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कोविद-१९ साठी लस तयार करण्याचे प्रयोग चालू आहेत. यासाठी डीएनएऐवजी मेसेंजर ‘आरएनए’चा छोटा तुकडा वापरला जाईल. या लशीला ‘व्हॅक्‍सिन एम-आरएनए-१२७३’ नाव आहे. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन’ने प्राथमिक लस ४५ जणांना टोचायला संमती दिली आहे. अजून २८ दिवसांनी पुन्हा लस टोचली जाईल. त्यानंतर कोविद-१९ विषाणूचा नाश करणारी यंत्रणा कार्यान्वयित झाली आहे का, ते तपासण्यात येईल. यश मिळाले तर १८ महिन्यांनी प्रतिबंधक लस तयार होऊ शकेल. हे संशोधन आव्हानात्मक आहे, कारण विषाणू स्वतःची ‘ओळख’ (स्वरूप) बदलून संशोधकांना चकवू शकतो. आता लशींचे स्वरूप बदलत चाललेय. ‘व्हॅक्‍सिनेशन‘ (लसीकरण) शब्दाची जागा ‘इम्युनायझेशन’ या शब्दाने घेतली आहे. संसर्गजन्य रोगांवर एवढ्या तत्परतेने लस तयार होत नाही. जीनॉमिक्‍स (जनुकशास्त्र), प्रोटियॉमिक्‍स (प्रथिनांची संरचना/कार्य), इम्युनॉलॉजी (प्रतिकारशक्तिशास्त्र), मोलेक्‍युलर बायॉलॉजी (रेण्विय जीवशास्त्र) या विज्ञानाच्या अभिनवशाखा-उपशाखा एकत्र आल्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला बळ मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com