सर्च रिसर्च  : संशोधक ‘हात धुवून’ कोरोनाच्या मागे 

डॉ. अनिल लचके 
Monday, 4 May 2020

पुण्यामधील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ लस-निर्मितीच्या क्षेत्रात अग्रगण्य आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोविड-१९ लस तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यावर आधारित लसनिर्मिती पुण्यात होईल.

कोविड-१९ विषाणूच्या हल्ल्याला थोपवण्यासाठी भारतीय संशोधक-तंत्रज्ञ खूप मेहनत करीत आहेत. साहाजिकच सरकारी आणि खासगी प्रयोगशाळेत कोरोना-१९च्या बाधेची चिकित्सा (निदान) वेगाने होण्यासाठी अभिनव साधन-सामग्री आणि चाचणी किट शोधून काढणं आवश्यक होतं. पुण्याच्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सने हे आव्हान स्वीकारून पहिलं मान्यताप्राप्त चाचणी किट (आर-टी पीसीआर) तयार केलं. एकाच ‘सॅम्पल’चा लगोलग दहावेळा एकसारखा निष्कर्ष आला तरच ते उपकरण मान्यताप्राप्त होते. चाचणी अडीच तासात करता येते. या टीमचं नेतृत्व मोठ्या हिकमतीने विषाणू-अभ्यासक मीनल दाखवे-भोसले या मराठी महिलेने केले होते, हे विशेष! 

नवी दिल्ली येथे सीएसआयआर ची ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी’ ही प्रयोगशाळा आहे. येथील संशोधकांनी कोविड-१९ विषाणूबाधित रुग्णाची चाचणी एक तासात करता येईल, असे स्वदेशी चाचणी-किट कमी खर्चात तयार केलंय. यासाठी अत्याधुनिक ‘जीन एडिटिंग’चे (क्रिस्पर कॅस-९) तंत्र वापरलंय. या चाचणीमध्ये कोविड-१९ विषाणूमधील आरएनए वेगळा करणे, त्याचे डीएनएमध्ये रूपांतर करून तो पुरेशा प्रमाणात तयार करणे आदी प्रक्रिया केल्या जातात. याला पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअॅक्शन) म्हणतात. सामान्य माणूस स्वतः चाचणी करू शकेल इतकी ही सोपी पद्धत आहे. ती एका छोट्या ‘पेपरस्ट्रीप’वर करायची असते. चाचणीत केवळ कोविड-१९ चा शोध घेतला जातो, म्हणून अचूक आहे. सत्यजित रे यांच्या रहस्यकथांमध्ये ‘फेलुदा’ नावाचा गुप्तहेर आहे, म्हणून संशोधकांनी त्यांच्या चाचणी-किटचे नाव फेलुदा ठेवलंय. परदेशी चाचणी महाग असते; पण देशी पद्धतीला पाचशे रुपये खर्च होतो. सध्या या चाचणी-किटचे परीक्षण `इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च करीत आहे. 

पुण्यामधील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ लस-निर्मितीच्या क्षेत्रात अग्रगण्य आहे. येथे कोविड-१९साठी लसनिर्मिती लवकरच सुरू होईल आणि ऑक्टोबरपर्यंत उत्पादन सुरु होईल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोविड-१९ लस तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यावर आधारित लसनिर्मिती पुण्यात होईल. 

श्री चित्रा तिरूनाल आयुर्विज्ञान आणि तंत्रज्ञान (तिरुअनंतपुरम) येथील संशोधकांनी ‘जीन-डॉट’ नामक उपकरण तयार केलंय. त्याचा उपयोग कोरोनाबाधित रुग्णाचं निदान लवकर करण्यासाठी होतो. रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज असते. त्याचा तुटवडा पडू शकतो. ही समस्या चेन्नई येथील ‘थ्री-डी प्रिंटिंग कम्युनिटी’च्या तंत्रज्ञांनी लक्षात घेतली. रुग्णालयात एकाच वेळी अनेक रुग्णांना वापरता येईल, असे डिझाईन त्यांनी तयार केले आहे. नोएडा येथील ‘अग्वा हेल्थकेअर’मधील संशोधकांनी अल्प किमतीत एक हलका (पोर्टेबल) व्हेंटिलेटर तयार केला आहे. तो रुग्णाच्या खोलीतील हवा संपीडित (कॉम्प्रेस्ड) करून कार्य करतो. आयआयटी (पलक्कड) आणि काझीकोडे इंडस्ट्रीज फोरम यांनी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलसह हलका पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केलाय. पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये एक ‘आयोनायझर’ यंत्र (सायन्टेक एअरॉन) तयार झालंय. ते आठ सेकंदात सुमारे दहा कोटी ऋणभारित सूक्ष्मकण तयार करून रुग्णाच्या खोलीतील सूक्ष्मजीवांचा नाश करते. पुण्यातील ‘एनसीएल’च्या प्रांगणात व्हेंच्युअर सेंटर आहे. येथे ऑक्सिजन संवर्धक युनिट, डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटर आणि भाजीपाला-फळे निर्जंतुक करण्याचे संशोधन होतंय. कोविड-१९ च्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘रेमडेसावीर’ नामक औषध उपयुक्त असून आपले तंत्रज्ञ त्याचे उत्पादन करण्याच्या तयारीत आहेत. भावनगरच्या ‘केंद्रीय नमक आणि सागरी रसायन संशोधन संस्थे’ने पॉलिसल्फोन मटेरियल वापरून मास्क तयार केलाय. त्याला विषाणू चिकटलाच तर तो निष्क्रिय होतो. भारतातील अनेक प्रयोगशाळांमध्ये कोविड-१९ च्या संकटातून सुटका मिळावी म्हणून संशोधक मोलाची मदत करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian researchers are working hard to stop the attack of the covid-19 virus