प्रयत्न वासांच्या संवर्धनाचा!

महेश बर्दापूरकर
बुधवार, 15 जानेवारी 2020

पूर्वी पहिलाच पाऊस पडताच सर्वत्र मृद्‌गंध दरवळायचा. आता रस्त्यांचं सिमेंटीकरण झाल्यानं हा वास इतिहासजमा होत चालला आहे.

वा स. मनुष्याला घ्राणेंद्रियांच्या मदतीनं मिळालेली अलौकिक देणगी. प्रत्येक वस्तूला तिचा वास असतो, तसाच प्रत्येक शहराचाही विशिष्ट वास असतो. काळाच्या ओघात हे वास लुप्त होताना दिसतात. उदाहरणच द्यायचं, तर पूर्वी पहिलाच पाऊस पडताच सर्वत्र मृद्‌गंध दरवळायचा. आता रस्त्यांचं सिमेंटीकरण झाल्यानं हा वास इतिहासजमा होत चालला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे विशिष्ट वास काळाच्या ओघात लुप्त होत असताना त्यांचं संवर्धन करणं शक्‍य आहे काय, यावर संशोधक विचार करीत आहेत. तुम्ही एखाद्या खूप जुन्या, पानं पिवळ्या पडलेल्या पुस्तकाची कल्पना करा. हे पुस्तक कपाटातून बाहेर काढून वाचायला सुरुवात करण्याआधी एक अनोखा, जुन्या पुस्तकालाच येणारा वास तुमच्या नाकात भरून राहतो. हा वास केवळ ग्रंथालय अथवा जुन्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तकं वाचणाऱ्यांची गरज नसून, त्याला मोठा सांस्कृतिक वारसाही आहे. हे वास काळाच्या ओघात नष्ट होण्याची भीती आहे. जुनी पुस्तकं नष्ट केली जातात किंवा तापमान नियंत्रित खोलीमधील सुरक्षित कपाटात कुलूपबंद होतात. आपल्याला साथ करणारे हे वास काळाबरोबर बदलत असल्यानं पुस्तकांच्या वासाप्रमाणं शहरांचे विशिष्ट वासही लुप्त होण्याची भीती आहे. ‘यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल हेरिटेज’मधील संशोधिका सिसेलिया बेंबिब्रे हे लुप्त होणारे वास जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘‘मनुष्य आपल्या समृद्ध वारशाकडं कायम दुर्लक्ष करतो. सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी विविध दालनं, संग्रहालयं असतात, मात्र त्यांचा उद्देश वस्तूंना दृश्‍य स्वरूपात जतन करण्याकडं दिसतो. मला मात्र अत्यंत कमी संशोधन झालेल्या वास या मानवाला त्याच्या घ्राणेंद्रियाकडून मिळालेल्या वारशावर संशोधन करायचं आहे. हे वास साठवून ठेवण्यासाठी पॉलिमरचा धागा त्या वासाच्या संपर्कात आणला जातो. वस्तूला वास देण्याशी संबंधित हवेतील रसायनं त्यावर चिकटतात. मी त्या धाग्याचे प्रयोगशाळेत पृथक्करण करून ते रसायन वेगळे करून त्याची ओळख पटवते. दुसऱ्या पद्धतीमध्ये वस्तूच्या वायू स्वरूपातील नमुन्यातून वासासाठीचे घटक शोधून वेगळे केले जातात. ही पद्धत परफ्युम, अन्न व पेयांच्या उद्योगामध्ये वापरली जाते. तिसरा पर्याय थेट मानवी नाकाचा उपयोग करणं आहे. आम्ही वासांचं वर्गीकरण मनुष्याच्या दृष्टिकोनातून करतो. कारण एखादा वास भविष्यासाठी साठवून ठेवायचा असल्यास त्याच्या रासायनिक रचनेबरोबरच आपला अनुभवही महत्त्वाचा ठरतो. या प्रक्रियेतून आम्ही चामड्याचे मोजे, जुनी पुस्तकं व साच्यांसारख्या वस्तूमधील वास साठवले आहेत,’’ अशी माहिती बेंबिब्रे देतात.

वस्तूंप्रमाणं शहरांचाही एक विशिष्ट वास असतो आणि तो जतन करण्याचा प्रयत्न स्पेन, कोलंबिया, ग्रीस, फ्रान्स, जपान आदी देशांनी केला आहे. यातून मानवी सभ्यतेचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. केट मॅक्‍लेन या संशोधिका ‘स्मेलमॅप’ तयार करण्याचं ध्येय ठेवून काम करीत आहेत. यामध्ये शांघाय शहरातील रस्त्यांवरचा सकाळ आणि दुपारचा वास किंवा पॅरिस शहराचा उन्हाळ्यातील वास किंवा एखाद्या शहराचा जुन्या काळातील वास साठवून त्यात काळानुसार कसे बदल होत गेले, याचंही चित्र मांडलं जाणार आहे. भावी पिढ्यांसाठी जुन्या काळातील वस्तू आणि शहरांचे वास साठवून सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा अनोखा प्रयत्न निश्‍चितच प्रशंसनीय म्हणायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh bardapurkar article about smell

टॅग्स