सर्च-रिसर्च : चरबी अशीही घालवता येईल

fat
fat

संगणकामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून ‘व्हायरस’ (म्हणजे ‘कोरोना’सारखा विषाणू नव्हे!) आला, की बौद्धिक ताळतंत्र बिघडते आणि तो निकामी होतो. सातत्याने आंतरजालाशी जोडलेल्या संगणकाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण त्यामध्ये ‘अँटीव्हायरस’ इन्स्टॉल करतो. मानवी समूहातही वाढते शहरीकरण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे स्थूलता (लठ्ठपणा) आणि त्याच्याशी निगडित आजारांचा ‘व्हायरस’ जम बसवू लागला आहे. त्यात आळशी बनलेल्या माणसांना व्यायाम, डाएट आदींचा कंटाळा येतो. त्यामुळे या ‘व्हायरस’ला तोंड कसे द्यायचे हा मोठा प्रश्‍न आहे. पण, आता अतिरिक्त चरबीला नष्ट करणारा शरीरातील ‘अँटीव्हायरस’ शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. 

अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातील कॉलेज ऑफ सायन्स येथील शास्त्रज्ञांनी यासंबंधी संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांनी उंदराच्या पेशीत आढळणारे तंतुनिकेय अयुग्मकारी (मायटोकाँड्रीयल अनउप्लर) शोधले आहे. ज्याचे नाव ‘बीएएम-१५’ असे आहे. पेशीतील हा घटक उंदराच्या खाण्यापिण्यावर कोणताही परिणाम न करता त्याच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतो. शिवाय बोनस म्हणून हा घटक शरीरातील इन्शुलिनला प्रतिरोध करण्याची शक्ती तर कमी करतोच, पण त्याचबरोबर अतिरिक्त ताण आणि दाहही कमी करतो. अलीकडेच ‘नेचर कम्युनिकेशन’ या शोधपत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यायाम न करताच चरबी कमी होणार  
मायटोकाँड्रीया (तंतुनिका) हे पेशीचे ‘पॉवर हाउस’ म्हणून ओळखले जाते. यातून ॲडीनोसिन ट्रायफॉस्फेट (एटीपी) नावाचे ऊर्जावान इंधन तयार होते आणि सर्व जैविक प्रक्रियांना ऊर्जा पुरविते. ‘एटीपी’ बनण्यासाठी आहारातील पोषक घटक खर्ची पडतात, तसेच प्रोटॉन मोटिव्ह फोर्सही (पीएमएफ) मायटोकाँड्रीयामध्ये तयार व्हावा लागतो. जेव्हा ‘एटीपी सिंथेसिस’ या एन्झाईममधून प्रोटॉन (पीएमएफ) जातो तेव्हा पेशीतून ‘एटीपी’ तयार होतो. काही कारणाने ‘पीएमएफ’ कमी झाला, तर पेशींच्या श्‍वसनाची क्रिया वाढण्याची शक्‍यता असते. अशा वेळी ‘मायटोकाँड्रीयल अनउप्लर’ हा रेणू मायटोकाँड्रीयात प्रभावीपणे गेला, तर तो श्‍वसनासाठी मदत करतो. पर्यायाने पेशीतील चयापचय बदलते आणि कोणताही व्यायाम न करता चरबीचा वापर होतो. म्हणजेच चरबी जाळली जाते. 

उंदरांवरील सर्व चाचण्या यशस्वी  
मायटोकाँड्रीयल अनउप्लर नावाचा हा रेणू पेशीतील चयापचय बदलून चरबी घडविण्याचे काम करतो, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. पण शरीराबाहेरून गोळी, लस आदींच्या माध्यमातून हा घटक शरीरात पोचविणे शक्‍य आहे काय? त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत ना? याची चाचपणी शास्त्रज्ञांनी करायला सुरुवात केली. तेव्हा शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले, की मायटोकाँड्रीयल अनउप्लर ज्याला ‘बीएएम १५’ असे नाव देण्यात आले आहे, हे ना विषारी आहे, ना अति जास्त डोसला नकारात्मक प्रतिक्रिया देते. तसेच शरीराचे तापमानही यामुळे वाढत नाही. उंदरांवरील सर्व प्रयोग ‘बीएएम-१५’ या मायटोकाँड्रीयल अनउप्लरने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आता शास्त्रज्ञांना उत्कंठा आहे की मानवी शरीरावर हे कसे काम करते ते पाहण्याची. माणसांवरील प्रयोग यशस्वी होईल तेव्हा होईल, पण चांगल्या आरोग्यासाठी आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी रोज व्यायाम केलेलाच बरा. म्हणजे चरबी तर आटोक्‍यात राहील, पण त्याचबरोबर आपले आरोग्यही स्वस्थ आणि तंदुरुस्त राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com