सर्च रिसर्च : "कोरोना'वर खोकल्याचे औषध? 

vaccine-covid-19
vaccine-covid-19

आधुनिक जगातील, विशेषतः एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी जागतिक महामारी ठरलेल्या "कोविड-19' विरुद्ध सारे जग लढत आहे. ही लढाई खऱ्या अर्थाने तेव्हाच संपेल, जेव्हा यावर औषधाची मात्रा सापडेल. त्यामुळे "कोरोना'वर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आजवरच्या वैद्यकशास्त्रातील उपजत ज्ञानाच्या आधारे श्वसनमार्गाशी निगडित आजारांवर जी काय औषधे आहेत, त्यांचे प्रयोग "कोविड-19'च्या उपचारांवर होतात काय, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. खोकल्याच्या औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या "डेक्‍स्ट्रोमेथॉर्फन' या रसायनांची वैद्यकीय चाचणी आपले पूर्वज मानले जाणाऱ्या माकडावर घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे "कोविड-19'च्या लक्षणांमध्ये या औषधामुळे मोठा फरक पडल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत माकडाच्या पेशींवर केलेले हे संशोधन "नेचर' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. "डेक्‍स्ट्रोमेथॉर्फन' नावाचे हे औषध "कोविड-19'च्या विषाणूची दुसऱ्या पेशींमध्ये वाढ होण्यापासून रोखत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

प्रयोगशाळेत वाढविल्या माकडाच्या पेशी 
"कोविड-19' हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश कसा मिळवतो, याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. त्यांच्या लक्षात आले, की आकाराने 75 ते 120 नॅनोमीटर जाड असलेल्या "कोविड-19' विषाणूवर काट्यासारखे अनेक भाग आहेत. त्यावर ग्लायकोप्रोटिन नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन मानवी पेशीतील "एसीई-2' या प्रथिनाशी अभिक्रिया करते आणि पेशीमध्ये प्रवेश मिळविते. मुख्यत्वे फुफ्फुसावर आढळणाऱ्या पेशींमध्ये ही प्रक्रिया पाहायला मिळते. हे लक्षात घेता शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत माकडाच्या फुफ्फुसातील पेशींची वाढ केली. कृत्रिमपणे वाढविण्यात आलेल्या या पेशींमध्ये "कोविड-19' विषाणूचा संसर्ग करण्यात आला. त्यानंतर "डेक्‍स्ट्रोमेथॉर्फन' या औषधाच्या वापरातून त्यातील "कोविड-19'ची वाढ आणि कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात आला. "डेक्‍स्ट्रोमेथॉर्फन'च्या वापरामुळे "कोविड-19'चे पुनरुत्पादन थांबल्याचे दिसले. तसेच त्याची संसर्ग करण्याची क्षमताही कमी झाल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. म्हणजे निदान प्रयोगशाळेच्या स्तरावर तरी "डेक्‍स्ट्रोमेथॉर्फन' हे औषध "कोरोना'ला रोखून धरत असल्याचे सिद्ध झाले. तसेच संशोधकांनी यावेळी "पीबी28' या रसायनाचाही अभ्यास केला. त्यांच्या असे लक्षात आले "हायड्रॉक्‍सोक्‍लोरोक्विन'पेक्षा हे रसायन विषाणूंची वाढ रोखण्यासाठी जास्त प्रभावी ठरते. शास्त्रज्ञांनी यावेळी अनेक संभाव्य औषधांच्या माकडाच्या कृत्रिम पेशींवर चाचण्या घेतल्या. त्यांची उपयुक्तता प्रयोगशाळेच्या स्तरावर त्यांनी तपासली आहे. त्यामुळे बहुतेक संभाव्य औषधांच्या मर्यादा आणि वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुढील संशोधनासाठी उपयोग  
"डेक्‍स्ट्रोमेथॉर्फन' या औषधाची प्रयोगशाळेतील चाचणी यशस्वी ठरली असली, तरी प्रत्यक्ष उपयोगासंदर्भात अजून काही चाचण्या घेणे अपेक्षित आहे. त्यात "कोविड-19'चे बदलते स्वरूप लक्षात घेता मानवी वैद्यकीय चाचण्यांसाठीही प्रयत्न केले जातील. या संशोधनामुळे "कोविड-19'ची पेशी सोबतची अभिक्रिया, अधिवास आणि उत्पादन यासंबंधीची अधिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील संशोधनासाठी याचा जास्त उपयोग होणार आहे. जगभरातील संशोधन संस्थांबरोबरच देशातील वैद्यकीय शोध संस्थांमध्येही काही औषधांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत. तसेच आवश्‍यक रसायनेही देशातच विकसित करण्याचे काम विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (सीएसआयआर) विविध प्रयोगशाळांमध्ये चालू आहे. "कोविड-19' विरुद्धच्या लढाईत शास्त्रज्ञही पूर्ण ताकदीने उतरले आहेत. पण जोपर्यंत औषध मिळत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी शारीरिक अंतर बाळगणे, मास्क लावणे आणि हात स्वच्छ धुणे अशा विविध नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कारण "कोरोना'वर सध्या तरी खबरदारी हेच औषध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com