सर्च-रिसर्च : पवनचक्‍क्‍या बांधा रे सागरी!

महेश बर्दापूरकर
Wednesday, 21 October 2020

गेल्या काही वर्षांत या तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असून, हायविंड कंपनीने समुद्रात पवनऊर्जा पार्क उभारता येतील, हे दाखवून दिले आहे,’’ असे जर्मनीतील पवनऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ फॅंक ॲडम सांगतात.

पृथ्वी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येक देश योगदान देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या अधिकाधिक वापराकडे पर्याय म्हणून पाहिले जाते. सौरऊर्जेच्या जोडीला पवनऊर्जेचा उपयोग युरोपासह जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे. मात्र, जमिनीवर व समुद्रकिनारी पवनचक्‍क्‍या उभारण्यावर अनेक गोष्टींमुळे मर्यादा येत असताना थेट समुद्रामध्ये त्यांची उभारणी करण्यावर काही देश भर देत आहेत. हे तंत्रज्ञान महाग असून, त्यामुळे तयार झालेली ऊर्जाही महाग असली, तरी वापर वाढल्यावर त्याच्या किमती कमी होतील व हरितऊर्जेचा हा सर्वोत्तम पर्याय ठरेल, असे संशोधकांना वाटते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जमिनीवर पवनचक्‍क्‍या बसविल्यास पर्यावरणाची हानी होते, तर समुद्रकिनाऱ्यावरील पवनचक्‍क्‍यांमुळे मासेमारीवर मर्यादा येतात, असा आक्षेप घेतला जातो. स्कॉटलंडमध्येही हाच प्रश्न भेडसावत असताना तेथील ‘हायविंड’ या कंपनीने समुद्राच्या आत २४ किलोमीटर अंतरावर ५७४ फूट उंचीचे तरंगते टर्बाइन उभारले असून, अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यातून २० हजार घरांना लागणाऱ्या विजेची निर्मिती केली जाते. कंपनीच्या मते, हे तंत्रज्ञान हरितऊर्जेत नवी क्रांती घेऊन येईल. या पाण्याच्या वर २७० फूट उंचीवर असलेल्या टर्बाइन्सचे वैशिष्ट्य त्याचा एक हजार टन वजनाचा बोजा पेलणारा सिमेंट आणि पोलादापासून बनवलेला तरंगता पाया आहे. सतत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांचा उपयोग समुद्रातील पवनचक्‍क्‍यांमध्ये केला जातो व टर्बाइन  एक हजार फूट खोलीपर्यंत उभारता येतो, तसेच अनेक पट्टे आखून त्यावर शेकडो टर्बाइन उभी करता येतात.          

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जर्मनी, ब्रिटन व नॉर्वेसारख्या देशांत जमीन व समुद्र किनाऱ्यावरील पवनचक्‍क्‍यांना नागरिकांचा वाढता विरोध पाहता हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरणे शक्‍य आहे. ‘‘युरोपला पर्यावरण रक्षणाची ठरवलेली ध्येये पूर्ण करायची असल्यास समुद्रातील पवनचक्‍क्‍या उत्तम पर्याय आहे. गेल्या काही वर्षांत या तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असून, हायविंड कंपनीने समुद्रात पवनऊर्जा पार्क उभारता येतील, हे दाखवून दिले आहे,’’ असे जर्मनीतील पवनऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ फॅंक ॲडम सांगतात. मात्र, या क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते, समुद्रातील पवनचक्‍क्‍यांपासून तयार झालेल्या विजेचा दर जमिनीवरील पवनचक्‍क्‍यांच्या तुलनेत तिप्पट व समुद्र किनाऱ्यांवरील पवनचक्‍क्‍यांच्या दुप्पट आहे. समुद्रात असल्याने बांधकाम, निर्मिती व देखभाल खर्चही अधिक आहे. त्याचबरोबर समुद्रातील खारे पाणी व हवेमुळे पवनचक्‍क्‍यांचे आयुष्यही कमी असते. मात्र, या क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते समुद्रातील पवनचक्‍क्‍यांपासून तयार झालेली वीज जमिनीवरील पवनचक्‍क्‍यांच्या तुलनेत तिप्पट व समुद्र किनाऱ्यांवरील पवनचक्‍क्‍यांच्या दुप्पट आहे. स्कॉटलंडमध्ये हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबविला जात असून, तेथील तज्ज्ञांच्या मते अशा पवनचक्‍क्‍यांचा निर्मिती खर्च पुढील काही वर्षांत खूप कमी होईल. ‘नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरीज’चे या अमेरिकेच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संस्थेचे प्रमुख वॉल्ट म्युसिअल यांच्या मते, ‘अमेरिकेतील समुद्र किनारे  फुटांपेक्षा अधिक खोल असल्याने तेथे टर्बाइन उभारणे अवघड जाते. या परिस्थितीत समुद्राच्या आतील तरंगणाऱ्या पवनचक्‍क्‍यांचे तंत्रज्ञान अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकेल.’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘ फ्लोटिंग विंड एनर्जी’ प्रकल्पाचे प्रमुख पो वेन चेंग यांच्या मते, ‘हे टर्बाइन जमीन किंवा किनाऱ्यांवरील टर्बाइनपेक्षा अधिक ऊर्जेची निर्मिती करतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये वस्तू वाहून नेणे सोपे जात असल्याने तेथे चारशे फूट लांबीचे ब्लेड्‌स व एक हजार फूट उंचीचे टॉवर उभारणेही सहज शक्‍य आहे व जमिनीच्या तिप्पट विजेची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर पाण्याखालच्या हेवी ड्युटी केबलद्वारे वीज किनाऱ्यावरील ग्रीडपर्यंत सहज पोचवू शकते.’ युरोपचे ध्येय या वर्षाखेरपर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ होण्याचे असून, असे प्रयोग त्यात नक्कीच उपयोगी ठरू शकतात. हे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर भारतासारख्या देशांनाही असे प्रकल्प उभारता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research writes article about pawanchakki

Tags
टॉपिकस
Topic Tags: