भविष्यातील अन्न

भविष्यातील अन्न

वनस्पतींपासून तयार केलेले अंडे, फ्रट फ्लायच्या अळ्यांपासून तयार केलेला ‘एनर्जी बार’ किंवा साखरविरहित प्रथिनांपासून तयार केलेली थंडपेये यांची कल्पना कधी केली आहे का? सर्वसामान्य माणसांच्या कल्पनाशक्‍तीच्या पलीकडे असलेल्या या गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. कदाचित, येत्या काही वर्षांत हे आपले नियमित खाणे असू शकेल. वाढती लोकसंख्या, तापमानवाढीमुळे होणारे परिणाम आणि कमी होत जाणारे स्रोत, या पार्श्वभूमीवर असे नवे खाद्यपदार्थ आपल्या समोरील थाळीत येत्या काही वर्षांत वाढले जाऊ शकतात. 

इस्राईलमधील ‘फ्लाइंग स्पार्क’ या स्टार्टअपने अन्नपदार्थ तयार करण्याच्या नव्या पद्धतींवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मर्यादित स्रोतांमुळे पुरेसे पोषणमूल्य असलेले पदार्थ सर्वांना उपलब्ध नसतील. त्यामुळे चांगले पोषणमूल्य असलेले पदार्थ प्रयोगशाळेत तयार करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्पार्क या स्टार्टअपने सुरू केला आहे. काही पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मानवी शरीराचे नुकसानही या नव्या पदार्थांमुळे होणार नाही, अशी आशा स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्या संशोधकांना वाटतेय. थोडक्‍यात, सांगायचे झाले तर संशोधक हे भविष्यातील प्रयोगशाळेतील शेतकरी असतील व प्रयोगशाळेतच मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ तयार केले जातील. फ्लाइंग स्पार्कमधील संशोधक फ्रुट फ्लायच्या अळीपासून (किटडिंभापासून) प्रथिने आणि तेल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी प्रयोगशाळेतच अळीचे प्रजनन केले जात आहे. गाई, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या इतकेच नव्हे तर मासे प्रयोगशाळेत तयार करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी लागणारी जागा, पाण्याचा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर त्यातून पर्यावरणविषयक काही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कीटकांपासून प्रथिने मिळविणे जास्त सोपे आहे, असे मत फ्लाइंग स्पार्क या स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरन ग्रोनिच यांनी व्यक्त केले.

फ्रुट फ्लायच्या अळ्या (लार्वा) स्वच्छ (ब्लांच) केल्या जातात, नंतर त्यांची बारीक पूड केली जाते. या प्रक्रियेत त्यांच्या शरीरातील मेद तेलाच्या रूपाने वेगळा काढला जातो. उर्वरित पुडीमध्ये ७० टक्के प्रथिने, तर १२ टक्के खनिजे असतात. या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाला हानिकारक अशा हरितगृहवायूंचे उत्सर्जन अत्यंत कमी प्रमाणात होते, तर पाणीही कमी लागते. अळ्या पूर्णपणे वापरल्या जात असल्याने कचरा निर्माणच होत नाही, अशी माहिती ग्रोनिच यांनी दिली. तयार झालेली पूड पौष्टिक असते. अशा पुडीच्या साह्याने ‘एनर्जी बार’ तयार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठी थायलंडमध्ये प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

साखरेला पर्याय अमाई प्रथिने
थंड पेयांसह अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. साखर तयार करताना रसायनांचा वापर केला जातो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. यातून मार्ग काढण्यासाठी साखरेला पर्याय ठरू शकणारी अमाई प्रथिने तयार करण्याचा प्रयत्नही कंपनीकडून केला जात आहे. प्रमाणाहून अधिक साखरेच्या सेवनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जगभरातील सुमारे ४० टक्के लोक हे लठ्ठ आहेत आणि त्याचे प्रमुख कारण साखरेचे अति सेवन आहे. फ्लाइंग स्पार्कमध्ये संगणकाच्या साह्याने प्रथिनांची रचना, जैवतंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या तिन्हींच्या एकत्रीकरणातून साखरेला पर्याय तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विषुववृत्तीय भागातील जंगलांत आढळणाऱ्या फळांमधील गोड प्रथिनांचा अभ्यास करून प्रयोगशाळेत तशा प्रकारची प्रथिने आणि साखर तयार करण्यात येत आहे. प्रयोगशाळेत अमाई प्रथिने तयार करण्यात येत आहेत. पाश्‍चरायझेशनसारख्या प्रक्रियेत टिकून राहण्यासाठी आणि पदार्थांचे आयुष्य वाढविण्यासाठी अमाई प्रथिनांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. या प्रथिनांमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यल्प किंवा शून्य असेल. साखरेमुळे यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांवर परिणाम शक्य आहे. तसा परिणाम अमाई प्रथिनांमुळे होणार नसल्याचा दावा संशोधकांचा आहे. अमाई प्रथिनांच्या डीएनएची रचना संशोधकांनी आधी संगणकावर तयार केली. त्यानुसार प्रत्यक्ष प्रथिने तयार केली. यासाठी कवकाचा उपयोग केला गेला. योगर्ट, व्हीप्ड क्रीम, सॉस, बिअर, प्रोटिन शेक आणि थंड पेये तयार करण्यासाठी याचे प्रयोग सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com