भाष्य : सौदीतील सत्तेची साठमारी

saudi-arabia
saudi-arabia

अमेरिकादी पाश्‍चात्त्य देश व तेथील प्रसारमाध्यमांनी फिडेल कॅस्ट्रो, सद्दाम हुसेन, कर्नल गडाफी आणि आता सीरियाचे बशर अल्‌ असद यांना खलनायक ठरविले. त्यापैकी सद्दाम आणि गडाफीचा सोईने वापरही केला. त्या रांगेत सौदी अरेबियाचा युवराज मोहंमद बिन सलमान आहे. सध्यातरी त्याची देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संबंधांतील मनमानी चालवून घेतली जात आहे. सौदी राजे सलमान (वय ८४) यांचा वारस मोहंमद बिन सलमान असेल, असे काही वर्षांपूर्वीच ठरविण्यात आले आहे. राजेशाही व्यवस्थेत सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढण्याची जुनी परंपरा आहे. प्रत्यक्ष राजेपद हाती येण्यापूर्वी संभाव्य स्पर्धकांबाबतचे भय व संशयातून जे होते, तेच सौदीमध्ये घडत आहे. अलीकडेच त्याने राजे सलमान यांचे बंधू, पुतण्या व स्वतःचा सावत्र भाऊ यांना स्थानबद्ध केले असून, त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप आहे. त्याची शिक्षा आजन्म कारावास अथवा देहदंड. या कारवाईला एक संदर्भ आहे. राजे सलमान यांच्या प्रकृतीबाबत अफवा उठत असतात. त्यांच्या मृत्यूनंतर वारसाबाबत वाद उद्‌भवण्याची शक्‍यता असते. राजे सलमान यांनी सौदीच्या युक्रेन व उरुग्वेमधील राजदूतांना शपथ दिल्याची छायाचित्रे प्रसिद्ध करून अफवांचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला. ‘कोरोना’च्या उद्रेकाने संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. त्यामुळे सौदी राजघराण्यातील ताज्या घडामोडींची पुरेशी दखल घेतली गेली नाही. तेल निर्यातदार संघटना (ओपेक) आणि रशिया यांच्यातील वादामुळे तेलाचे उत्पादन वाढविण्याच्या सौदीच्या निर्णयाचीच प्रसारमाध्यमांत चर्चा झाली.

युवराजाच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष
सौदी राजघराण्याशी जवळीक असलेल्या जमाल खशोगी या पत्रकाराची तुर्कस्तानमधील सौदी वाणिज्य कचेरीत दोन ऑक्‍टोबर २०१८ रोजी हत्या झाली. युवराज मोहंमद बिन सलमान हाच त्याचा सूत्रधार होता. खशोगीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. तुर्कस्तानच्या सरकारने या प्रकरणात युवराजालाच जबाबदार धरले. अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेल्या अहवालात हत्येचा ठपका युवराजावरच ठेवला होता. मात्र, ट्रम्प यांनी तो फेटाळला. खनिज तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याने अमेरिका आता पश्‍चिम आशियातील तेलावर अवलंबून नाही. मात्र, आपले प्यादे इस्राईलची सुरक्षा आणि सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, जॉर्डन, इजिप्त, कतार या देशांना होणारी अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्र निर्यात अमेरिकेला या टापूत गुंतवून ठेवीत आहे. अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी पहिला दौरा केला तो सौदी अरेबियाचा. त्यात त्यांनी अमेरिकी शस्त्रास्त्र उत्पादकांसाठी ११० अब्ज डॉलरचे करार करवून घेतले. येमेनमधील यादवीत सौदीच्या हस्तक्षेपामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले. अमेरिकी काँग्रेसने सौदीचा शस्त्रास्त्र पुरवठा रोखण्यासाठी केलेले प्रयत्न ट्रम्प यांनी धुडकावून लावले. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीनेही शस्त्रास्त्रांची ही बाजारपेठ गमवायची नाही म्हणून युवराजाच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष केले.

राजघराण्यात मतभेद
सौदीत एकाच सौद घराण्याची सत्ता आहे. त्याचा संस्थापक मोहंमद इब्न सौद. पट्टराणी बेगम सुदहरीपासून त्याला सात मुलगे झाले. आपल्या मुलांनाच राजेपद मिळावे, यासाठी तिने वचन घेतले होते. विद्यमान राजे सलमान हे शेवटचे. मोहंमद बिन सलमानकडे राजेपदाची सूत्रे देण्याचे त्यांनी ठरविल्याने सौदीची सूत्रे आता पुढील पिढीकडे जातील. मोहंमद बिन सलमानच्या नियुक्तीने राजघराण्यात मतभेद निर्माण झाले. त्याचे पडसाद २०१५ पासूनच उमटत आहेत. राजे सलमान यांचा पुतण्या मोहंमद बिन नायफ हाच पुढचा राजा, असे २०१५ पर्यंतचे चित्र होते. तो कुशल कारभारी होता. अमेरिकेलाही तो विश्‍वासार्ह वाटत होता. त्याचा प्रभाव वाढत असल्याचे दिसल्याने राजे सलमान यांनी एप्रिल २०१५ मध्ये आपला लाडका पुत्र मोहंमद बिन सलमानला उपयुवराज केले व त्याच्याकडे संरक्षण, अर्थव्यवस्थेची सूत्रे दिली. पण, त्याच्या भावी वाटचालीत मोहंमद बिन नायफ या आपल्या पुतण्याचा अडथळा होईल, हे लक्षात आल्यावर त्यांनी २१ जून २०१७ रोजी मोहंमद बिन सलमानची युवराज म्हणून घोषणा केली. त्या वेळी ३४ पैकी ३१ राजपुत्रांची संमती मिळविण्यात आली. त्यामुळे काही राजपुत्र दुखावले. पुतण्या मोहंमद बिन नायफ ‘होयबा’ नव्हता. त्याला राजवाड्यात कोंडून राजेपदावरील दावा सोडण्यास भाग पाडण्यात आले. नायफ याला युवराजपदासाठी अपात्र ठरविण्याकरिता तो अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचा ठपका ठेवण्यात आला.

युवराज मोहंमद बिन सलमानचे वर्णन ‘मॅन इन हरी’ असे केले गेले. येमेनमधील यादवीत हस्तक्षेप, कतारची नाकेबंदी, हे त्याचे निर्णय वादग्रस्त ठरले. सौदी अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. तेलाच्या भावातील चढउतारामुळे अर्थसंकल्पी तूट वाढत होती. मोहंमद बिन सलमानने ‘व्हिजन २०३०’नुसार तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला. नोकरकपातीचा निर्णय आपले आसन अस्थिर करण्यास निमित्त ठरू नये म्हणून त्याने माघार घेतली. बोनसबंदीही मागे घ्यावी लागली. मोहंमद बिन सलमान महत्त्वाकांक्षी आहे. आपले आसन मजबूत करण्यासाठी त्याने जनतेला मोफत घरांचे आश्‍वासन दिले. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, उद्योगांच्या उभारणीद्वारे २०३० पर्यंत तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा त्याचा निर्धार होता. परंतु, आपली ‘डॅशिंग मिलिटरी लीडर’ अशी प्रतिमा उभारण्याच्या नादात येमेनमधील यादवीत भाग घेऊन तो बदनाम झाला. युद्धात हस्तक्षेपाचा निर्णय सामूहिक होता, हा बनावही त्याला पचू शकला नाही. कतारची इराणशी जवळीक खटकल्याने त्याने आखाती सहकार्य परिषदेतील इतर सदस्यांसह त्या देशाची मान्यता रद्द करून नाकेबंदी केली. त्याच्या चुकांवर ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधून टीका करणाऱ्या खशोगीचा काटा काढण्यात आला. आपण सुधारणावादी आहोत, हा त्याचा देखावा जगाने ओळखला. त्याची विश्‍वासार्हता गेली. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचा दौरा करून आपण युवराजाच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला. चुलत भाऊ मोहंमद बिन नायफची अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवर पकड होती. दहशतवादविरोधी मोहिमेत त्याने पाश्‍चात्त्य देशांचीही विश्‍वासार्हता मिळविली होती. त्यामुळे आज ना उद्या त्याच्याकडून आपल्याला धोका निर्माण होईल, या शंकेतून ताजी कारवाई झाली.

गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत सौदी अरेबिया मागास, मध्ययुगीनच राहिला. सौदी संस्थापक इब्न सौद हा वहाबी पंथाचा. त्याने ख्रिश्‍चनांतील ‘प्युरिटन’सारखी सुधारणा चळवळ सुरू केली होती. परंतु, ती नंतर ओसरली. सौदी अरेबिया विस्तृत वाळवंट असल्याने युरोपीयनांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी, हजार वर्षे सौदीतील जीवनपद्धतीत बदल झाला नाही, विकासही झाला नाही. तेलाचा शोध लागल्यानंतर अमेरिकेने सौद घराण्याला हाताशी धरून त्याची मक्तेदारी टिकविण्यासाठी मेहनत घेतली. ट्रम्प यांच्याकडून युवराजाची पाठराखण, हे त्या धोरणाचेच निदर्शक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com