भविष्यवेध : उज्ज्वल भवितव्याची नांदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Future

मागील काही वर्षात आपल्याकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने जागतिक बाजारपेठेतील निर्माण होणाऱ्या संधींच्या शक्यता लक्षात घेत त्यावर अत्यंत वेगाने काम केले आहे.

भविष्यवेध : उज्ज्वल भवितव्याची नांदी

- हरीश मेहता

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत महत्त्वाची कामगिरी बजावण्यास सक्षम झाला आहे. या क्षेत्रातील उद्योजकांच्या बौद्धिक संपदांचे हितरक्षण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कायद्याचे कवच दिले पाहिजे. या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यापक समाजहिताचा विचार केला तर देश आणखी मोठी भरारी घेईल.

अवघ्या पाच कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या भारतातील माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्राने आज वीस हजार कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. १९८० मध्ये सुरू झालेला हा प्रवास हा जादुई आणि अविश्वसनीय वगैरे नव्हता. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले गेले. देशातील क्षमतांचा विकास करण्यासाठी, तसेच या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान, कौशल्य, प्रशिक्षण यांच्यावर भर देण्यात आला. त्यामुळे या जगन्नाथाच्या रथाला गती मिळाली. ‘नॅसकॉम’ने यासाठी लक्षणीय योगदान दिले आहे.

मागील काही वर्षात आपल्याकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने जागतिक बाजारपेठेतील निर्माण होणाऱ्या संधींच्या शक्यता लक्षात घेत त्यावर अत्यंत वेगाने काम केले आहे. आउटसोर्सिंगची लाट असो किंवा ‘एसइआय सीएमएमआय लेव्हल-५’चे प्रमाणपत्र मिळवणे असो, किंवा ‘वाय टू के’साठी तयारी करणे असो, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने या सर्व आव्हानांवर मात करत यश प्राप्त केलेले आहे. तेव्हापासूनच जगात खूप मोठे बदल व्हायला सुरुवात झाली होती. भौगोलिक सीमांची बंधने गळून पडला लागली होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘माथालमपराई’ या अवघ्या दोन हजार उंबरा असलेल्या गावातून ५०० कोटी रुपयांची कंपनी चालवली जात आहे. किंवा बंगळूरमधील एका कंपनीने जगातील सर्वात मोठा ‘एपीआय हब’ बनवत उण्यापुऱ्या एका दशकाच्या आतच या क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवले आहे. अशा पद्धतीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या क्रांतीमुळे आपल्या पुढच्या पिढीचे जगणे हे आतापेक्षा नक्कीच वेगळे असणार आहे, याची मला खात्री आहे.

बौद्धिक संपदेचे रक्षण महत्त्वाचे

आगामी काळात भारतात मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल यांच्यासारखी एखादी कंपनी निर्माण होईल की नाही, हे मी सांगू शकत नसलो तरी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन आणि सॉफ्टवेअरची निर्मिती करून त्यांची सेवा पुरवणाऱ्या भारतीय कंपन्या या जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवणार आहेत, याविषयी काहीच संदेह नाही. खास भारतीय ग्राहकांसाठी विकसित केलेली उत्पादने ही ग्राहकांचा प्रतिसाद, सुधारणा आणि उपयोजन यामुळे अधिक चांगली होऊन त्याला जागतिक मागणी वाढेल. अलीकडच्या काळात भारतीय कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. आपल्याकडे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. निर्मितीच्या प्रेरणेचा अभाव तर मुळीच नाही. आपल्याकडे लाखो संगणक अभियंते आहेत, हजारो स्टार्टअप्स आहेत, ज्यापैकी शंभरहून अधिक कंपन्या जागतिक बाजारपेठेत अग्रगण्य आहेत. आता तर सरकारी यंत्रणेला देखील स्टार्टअप्सचे महत्त्व कळले आहे.

आता जर कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ती म्हणजे उद्योजकांच्या आणि स्टार्टअप्सच्या बौद्धिक संपदेची चोरी होऊ नये किंवा तिच्या कॉपीराइटचे उल्लंघन होऊ नये यासाठी संरक्षण व्यवस्था निर्माण करणे. त्याचप्रमाणे शासनकर्त्यांनी संशोधकांसाठी पूरक वातावरण निर्माण करायला हवे. यासाठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला पूरक असणाऱ्या कायद्यांना बळ देणे आवश्यक आहे. याबाबतचे न्यायनिवाडे वेगाने होणे आवश्यक आहे. यासाठी कायद्याची सुयोग्य चौकट आखणे आवश्यक आहे.

क्षितिज रुंदावावे

त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी, उद्योजक आणि सरकारने आपली कर्तव्ये सुस्पष्टपणे ठरवणे आवश्यक आहे. उद्योजकांनी, आपण माहिती तंत्रज्ञानाच्या नक्की कोणत्या क्षेत्रात काम करत आहोत याची राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना सखोल माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी या क्षेत्रातील युवा उद्योजकांनी सरकारशी संवाद साधला पाहिजे. उदाहरणार्थ प्रशासनातील किती जणांना ब्लॉकचेनबाबत मूलभूत माहिती आहे? किती जणांना मानवी जनुक प्रकल्पाबाबत माहीत आहे? सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे? खरे तर या सगळ्याचा उद्योजकांनी विचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सरकारनेदेखील सर्वांना समान संधी आणि पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत.

आपल्यासमोरील दुसरे आव्हान म्हणजे या क्षेत्रातील उद्योजकांना व्यापकपणे विचार करण्यासाठी प्रोत्साहित करणे. आपल्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत एक ‘व्यावसायिक क्षेत्र’ निर्माण करण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. त्याची स्वतःची अशी ‘इको सिस्टिम’ तयार व्हायला हवी. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी तसे होणे खूपच लाभदायक ठरेल. याचा अर्थ केवळ तुमच्या व्यवसायात वृद्धी करून घेणे असे नसून, सरकारी यंत्रणांबरोबर सुसंवाद ठेवत या क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत. परस्पर सहकार्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहेच, पण त्याचबरोबर जागतिक दृष्टिकोनातून पाहात असताना भारताला केंद्रस्थानी ठेवण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी कोणताही निर्णय घेताना आपल्या निर्णयाचा समाजावर, देशावर काय परिणाम होईल, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

तिसरे आव्हान म्हणजे अल्पकालीन लाभ मिळवण्याच्या मोहापासून सावध राहणे. व्यावसायिक नीतिनियम पाळणे ही बाब महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात अनेक उद्योजक आपल्या सोयीनुसार नियमांची पायमल्ली करत असल्याचे आढळून येते. हे सर्व लपूनछपून चालू असून त्याबाबत कुठेही उघडपणे बोलले जात नाही. पण नियमांचे उल्लंघन करून मिळवलेल्या यशाचा विजयोत्सव मात्र कोणतेही शिष्टाचार न पाळता खुल्यापणाने साजरा केला जात आहे! याचे सर्रास होणारे अंधानुकरण थांबले पाहिजे. दीर्घकालीन टिकणारे आणि सर्वांना समान लाभ मिळवून देणारे यश प्राप्त करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करायला हवे.

या मार्गावर जरी आव्हानांचा डोंगर असला तरी वर सांगितलेल्या तीन मुद्यांवर काम केल्यास आपण आपले उज्ज्वल भवितव्य घडवू शकतो. देशाच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे राज्यकर्ते, उद्योजक आणि युवकांनी एकदिलाने काम करून भारताला ‘सोने की चिडिया २.० ’ बनवण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे.

(लेखक ‘ऑनवर्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेड’चे संस्थापक आणि ‘नॅसकॉम’चे सह-संस्थापक आहेत.)

(अनुवाद - रोहित वाळिंबे)

Web Title: Harish Mehata Writes Future Technology Information

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..