अग्रलेख : घुसमटणारी महानगरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

महानगरांना प्रदूषणामुळे ज्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव हे समस्येचे एक प्रमुख कारण आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ‘काळ्या पैशा’चे मळभ दूर करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असताना दिल्लीसह देशाच्या अनेक महानगरांमधील प्रदूषणाचे मळभही दूर करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. राजधानीवर प्रदूषित वायूंचे दिवाळीपासून आलेले मळभ कायम आहे. एवढेच नव्हे तर आता दिल्लीपाठोपाठ बंगळूर, तसेच लखनौ आदी महानगरांमध्येही जनतेचा दम कसा अशाच प्रदूषणामुळे घुसमटला गेला आहे, त्याच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या आहेत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, हे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारला पद्धतशीर योजना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या राजधानीत नित्यनेमाने वाजणाऱ्या राजकीय फटाक्‍यांबरोबरच दिल्लीकरांनी यंदा वातावरण कमालीचे प्रदूषण करून सोडणारे फटाकेही मोठ्या जोमाने फोडले आणि राजधानीबरोबरच आजूबाजूच्या साऱ्या आसमंतावर चांगलेच मळभ पसरले. दिवाळीस आता जवळपास दोन आठवडे उलटले असले, तरीही हे मळभ दूर होऊ शकलेले नाही, त्यामुळेच अखेर या प्रदूषणास आवर घालण्याच्या दृष्टीने दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकारही कामास लागले आहे. नेमक्‍या याच काळात दिल्ली भेटीवर आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना त्यामुळे साहजिकच १९५२ मध्ये अशाच प्रकारे लंडनवर आलेल्या प्रदूषित मळभाची आठवण आली असणार! लंडनवरील हे मळभ पाच दिवस कायम होते आणि त्यामुळे पसरलेल्या रोगराईत लंडन आणि त्या परिसरातील काही हजार नागरिक हकनाक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ब्रिटनने अशा प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांपासून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.  
एकीकडे केंद्र सरकार आणि राजधानीतील केजरीवाल सरकार यांच्यात या प्रदूषणाच्या जबाबदारीवरून जोरदार हमरातुमरी सुरू आहे, तर केंद्र सरकार या प्रदूषणास शेजारील राज्ये कारणीभूत असल्याचा दावा करून आपले हात झटकून टाकू पाहत आहे. या पार्श्‍वभूमीवर बंगळूर, तसेच लखनऊ या दोन महानगरांमधील प्रदुषणाची आलेली वृत्ते ही धोक्‍याची घंटा वाजवणारीच आहेत. बंगळूरूमध्ये गेल्या काही महिन्यांत मोटारींची संख्या वारेमाप वाढली आहे आणि या प्रदूषणास ती वाहनेच जबाबदार आहेत, असा निष्कर्ष सहज काढता येतो. मार्च २०१५ मध्ये बंगळूरमध्ये नोंद झालेल्या विविध प्रकारच्या वाहनांची संख्या ५५ लाख होती. पुढच्या काही महिन्यांतच ती वाढता वाढता वाढे या न्यायानुसार मार्च २०१६ मध्ये ६१ लाखांवर जाऊन पोचली. आणखी एक बाब म्हणजे जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांतच ती चार लाखांनी वाढली होती. अर्थात, खासगी वाहनांच्या या बेसुमार वाढीस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, तसेच या वाहतुकीविषयी नवश्रीमंतांच्या मनात असलेली घृणाही कारणीभूत आहे. लखनौमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. जगातील सर्वांत प्रदूषित अशा २० शहरांची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने मे २०१६ मध्ये घेतली होती. त्यात लखनौने १८ वा क्रमांक पटकावला होता! त्यानंतर आता या महानगरातील प्रदूषण वाढत वाढत दिल्लीच्या पातळीवर जाऊन पोचले आहे आणि भारतातील अन्य प्रमुख महानगरांची परिस्थितीही फार काही वेगळी नाही. त्यामुळे सरकारबरोबरच देशातील ‘आम आदमी’नेही या संदर्भात जागरूकपणे काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
लंडनवर १९५२ मध्ये पसरलेल्या ‘द ग्रेट स्मॉग’नंतर तेथील सरकार खडबडून जागे झाले आणि १९५६ मध्ये ब्रिटनमध्ये ‘क्‍लीन एअर ॲक्‍ट’ तयार करण्यात आला. या कायद्यातील साऱ्याच्या साऱ्या तरतुदी दिल्लीत लागू करता येणे व्यवहार्यही नाही आणि शक्‍यही नाही. तरीही त्यापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. या कायद्यात कारखाने आणि अन्य औद्योगिक समूहांवर प्रदूषणासंबंधात जे काही कठोर निर्बंध लागू केलेले आहेत, ते लखनौ तसेच कानपूर या पट्ट्यांत लागू करण्याची नितांत गरज आहे. कानपूर आणि त्यालगतच्या परिसरात असलेले चामड्याच्या वस्तू बनवणारे कारखाने केवळ हवाच नव्हे तर गंगा नदीच्या प्रदूषणातही वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात भर घालत आले आहे. दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी मात्र त्याचा नेमका उगम प्रथम शोधून काढावा लागणार आहे. आपल्या देशात कचरा जाळण्याचे प्रमाण फार मोठे आहे आणि सध्या राजधानीच्या परिसरात असे प्रकार सतत सुरू असतात. अशा अनेक बाबी आहेत आणि केवळ सर्वोच्च न्यायालय काय आदेश देईल, यावर अवलंबून राहता येणार नाही. त्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेनेच तज्ज्ञांची मदत घेऊन पुढे यायला हवे. प्रदूषण निर्मूलनाच्या प्रयत्नांत लोकसहभागाची नितांत गरज आहे.अन्यथा, दिल्ली तसेच देशातील अन्य महानगरांची परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका स्पष्ट दिसतो आहे.

Web Title: Health issue in Metropolitan cities