esakal | अग्रलेख : पाऊस कधीचा पडतो...
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rainfall

महाराष्ट्रावर वरुणराजाने पावसाळ्याच्या सुरवातीला चांगलाच ताण देऊन अवकृपा केली, असे वाटत असतानाच आता राज्याच्या काही भागांत श्रावणातच पावसाला ‘आता पुरे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

अग्रलेख : पाऊस कधीचा पडतो...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणांबरोबरच नागरिकांचा सजग आणि सक्रिय सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. नगरविकासाचे नियम धाब्यावर बसविण्याचे दुष्परिणामही समोर आले असून, त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. 

महाराष्ट्रावर वरुणराजाने पावसाळ्याच्या सुरवातीला चांगलाच ताण देऊन अवकृपा केली, असे वाटत असतानाच आता राज्याच्या काही भागांत श्रावणातच पावसाला ‘आता पुरे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधील जनजीवन गेले चार दिवस पुरते कोलमडून पडले आहे. नरसोबावाडीतील मंदिराच्या शिखराला पाणी लागले आणि नाशिकच्या गोदावरीत उभा असलेला दुतोंड्या मारुती पाण्याखाली पूर्ण बुडाला; तर सांगलीत कृष्णेने धारण केलेल्या रुद्रावतारामुळे हाहाकार माजला. दक्षिण महाराष्ट्रातील बहुतेक मोठी धरणे ओसंडून वाहत आहेत आणि त्यातून रोंरावत बाहेर पडणाऱ्या तुफानी पावसाचा फटका केवळ नदीकाठच्याच वस्त्यांना बसला असे नाही, तर या वस्त्या पोटात घेऊन हे पाणी आता गावागावांत घुसले आहे. या वेळी पाऊस जास्त झाला, हे तर कारण आहेच; पण एकूणच नगरनियोजनाचा उडालेला बोजवारा आणि सर्वच पातळ्यांवर नियमांचे उल्लंघन करण्याची बोकाळलेली वृत्ती यांचाही फटका बसत असल्याचे दिसते. विदर्भाकडे प्रारंभी पावसासाठी नवस बोलण्यास लोकांनी सुरवात केली होती. मात्र, आता गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाने फटका दिला असून, लोकांच्या हालअपेष्टांना पारावार उरलेला नाही. मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे, तर तिकडे नाशकात त्र्यंबकेश्‍वर परिसरातील पावसाच्या दणदणाटामुळे गंगापूर धरण भरून वाहत आहे आणि गोदेचे हे पाणी थेट मराठवाड्यातील जायकवाडीपर्यंत जाऊन पोचले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती हलाखीची असून, शेकडो लोक जागोजागी अडकून पडले आहेत. मात्र, या वेळी सरकारी यंत्रणा कमालीच्या सजग असून, अडकून पडलेल्या लोकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांनी पुढे केलेला मदतीचा हात यामुळे पूरग्रस्तांचा धीर सुटलेला नाही.

स्वातंत्र्यानंतर राज्यात पाटबंधाऱ्यांचे जाळे उभे राहिले आणि कोयनेसारख्या मोठ्या धरणातून होणाऱ्या वीज-निर्मितीमुळे तर या परिसराचे चित्रच बदलून गेले. मात्र, पावसाने यंदा कहर केला आणि धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्यामुळे ज्या गावांत पावसाचा थेंबही पडला नव्हता, तेथील नद्यांनाही पूर आले. नगरविकासाचे नियम धाब्यावर बसवून नदीकाठी झालेली बेकायदा बांधकामे, नदीच्या पात्रांतून काढलेले रस्ते आणि नद्यांमधून बेसुमार वाळूउपसा करणारे माफिया आणि नदीकाठच्याच भागात ‘रिव्हर व्ह्यू’ घरांची आमिषे दाखवत बिल्डर लॉबीने केलेली राक्षसी वृक्षतोड, या साऱ्या संकटास कारणीभूत ठरली आहे. घाटांमध्ये झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे डोंगर भुसभुशीत होऊन गेले आणि दरडी रोजच्या रोज कोसळू लागल्या. पावसाच्या या फटक्‍यातून पुणेकरांचीही सुटका झाली नाही आणि पाच दशकांपूर्वीच्या पानशेत धरण फुटून माजलेल्या हाहाकाराच्या आठवणी जागवल्या गेल्या, तर कोल्हापूर शहराला पाण्याने वेढले असताना, पंपिंग स्टेशनही पाण्याखाली बुडाल्यामुळे आता पुढचे चार दिवस करवीरवासीयांना तहानलेल्या अवस्थेतच काढावे लागणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाढत्या डिजिटल प्रसाराचा फायदा या वेळी सरकारी यंत्रणांनी योग्य उठवला आणि लोकांना सजग राहण्याचे आणि वस्तुस्थितीची माहिती देण्याचे काम दर चार तासांनी होत राहिले, ही मोठीच दिलासादायक बाब आहे. विविध यंत्रणांमधील समन्वय, स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांचा पुढाकार, एकमेकांना मदत करण्याची तत्परता या बळावर या संकटाचा मुकाबला करता येईल. या वेळचे चित्र एका वेगळ्या गोष्टीमुळे स्मरणात राहील आणि ती म्हणजे आपद्‌ग्रस्तांच्या मदतीस धावून आलेले शेजारी. राज्याला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि अनेक बडे नेते आपापल्या यात्रांमध्ये दंग असताना, सरकारी यंत्रणांबरोबरच सर्वसामान्य माणसाने पुढे केलेला मदतीचा हात हाच लाखमोलाचा ठरला आहे. संकटे ही सांगून येत नसतात आणि अशा वेळी कायम सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहता कामा नये, हाच या संकटाने शिकवलेला धडा आहे. अर्थात, हे संकट केवळ अस्मानी आहे, असे म्हणून आपण यापुढे स्वस्थचित्त बसता कामा नये; कारण, या संकटास माणसांनी निसर्गावर केलेले अत्याचारही तेवढेच कारणीभूत आहेत, हे विसरता कामा नये. तूर्तास, आपण ‘शं नो वरुण:’ अशी प्रार्थना करूया. एकमेकांना मदतीचा हात आणि दिलासा देऊया. मात्र, यापुढे निसर्गाशी वैर करून चालणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे; अन्यथा, अशी संकटे नित्यनेमाने येण्याची वेळ आता फारशी दूर राहिलेली नाही.

loading image