वाचाळवीरांचा धुमाकूळ

Himanta Biswa Sarma
Himanta Biswa Sarma

"कर्करोगासारखे गंभीर आजार ज्यांना होतात, त्यांच्या पापकर्माचे ते फळ असते. हा एक दैवी न्याय असतो,' हे उद्‌गार बाबा, बापू, बुवांचे भरघोस पीक असलेल्या या भूमीत निघाले, तर कदाचित त्याचे कोणाला आश्‍चर्य वाटणार नाही. अशी भंपकगिरी करणारे अनेक बुवाबाज भवताली दिसतात आणि त्यांचे ऐकून माना डोलाविणाऱ्यांचीही आपल्याकडे कमतरता नाही; पण अशा प्रकारची मुक्ताफळे उधळणारी व्यक्ती ही एका राज्याच्या आरोग्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारी मातब्बर "असामी' आहे, हे केवळ धक्कादायक म्हटले पाहिजे.

हिमांत विश्‍व शर्मा हे आसामच्या सोनोवाल मंत्रिमंडळातील एक वजनदार मंत्री. गेल्या वर्षी आसामात कॉंग्रेसला हटवून भाजपचे सरकार सत्तेवर आले; त्याआधीच काही महिने बदलत्या वाऱ्याचा अंदाज घेऊन कॉंग्रेसमधून भाजपच्या तंबूत डेरेदाखल झालेले शर्मा अर्थ, शिक्षण आणि आरोग्य अशी महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. असे बेताल वक्तव्य केल्यामुळे असाध्य आजाराने आधीच पीडित असलेल्या व्यक्तींना काय वाटेल, याची या शर्मा यांना बिल्कुल पत्रास नाही. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त झाल्यानंतरही दिलगिरी तर सोडाच; पण आपण कसे हिंदू तत्त्वज्ञानाचे समर्थक आहोत, याची फुशारकीदेखील त्यांनी मारली. पाप-पुण्याच्या बाता करणाऱ्या शर्मामहाशयांनी स्वतःचे काम मात्र अगदी सोपे करून टाकले आहे. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था झाल्याने वंचित घटकांतली रुग्णांचे होणारे हाल, संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव, दुर्गम भागातील वैद्यकीय सुविधांचा ठणठणाट यांपैकी कशाचीच फिकीर करण्याची त्यांना गरज नाही. तशी ती करा, असे सांगणाऱ्यांना ते विचारू शकतील, की, "लोकांचे हाल कमी करणे म्हणजे दैवी योजनेत केलेला हस्तक्षेप नव्हे का?' बुरसटलेल्या विचारांची ही कथित मौक्तिके शर्मा यांनी उधळली तीदेखील शिक्षकी पेशाला सुरवात करणाऱ्यांसमोर. त्या बिचाऱ्यांनी यातून नेमका कोणता बोध घेतला असेल? एकंदरीतच अशा वाचाळांना त्यांची जागा दाखवून दिली जात नाही, हीच खेदाची बाब. त्यामुळे "पंतप्रधानांविरुद्ध उठणारे हात कलम करू', अशी उद्दाम विधाने बिहार प्रदेश भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय जाहीरपणे करू धजतात आणि "मी फक्त एक मुहावरा वापरला', असा खुलासा करतात. एकूणच असल्या मंडळींना चांगले "मुहावरे' आणि निकोप विचार यांचेच धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com