esakal | हौस ऑफ बांबू - मराठी साहित्याचे लसीकरण करा...!

बोलून बातमी शोधा

marathi }

मराठी साहित्यविश्वाला (पक्षी : मला) काळजीत टाकणाऱ्या दोन बातम्या गेल्या आठवड्यात दणादणा येऊन कानावर आदळल्या. नहीऽऽऽ…असे चित्रपटातील नायिकेप्रमाणे कानावर हात ठेवून ओरडल्येदेखील.

हौस ऑफ बांबू - मराठी साहित्याचे लसीकरण करा...!
sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार..! मन खट्टू झाले आहे. ‘जिवलऽऽगाऽऽ राऽऽहिलेरे दूरघर माझेऽऽ ’ हीच ओळ कालपर्वापास्नं ओठांवर रुंजी घालते आहे. अवेळी येणाऱ्या पावसासारखा मनात करुण भाव दाटून आला आहे. मराठी साहित्यविश्वाला (पक्षी : मला) काळजीत टाकणाऱ्या दोन बातम्या गेल्या आठवड्यात दणादणा येऊन कानावर आदळल्या. नहीऽऽऽ…असे चित्रपटातील नायिकेप्रमाणे कानावर हात ठेवून ओरडल्येदेखील. पण… दोन्ही बातम्या आमच्या नाशकातूनच आल्या होत्या. मानाचा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा रद्द झाला, आणि पानाचा जनस्थान पुरस्कारही समारंभही बारगळला. (म्हंजे मानही गेले, पानही गेले!) इजा झाला, बीजा झाला, आता तिजा म्हणून साहित्य संमेलनावर कुऱ्हाड न येवो, म्हंजे मिळवली, असे मनाशी घोकत देव पाण्यात बुडवून बसल्ये आहे.

‘नको नको रे कोरोना, असा घालूस धिंगाणा’ अशी विनवणी करत आहे. उपयोग झाला तर बरंच आहे. पण हे असले विषाणू विनवण्यांना भीक घालत नाहीत.

तेथे पाहिजे जातीचे।
येरागबाळांचे हे कामचि नोहे!

मराठी साहित्याच्या सरसकट लसीकरणावाचून पर्याय नाही, हे सांगण्यासाठी मी थेट संयोजक (आणि नाशिकभूषण) मा. हेमंतराव टकलेजींना फोन केला. ते हळू हळू आवाजात काही तरी बोलत राहिले. ‘दोन-तीन दिवसात निकाल घेऊ’ असं म्हणालेले मी तरी ऐकलं! बाकी हे गृहस्थ दिसतात साहित्यिकांसारखे तजेलदारपणे, बोलतात कविवर्यांसारखे हळूवारपणे आणि वागतात मात्र पुढाऱ्यासारखे चतुरपणे! त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की ‘‘ते काही नाही! संमेलन व्हायलाच पाहिजे. आम्ही ब्यागा भरुन ठेवल्या त्या का उगाच?’’

इतर संपादकीय लेख वाचण्यासाठी क्लिक करा

‘‘अहो, पहावं लागेल…गोदावरी गौरव रद्द करावा लागला! जनस्थानही राहिला…’’ इति टकलेजी. ‘पळे जाती, घटका जाती, तास वाजे घणाणा…’च्या चालीवर आमचे हे टकलेमहाराज असं तासंतास बोलू शकतात हे आम्हाला माहीत आहे. म्हणून घाईघाईने आम्ही त्यांना आवरले.

‘‘अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं रुपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य लसीकरण संमेलनात करा! मग बघा, संमेलन यशस्वी होतं की नाही ते!’’ आम्ही त्यांना उपयुक्त सूचना केली. त्यांचे डोळे लागलीच चमकले. ( म्हंजे असावेत! फोनवर कसं दिसणार?) ‘‘क्काय म्हणालात? साहित्यिकांचं लसीकरण?’’ ते. ‘‘ऊंहूं! अखिल मराठी साहित्याचं लसीकरण!’’ मी दुरुस्ती सुचवली. ते ‘बघू, निकाल घेऊ’ असं म्हणाले. मी फोन ठेवला.

९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मांडव नाशकात पडला आहे. मराठी साहित्याचे सरसकट लसीकरण सुरु झाले आहे. साहित्यिकांच्या रांगा मांडवाच्या प्रवेशद्वाराशी उभ्या आहेत. कवीमंडळींनी वेगळी रांग लावावी, अशा उद्घोषणा दिल्या जात आहेत. आतमध्ये काही साहित्यिक सदरा आत्ताच काढून दंड सर्सावावा की कसे? या गोंधळात नुसतेच हिंडत आहेत. लस टोचून घेतल्यानंतर दंड सुजला तर लेखन अवघड होईल, या भीतीने काही साहित्यिक लस वेगळ्याच ठिकाणी घ्यावी, या विचारात पडले आहेत. काही लेखकलोक नुसतेच गंजीफ्राकावर तय्यार बसले आहेत.

देश विदेशातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एका कक्षामधून काही साहित्यिक विजयी मुद्रेने एका हाताच्या बोटांचा पाचुंदा त्याच खांद्याला टेकवून फिरकी गोलंदाजाच्या आविर्भावात बाहेर येत आहेत- ‘लस मिळाली! लस मिळाली!’ असा आरडाओरडा होतो आहे.

लेखनकला किंवा काव्यकला हे गुण सहव्याधी (पक्षी : कोमॉर्बिडिटी) समजून समस्त मराठी लेखकांना एकाच मांडवात लस टोचण्याचा हा कार्यक्रम दिगंतात गाजेल, याबद्दल माझ्या मनीं तरी शंका नाही. मराठी साहित्य जगवण्यासाठी एवढे कराच! देव करो, आणि करोना मरो!