शतदा प्रेम करावे...(अग्रलेख) 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

दैवदत्त लाभलेल्या घनरेशमी आवाजाच्या जोरावर मराठी भावगीतांना गर्भश्रीमंत करणारे अरुण दाते देहाने आपल्यामध्ये उरले नसले, तरी रसिकांच्या हृदयातील त्यांचे स्थान त्यांच्याच "शुक्रताऱ्या'सारखे अढळ राहील. 

ख्यातनाम ब्रिटिश विनोदकार पी. जी. वूडहाउस यांची कन्या लिओनारा निवर्तली, तेव्हा हादरून गेलेल्या अवस्थेत ते म्हणाले होते, "मला वाटलं की ती अमर आहे...' मराठी मनामनांवर निर्विवाद अधिराज्य गाजविणारे विख्यात भावगीत आणि गजलगायक अरुण दाते यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलासक्‍त मनाची हीच अवस्था झाली असेल. अरुण दाते यांची भावगीते अक्षरश: अजरामर आहेत. ती कधी जुनी होणार नाहीत किंवा विरूनही जाणार नाहीत. किंबहुना, मराठी भावगीत आणि अरुण दाते हे एक अद्वैतच मानायला हवे. 

गेली 56 वर्षे नित्यनेमे आळवली जाणारी ही गाणी, त्यांची अशी उरलीच होती कुठे? ती केव्हाच मराठी मनांची मिरास झाली होती. स्पष्ट शब्दोच्चार, त्या गीताच्या शब्दांमधला भावार्थ रसिकापर्यंत अचूकपणे पोचविण्याची विलक्षण हातोटी आणि दैवदत्त लाभलेला घनरेशमी आवाज यांच्या जोरावर दाते यांनी मराठी भावगीतांचे दालन समृद्ध करून टाकले असे म्हटले, तर ते फार गुळगुळीत स्वरूपाचे विधान ठरावे.

अरुण दाते हेच मराठी भावगीतांच्या दालनाचे दुसरे नाव होते. बरोबर 56 वर्षांपूर्वी सुरांचा हा सिलसिला सुरू झाला. इंदूरहून मुंबईला पोटार्थासाठी आलेल्या या तरुणाने अल्पावधीत मराठी भावगीतांना वेगळाच रंग चढविला. त्यांच्या आवाजातला "दर्द' आणि "कशिश' थेट हिंदी-ऊर्दू काव्यगायनाशी नाते सांगणारी होती. नवलाई अशी की इंदूरचे हे पाणी त्यांनी सहजतेने मराठी गाण्यांवर चढविले. 

दाते कुटुंबाचे मुक्‍कामाचे मूळ गाव इंदूर असले, तरी अवघे कुटुंब होते सुरांच्या गावाचे रहिवासी. वडील रामूभैया दाते हे तर रसिकाग्रणी म्हणून कलावंतांमध्येही प्रिय होते. घरात अहोरात्र गाणेबजावणे असे. ज्यांना साक्षात बेगम अख्तर समोरून कुर्निसात करत असे, अशा रामूभैयांच्या पोटी जन्माला आलेल्या अरुण दाते यांना ऊर्दू शायरी आणि गायकी यांचे बाळकडू मिळाले नसते तर नवल होते. नजीकच राहणाऱ्या कुमार गंधर्वांशी वडिलांची दोस्ती, "पु.लं.'सारख्या प्रतिभावंताचे सतत जाणेयेणे, के. महावीर यांच्याकडे गिरविलेले शास्त्रीय संगीताचे धडे यामुळे दाते यांचा सूर आणि समज पक्‍की होत गेली. परंतु असे असूनही, गाण्याबजावण्यासाठी त्यांनी शिक्षण दुय्यम मानले नाही. टेक्‍स्टाइल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पुरा करून त्यांनी उपजीविकेची सोय केली. गाण्याचा रियाझदेखील चालूच ठेवला. वास्तविक तो एक मन्वंतराचा काळ होता. 

भावगीते मराठीला नवी नव्हती. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकात काही मराठी कवितांना चाली लावून म्हणण्याचे प्रयोग होत होते. तशा गाण्यांच्या तबकड्या तेव्हाही निघत होत्या. गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, जीएन जोशी यांच्यासारख्या गायकांचे मराठी श्रोत्यांवर गारुड होते. गणेशोत्सवाच्या मेळ्यात किंवा तत्सम उत्सवात शहरगावाच्या चौकात वा मांडवात वाटवे-नावडीकरांची भावगीते हटकून भाव खाऊन जात. "यमुनाकाठी ताजमहाल', "राधे गं तुझा सैल अंबाडा', " रानारानात गेली बाई शीळ', "रानात सांग कानात आपुले नाते' अशी कितीतरी गाणी मराठी रसिकांच्या ओठांवर रुळायची.

या आघाडीच्या भावगीत गायकांव्यतिरिक्‍त इतर हौशी गायकमंडळी कार्यक्रम करत होती आणि रेडिओ नावाच्या यंत्राने तर भावगीतांची पेठच उघडली होती. कालांतराने या माहौलालाही उतरती कळा लागली. मराठीच्या सांस्कृतिक सरहद्दी विस्तारण्यासाठी धडपडत होत्या. साठोत्तरी साहित्यातील बंडखोर प्रवाहाबरोबरच "कृष्णसख्याच्या व्यभिचाराची गाणी' बंद व्हावीत, म्हणून ओरड होऊ लागली. तसल्या उणीवेच्या काळात दाते यांचा अरुणोदय झाला. 

मराठी भावगीतांच्या विश्‍वातील त्यांची "एंट्री'च एखाद्या सुखद झुळकीसारखी आहे. 1962 मध्ये "शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी...' या गीताचा जन्म झाल्यानंतर तर मराठी भावगीताच्या क्षेत्रात जणू "दातेयुग' सुरू झाले. श्रीनिवास खळे यांची मनलक्ष्यी चाल, मंगेश पाडगांवकरांची वेचक शब्दयोजना यांना कोंदण लाभले होते अरुण दाते यांच्या अद्‌भुत सुरांचे. आजही या गाण्याची जादू कायम आहे.

इतकी की टीव्हीवरला कुठलाही संगीताचा रिऍलिटी शो किंवा भावगीतांचा कार्यक्रम त्याशिवाय अपुरा वाटावा. "शुक्रतारा' नभी उगवल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मराठी भावगीतांना गर्भश्रीमंत करणाऱ्या अरुण दाते यांचा स्वर म्हणूनच अजरामर मानायला हवा. अरुण दाते देहाने आपल्यामध्ये उरले नसले, तरी त्यांचे आपल्या हृदयातील स्थान त्यांच्याच "शुक्रताऱ्या'सारखे अढळ राहील. 

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी 
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी 
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती... 
...दाते यांच्याच गीतातल्या या ओळी, लक्षावधी चाहत्यांच्या डोळ्यांत ज्योती लावून गेल्या. 
 

Web Title: Hundred Times love Editorial Pune Edition Arun Date