प्रखर प्रत्त्युत्तर (अग्रलेख)

india air strike on pakistan
india air strike on pakistan

दहशतवादी कृत्ये भारत सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाई दलाने केली आहे.

अखेर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला आहे. भारत ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेधापलीकडे जात नाही आणि अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानला दुखावण्याचे धाडस तो करणार नाही, या प्रकारच्या सर्व समजुतींच्या ठिकऱ्या उडवत तेरा लढाऊ मिराज विमाने पहाटे पाकव्याप्त काश्‍मिरात घुसली आणि त्यांनी ‘जैशे महंमद’चा तळ उद्‌ध्वस्त केला. या धाडसी कारवाईने अनेक वर्षे दहशतवादाचा सामना करीत आलेल्या तमाम भारतीयांचे मनोबल उंचावले आहे. ‘जैशे महंमद’ संघटनेने पुलवामा येथे केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान हुतात्मा झाल्यानंतर अखेर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर आपल्या हवाई दलाच्या मिराज विमानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमधील बालाकोट येथे अकस्मात हल्ला चढवला आणि ‘जैश’चे अनेक तळ उद्‌ध्वस्त तर केलेच; शिवाय अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पाकपुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला होता आणि त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावून आपले नाव इतिहासात रोशन केले. त्याबद्दल अवघा देश हवाई दलाचे अभिनंदन करत आहे. या हल्ल्यात सहभागी झालेली तेराच्या तेरा मिराज विमाने आपल्या तळांवर थेट परतली आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. दहशतवादी वा त्यांना संरक्षण देणारे पाकिस्तानी लष्कर यांना ताकास तूर लागू न देता आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते, इतक्‍या काही क्षणांत हवाई दलाने ही कारवाई केली आहे. यामुळे आता अतिरेकी तसेच पाकिस्तानी लष्कर यांचे ताबूत कायमचे थंडावतील काय, की पाकिस्तानी लष्कर याचा बदला घेईल काय, अशी चर्चा सुरू आता सुरू झाली आहे. अर्थात, आजवरचा पाकिस्तानचा इतिहास बघता तो देश स्वस्थ बसणे कठीणच आहे. त्यामुळेच ‘बदला घेतला!’ आणि ‘सूड उगवला!’ अशा प्रतिक्रिया देशभरातून येत असल्या तरीही भारताला स्वस्थ बसता येणार नाही. उलट या कारवाईमुळे संतप्त झालेला पाकिस्तान आता कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे गृहीत धरून आपल्याला या पुढे अधिकच सजग राहावे लागणार आहे. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान आहे आणि या कारवाईचे कोणतेही राजकारण न करता देशाच्या सर्व स्तरांतून व्यक्‍त होत असलेला ‘जोश’ समजण्यासारखा आहे. मात्र, त्या उत्साहाचा अतिरेक होता कामा नये, याचीही दक्षता देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाबरोबरच सर्वपक्षीय राजकारण्यांनीदेखील घ्यायला हवी.
या धडक-कारवाईनंतरही पाकिस्तानचे भूत सुतासारखे सरळ झालेले नसून, उलट प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याबरोबर भारतीय विमानांनी पळ काढला, असे तारे पाकिस्तानकडून तोडले जात आहेत. त्यापलीकडची बाब म्हणजे प्रत्यक्षात या हल्ल्यात ‘जैश’चे अनेक अतिरेकी ठार झालेले असतानाही फक्‍त दोनच जण ठार झाले, असा दावाही पाकिस्तान करत आहे. अर्थात, पाकच्या या अशा फोलपटासारख्या वाऱ्यावर उडून जाणाऱ्या दाव्यांकडे दुर्लक्ष करणेच सोयीचे आहे. मात्र, भारताच्या या विजयी आणि यशस्वी कारवाईनंतर किमान ‘जैश’ला तरी दहशत बसायला हवी. ‘जैशे महंमद’ या पाकपुरस्कृत अतिरेकी संघटनांनी गेली काही वर्षे केवळ काश्‍मीरच्या खोऱ्यातच हैदोस माजवला होता, असे नाही तर २००१ मध्ये थेट भारताच्या संसदेवर हल्ला करण्यापर्यंत या संघटनेची मजल गेली होती. योगायोगाची बाब म्हणजे तेव्हाही देशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीलच सरकार होते. त्यानंतर पुढचे जवळपास एक तप म्हणजे १२ वर्षे ही संघटना स्वस्थ होती. मात्र, याचा अर्थ तेव्हा दहशतवादी आणि अतिरेकी कारवाया थांबल्या होत्या, असा बिलकूलच नाही. याच एका तपाच्या काळात ‘लष्करे तैयबा’ आणि ‘हिज्बुल मुजाहिदीन’ या संघटनांच्या मार्फत या कारवाया होत होत्या. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पूर्ण बहुमत मिळवून सत्तारूढ झाले आणि नंतरच्या दोन वर्षांत पुनश्‍च एकवार ‘जैश’ने आपले दात दाखवायला सुरवात केली. २००४ ते २००१२ या काळात ‘लष्करे तैयबा’ आणि ‘हिज्बुल’ या संघटना आंतरराष्ट्रीय निशाण्यावर आल्या होत्या आणि हाफिज सईद याला पकडून देणाऱ्यास तर अमेरिकेनेच एक कोटी डॉलरचे इमान जाहीर केले. त्यानंतर पाकिस्तानने या दोन संघटनांऐवजी ‘जैश’चा वापर करून घेण्यास सुरवात केली, असे दिसते. जानेवारी २०१६मध्ये पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला असो, की त्यानंतर लगेचच त्याच वर्षीच्या सप्टेंबरमध्ये उरी येथे झालेली घुसखोरी असो, त्यामागे ‘जैश’हीच संघटना होती, हे निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे. मात्र, पाकिस्तानात सरकार कोणाचेही असो, ते ‘जैश’ला पाठीशीच घालत होते. भारताकडे कायम पुराव्यांची मागणी करत असे. भारताने त्यानुसार पठाणकोट हल्ल्याचा तपशील सादर करणारे एक दस्तावेज ‘पठाणकोट डोसियर’ पाकिस्तानला सुपूर्दही केले; पण त्यानंतरही पाकिस्तानी लष्कराचा या अतिरेकी संघटनेला पूर्ण पाठिंबा असल्याने तेथील नागरी सरकार कारवाईपासून चार हात दूरच राहत आले. त्याचीच परिणती अखेर पुलवामा येथील भीषण हल्ल्यात झाली आणि त्यानंतरही ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देणारे पंतप्रधान इम्रान खान यांनीही तेच तुणतुणे लावले. त्यामुळेच अखेर भारताला ही कारवाई करणे, भाग पडले आहे.
या हल्ल्याचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटणार, हे उघडच आहे आणि पाकिस्तानही ‘भारताने केलेले हे अत्यंत गंभीर असे आक्रमण आहे!’ असा दावा करू पाहत आहे. या हल्ल्यात ‘जैश’चा प्रमुख मौलाना मसूद अझर याचा मेव्हणा आणि अन्य काही कुख्यात अतिरेकी ठार झाले आहेत.  ‘जैश’चे अतिरेकी काही आणखी हल्ले करणार, हे उघड झाल्यामुळेच आपल्याला ही कारवाई करणे भाग पडले, अशी भूमिका भारताने घेतली आहे आणि ती रास्त आहे. त्यामुळेच या कारवाईचा विचार हा ‘राजनैतिक पातळी’वर करावा लागतो. परराष्ट्र सचिवांनी केलेले निवेदन म्हणजे या संपूर्ण मोहिमेकडे भारत प्रामुख्याने राजनैतिक पातळीवर पाहतो, हे दाखविणारेच आहे. भारतात त्यामुळेच या कारवाईनंतरच्या अवघ्या १२ तासांत राजस्थानात झालेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी या हल्ल्याचा उल्लेखही केला नसला तरी ‘आजचा दिवस हा एक मोठा दिवस आहे!’ असा या सभेत झालेला उल्लेख आणि त्यापाठोपाठ भाषण सुरू करताना, मोदी यांनी दिलेल्या ‘भारतमाता की जय!’ अशा घोषणा तसेच ‘देश अब सुरक्षित हाथों में है... सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटा दूँगा...’ या पंक्‍ती त्यांचा रोख नेमका काय आहे, ते सांगून जात होत्या. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १९९९ मध्ये अविश्‍वास ठरावावर अवघ्या एका मताने पराभूत झाले आणि पुढे लगोलग ‘कारगिल’ नावाचा इतिहास घडला. त्याचा फायदा वाजपेयी यांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी झाला होता. त्याची आठवण यानिमित्ताने होणे, स्वाभाविक आहे. आता या हल्ल्याचा मोठा गाजावाजा, तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात होणार, हेही उघड आहे. मात्र, भारत तसेच पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांना युद्ध परवडणारे नाही. सर्वसामान्य जनता तसेच टीव्हीच्या शेकडो चॅनेलवरून भारंभार बोलणारे राजकारणी तसेच ‘सेलेब्रिटी’ यांनी संयम पाळणे जरुरीचे आहे. पाकिस्तान या कारवाईनंतर स्वस्थ बसणे शक्‍य नाही. त्यामुळेच भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करतानाच, सरकार तसेच सर्वपक्षीय राजकारणी आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य जनता यांनी चिथावणीखोर भाषेऐवजी सतर्कच राहायला हवे. त्यातच देशाचे हित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com