मुंबई होणार समुद्रात लुप्त

Arabian-sea-mumbai
Arabian-sea-mumbai

समुद्राच्या पातळीत वाढ होत असून, २०५० पर्यंत भारतातील साडेतीन कोटी नागरिकांचे वास्तव्य असलेले किनारी प्रदेश जलमय होण्याची भीती आहे. जागतिक कार्बन उत्सर्जन आटोक्‍यात न आल्यास या शतकाच्या अखेरपर्यंत तब्बल पाच कोटी १० लाख भारतीयांचे जीवित धोक्‍यात येईल, असा इशारा ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘क्लायमेट सेंट्रल’ या संस्थेच्या अभ्यास अहवालात देण्यात आला आहे. कार्बन उत्सर्जनातील वाढीमुळे जगभरात समुद्राच्या पातळीतील वाढ सुरूच असल्याने २०५० पर्यंत मुंबई, सुरत, चेन्नई आणि कोलकाता या शहरांतील अनेक भाग पाण्याखाली जातील अथवा सततच्या पुरांमुळे उद्‌ध्वस्त होतील, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

लहरी मान्सूनमुळे भारतात येणाऱ्या पुरांचा मुद्दा या अभ्यासात विचारात घेण्यात आलेला नाही; परंतु या घटकामुळे पूरबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.   

आशियाला सर्वाधिक धोका 
 सर्वाधिक धोका असलेल्या सखल भागातील रहिवाशांपैकी ७० टक्के लोकांचे वास्तव्य भारत, चीन, बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलॅंड, फिलिपिन्स आणि जपान या आठ आशियाई देशांत.

 ‘क्‍लायमेट सेंट्रल’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ बेंजामिन एच. स्ट्रॉस आणि स्कॉट ए. कल्प यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास.

 अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने २००० मध्ये संकलित केलेल्या विदासंचाचा अभ्यासासाठी आधार.

 या तपशिलातील त्रुटी दूर करण्यासाठी कल्प आणि स्ट्रॉस यांच्याकडून कृत्रिम प्रज्ञेचा वापर.

 किनारपट्टीवरील समुद्राच्या वाढत्या पातळीबाबत यापूर्वी केलेल्या अंदाजात उणिवा असल्याचे उघड; जागतिक किनारपट्टीला तिप्पट धोका असल्याचे स्पष्ट.

 भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशांत वास्तव्य असलेल्या तीन कोटी १० लाख नागरिकांना महापुराचा धोका.

 ही संख्या २०५० पर्यंत तीन कोटी ५० लाख आणि २१०० पर्यंत पाच कोटी १० लाखांवर जाण्याची शक्‍यता.    

 वार्षिक पूरसंकटाची शक्‍यता असलेल्या जगातील समुद्रकिनाऱ्यावरील भागांत सध्या २५ कोटी नागरिकांचे वास्तव्य. 

संकटाची तीव्रता तिप्पट
विसाव्या शतकात जगातील समुद्राच्या पातळीत ११ ते १६ सेंटिमीटरने वाढ झाली. जगाने वार्षिक कार्बन उत्सर्जनात मोठी कपात केली, तरी २०५० पर्यंत समुद्राच्या पातळीत आणखी किमान ५० सेंटिमीटर वाढ होईल. या प्रक्रियेचा वेग वाढल्यास, एकविसावे शतक उलटताना समुद्राची पातळी तब्बल दोन मीटरने वाढण्याचीही शक्‍यता आहे. पूर्वीच्या अंदाजापेक्षा समुद्राची पातळी तिप्पट वाढण्याचा अंदाज असला, तरी कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होत असल्याने या संकटाची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता असल्याचे स्कॉट ए. कल्प सांगतात.

जागतिक कार्बन उत्सर्जनात बहुतेक द्वीपदेशांचा वाटा नगण्य असून, ते ‘कार्बन न्यूट्रल’ होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु समुद्राच्या पातळीतील वाढीचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आतापर्यंत वातावरणात झालेले कार्बनचे उत्सर्जन एवढे प्रचंड आहे, की भविष्यात हे प्रमाण शून्यावर आले, तरी किनारपट्टीवरील रहिवाशांपुढील संकट कायमच राहील, असेही ते म्हणतात. 

कार्बन उत्सर्जन
 कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमानात वाढ होत असल्याने ध्रुवांवरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत सतत वाढ.

 ‘इंडियास्पेंड’ या संकेतस्थळावर सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार कार्बन उत्सर्जनात जगात चीन आघाडीवर, त्यानंतर अमेरिका, युरोपीय महासंघ आणि भारत यांचे क्रमांक. 

 दरडोई कार्बन उत्सर्जन कॅनडात सर्वाधिक, त्यानंतर अमेरिका, रशिया आणि जपान यांचे क्रमांक. सर्वांत कमी प्रमाण असलेल्या देशांत भारताचा समावेश.

 वसुंधरा वेगाने तप्त होत असल्यामुळे भारतासमोरील पूर, अनियमित पाऊस आणि वादळांच्या संकटांत वाढीची शक्‍यता.

संयुक्त राष्ट्रांचे आवाहन
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेझ यांनी जागतिक कार्बन उत्सर्जनात २०३० पर्यंत ४५ टक्के कपात करण्याचे आवाहन केले आहे. उर्वरित कार्बन उत्सर्जन जंगले, समुद्र आणि मातीत शोषले जाऊन २०५० पर्यंत शून्यावर आल्यास जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे शक्‍य होईल. 

अस्तित्वासाठी संघर्ष
 मुंबई, सुरत, कोलकाता, चेन्नई या शहरांना अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा अभ्यास अहवालात इशारा. अद्ययावत माहितीनुसार, मुंबईसह अन्य किनारी शहरे, ओडिशाची किनारपट्टी आणि ईशान्येकडील भाग या शतकाच्या मध्यापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्‍यता. 
 भारताला तब्बल ७५०० किलोमीटरची किनारपट्टी असल्यामुळे समुद्राच्या पातळीतील वाढीचा धोका असलेल्या देशांत दुसरा क्रमांक. पहिल्या क्रमांकावरील चीनमध्ये आठ कोटी १० लाख नागरिक धोक्‍याच्या सावटाखाली.    

ध्रुवीय बर्फ वितळणे सुरूच राहणार
जागतिक तापमानवाढीच्या परिणामी ध्रुवीय बर्फ वितळण्याच्या वेगात वाढ झाली आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनात तातडीने मोठी घट झाली, तरी ही प्रक्रिया सुरूच राहील. टेबलावर ठेवलेला बर्फाचा तुकडा लगेच वितळत नाही, त्यासाठी काही वेळ लागतो. तसेच काहीसे आर्क्‍टिक आणि अंटार्क्‍टिक भागांतील हिमखंडांबाबत घडत असल्याचे वैज्ञानिक सांगतात. 

स्थलांतर वाढणार
महासागरांच्या तापमानात वाढ झाल्यामुळे चक्रीवादळांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता टेरी (द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) स्कूल ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेतील सहयोगी प्राध्यापक अंजल प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. आगामी दशकांत अशा नैसर्गिक संकटांची तीव्रता वाढेल, असेही ते म्हणतात. समुद्राचे खारे पाणी भूभागात दूरपर्यंत शिरल्यामुळे शेतजमीन नापीक होते. विशेषत: ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमध्ये हे प्रमाण वाढीस लागले असून बांगलादेशात तर ही समस्या भयावह झाली आहे. 

उपाय आहे का?
जगातील तब्बल ११ कोटी आणि भारतातील एक कोटी ७० लाख नागरिक समुद्राच्या भरती रेषेखालील भागांत राहतात. समुद्राच्या पाण्याला थोपवण्याच्या हेतूने काही ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. या उपाययोजनेमुळे अशा खोलगट भागांत वास्तव्य करता येईल; परंतु मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करणे अत्यंत कठीण होईल. म्हणजेच हा उपाय अतिशय खर्चिक ठरेल, असे शास्त्रज्ञच सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com