"टीम इंडिया' परिपूर्णतेकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

गेल्या दोन वर्षांत श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि मायदेशात या संघाने हुकूमत मिळवली आणि पहिल्या क्रमांकाचा लौकिक मिळवला. आता पुढील काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे गड सर केले की, खऱ्या अर्थाने अजिंक्‍यवीर होण्याची संधी असेल

दोन वर्षांपूर्वी ज्या श्रीलंकेतून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची मोहीम सुरू केली तेथेच आता परदेशात प्रथमच व्हाइटवॉश देण्याचा पराक्रम भारताच्या "विराट सेने'ने केला. चॅंपियन्स करंडक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर प्रशिक्षकपदावरून झालेल्या वादाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. याचे कारण व्यावसायिकता. ती आता प्रत्येक खेळाडूत तयार झाली आहे.

दोन वर्षांपूर्वीचा श्रीलंकेचा संघ आणि त्यांचा आत्ताचा संघ यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असला तरी भारताच्या ऐतिहासिक यशाचे महत्त्व कमी होत नाही. शेवटी प्रतिस्पर्धी कोणता असला, तरी तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार खेळ करावा लागतो. उसेन बोल्टही सर्वश्रेष्ठ होता; परंतु त्याला त्याच्या अखेरच्या शर्यतीत न्याय देता आला नाही हे वास्तव आहे. कसोटी क्रमवारीतील पहिला क्रमांक मिळवल्यावरची स्पर्धा प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वतःशी असते. आत्ताचा हा संघ सर्व निकषांवर तरबेज झाला आहे.

शिखर धवन याला मुळात संघात स्थान नव्हते. तो धवन मालिकेत सर्वोत्तम होण्याचे शिखर गाठतो. गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल असलेला रवींद्र जडेजा अखेरच्या सामन्यात बंदीमुळे खेळू शकत नव्हता आणि त्याच्याऐवजी संधी मिळालेला कुलदीप यादवही तेवढाच प्रभावी ठरतो, याचाच अर्थ हा संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाही. मैदानावर असलेले अकराच खेळाडूच मॅचविनर नाहीत तर संघाबाहेर असलेले राखीव खेळाडूही तेवढच्या क्षमतेचे आहेत. हीच "टीम इंडिया'ची ताकद.फलंदाजीबाबत भारताला कधी चिंता नव्हती, वेगवान गोलंदाजीत मात्र पीछेहाट होत होती. आता एक नव्हे तर उमेश यादव, महंमद शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह असे पाच गोलंदाज तयार झालेले आहेत. बुमराह आणि भुवनेश्वर असे दोन गोलंदाज एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळे काढू शकतो, एवढी मोकळीक यायाधी कधीच मिळाली नव्हती. त्यात आता हार्दिक पंड्याच्या रूपाने अष्टपैलू मिळाला आहे. गोलंदाजीत सुधारणा केली तर "कपिलदेव' होण्याचा त्याच्यामध्ये क्षमता आहे. थोडक्‍यात "टीम इंडिया'ची वाटचाल परिपूर्णतेकडे होत आहे.

गेल्या दोन वर्षांत श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि मायदेशात या संघाने हुकूमत मिळवली आणि पहिल्या क्रमांकाचा लौकिक मिळवला. आता पुढील काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे गड सर केले की, खऱ्या अर्थाने अजिंक्‍यवीर होण्याची संधी असेल.

Web Title: india cricket virat kohli