झळाळते यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची ‘संगीतखुर्ची’ थांबली, तशी संघाच्या कामगिरीचा सूर कायम राहिला. ऑलिंपिक पात्रता आणि त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेतील आश्‍वासक कामगिरी, चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील उपविजेतेपद, आशियाई चॅंपियन्स विजेतेपद... वरिष्ठ संघाची ही कामगिरी याचेच उदाहरण म्हणता येईल. त्याला आता कुमार संघाच्या विश्‍वकरंडक विजेतेपदाची जोड मिळाली. भारताने हॉकीमध्ये अनुभवलेले सुवर्णक्षण परत मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यासाठी परदेशी प्रशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली. पण, प्रत्येक वेळी नव्या प्रशिक्षकपदाचे धोरण आणि ‘हॉकी इंडिया’ यांचे काही पटले नाही.

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची ‘संगीतखुर्ची’ थांबली, तशी संघाच्या कामगिरीचा सूर कायम राहिला. ऑलिंपिक पात्रता आणि त्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेतील आश्‍वासक कामगिरी, चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील उपविजेतेपद, आशियाई चॅंपियन्स विजेतेपद... वरिष्ठ संघाची ही कामगिरी याचेच उदाहरण म्हणता येईल. त्याला आता कुमार संघाच्या विश्‍वकरंडक विजेतेपदाची जोड मिळाली. भारताने हॉकीमध्ये अनुभवलेले सुवर्णक्षण परत मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यासाठी परदेशी प्रशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली. पण, प्रत्येक वेळी नव्या प्रशिक्षकपदाचे धोरण आणि ‘हॉकी इंडिया’ यांचे काही पटले नाही. त्यामुळे भारतीय हॉकीचे पाऊल पुढे पडण्याची चिन्हे दिसत नव्हती. 

रोएलॅंट ऑल्टमन्स यांची भारतीय हॉकी संघाच्या हाय परफॉर्मन्स संचालकपदी नियुक्ती झाली, तेव्हापासून भारतीय हॉकीमध्ये जरा स्थिरता आली. तरीही प्रशिक्षक हे पद कळीचे ठरत होते. ऐन ऑलिंपिकच्या काळातही भारतीय हॉकी संघ प्रशिक्षकाविना होता. तेव्हा प्रशिक्षकपदाची धुरा ऑल्टमन्स यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. वरिष्ठ आणि कुमार अशा दोन्ही संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे सूर खऱ्या अर्थाने जुळले. हॉकी संघाच्या प्रगतीसाठी नेमके हेच हवे होते. त्याची फळे मिळू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉकी इंडिया लीगचे अस्तित्व यात महत्त्वाचे ठरले. लीगमुळे अनेक कुमार खेळाडूंना अनुभवाच्या पहिल्या पायरीवरच आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची आणि प्रशिक्षकांबरोबर राहण्याची संधी मिळाली. त्यामुळेच कुमार खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवताना कमी- अधिक प्रमाणात प्रगल्भ वाटू लागले. त्याचीच सर्वांत मोठी पावती म्हणजे कुमार विश्‍वविजेतेपद. हे विजेतेपद म्हणजे कष्टाची पावती असली, तरी ती भविष्यातील हॉकीच्या प्रगतीची चाहूल आहे. आजपर्यंत भारतीय छोट्या- मोठ्या विजयावर समाधान मानत होते. पण, खेळाडूंची ही अल्पसंतुष्ट भावना ऑल्टमन्स यांनी मोडून काढली आणि ‘आपल्याला अजून काही तरी मिळवायचे आहे, त्यादृष्टीने खेळा’ ही भावना त्यांच्यात बिंबवली. खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी ऑल्टमन्स यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. त्यामुळेच विजेतेपदानंतर या खेळाडूंनी ‘ही तर सुरवात आहे, आम्हाला अजून खूप काही मिळवायचे आहे’, ही व्यक्त केलेली भावना खूप काही सांगून जाते.

Web Title: india hockey team