मोदीसत्ताक!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

विरोधकांना अक्षरशः भुईसपाट करून मोदी यांनी तीन वर्षांनंतरही आपल्या करिष्म्याची चकाकी कायम ठेवण्यात यश मिळविले; परंतु सर्वसामान्य जनतेला "अच्छे दिन' अनुभवायला मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार असेच चित्र आहे.

नरेंद्र मोदी नावाचा "मसीहा' हाच आपला तारणहार आहे, या भावनेतून चार वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली, तेव्हा त्यामुळे भारताचे राजकीय नेपथ्य आरपार बदलून जाणार आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. भाजपच्या या निर्णयास लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी अशा अनेकांचा विरोध होता. तरीही तो निर्णय झाला आणि मोदी यांनीही पक्षाने आपल्यावर टाकलेल्या विश्‍वासाचे चीज करून दाखवले!

अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या अद्‌भुत "करिष्मा' असलेल्या नेत्याला जे जमले नव्हते, ते मोदी यांनी करून दाखवले आणि भाजपला एकहाती पूर्ण बहुमतासह सत्ता मिळवून दिली. हा चमत्कारच होता आणि तो प्रत्यक्षात आणण्यात मोदी यांनी 2014 च्या रणरणत्या उन्हाळ्यात केलेले जिवाचे रान आणि भाजपने राबवलेली अत्याधुनिक प्रचारमोहीमही कारणीभूत होती.

'बाहुबली' मोदी सरकारचे वॉलपेपर डाऊनलोड करा

मोदी यांनी देशातील "सवासो करोड' जनतेला "अच्छे दिन' नावाचे स्वप्न दाखवले आणि लोक त्या पुंगीवाल्याच्या गोष्टीप्रमाणे त्यांच्या मागून जाऊ लागले! आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली; पण मोदी यांचा तो करिष्मा तसाच कायम आहे, हे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींनी दाखवून दिले आहे. या तृतीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या अनेक पाहणी अहवालांतूनही तेच वास्तव सामोरे आले आहे. मोदी यांनी आपल्या घणाघाती वक्‍तृत्वाने देशवासीयांवर घातलेली मोहिनी इतकी जबरदस्त होती की, तीन वर्षांपूर्वी मोदी यांनी उठवलेल्या वादळात विरोधी पक्ष पालापाचोळ्यासारखे कुठच्या कुठे उडून गेले! या प्रचारमोहिमेत मोदी यांना अमित शहा यांची जबरदस्त साथ लाभली आणि निवडणुका जिंकण्याचे एक नवेच समीकरण त्यांनी भारतीय राजकारणात आणले. त्यामुळेच नवी दिल्ली आणि बिहार या दोन विधानसभांचा अपवाद वगळता मोदी-शहा जोडी भाजपला सातत्याने भरभरून यश देत गेली.

भारताच्या पंतप्रधानपदी मोदी यांची झालेली निवड ही केवळ देशाच्या गेल्या सहा-सात दशकांच्या राजकीय शैलीलाच नव्हे तर विचारपरंपरेलाही सर्वार्थाने शह देणारी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशवासीयांना आधुनिक जीवनशैली तसेच विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्वप्न दाखवले होते. "डिस्कव्हरी ऑफ इंडिया'सारखा अनमोल ग्रंथ लिहिणाऱ्या नेहरूंना प्राचीन भारतीय परंपरा आणि देशाची बहुविविधतेने नटलेली संस्कृती याबद्दल कमालीचा अभिमान होता; पण त्यांच्या मनात स्वप्न होते ते भारताला प्रगत आणि सामर्थ्यवान देश बनवण्याचे!

खरे तर मोदी यांच्या "सब का साथ; सब का विकास!' या घोषणेमागील सूत्रदेखील तेच होते; पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच उभे राहत आहे. स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटीज, डिजिटल इंडिया अशा अनेक योजना मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत पुढे आणल्याही; पण प्रत्यक्षात मोदीप्रेमाने मोहित झालेली भक्‍तमंडळी देशाला पुराणयुगातच घेऊन जाणार आहेत की काय, असा प्रश्‍न तथाकथित गोरक्षकांनी चालवलेल्या दंडेलीमुळे उभा ठाकला आहे.

हजार-पाचशेच्या नोटबंदीचा निर्णय हा मोदी यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वांत धाडसी निर्णय होता आणि त्यामुळे मोठे वादंग उभे राहिल्यानंतरही मोदी यांच्या करिष्म्याने त्यावर मात केली आणि त्यानंतरच्या निवडणुकांतही भरभरून यश मिळवले. मोदी यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा निर्णय हा "जीएसटी'ला मंजुरी हा आहे आणि त्यामुळे देशाची करप्रणालीच बदलून जाणार आहे. याच "जीएसटी'ला मोदी आणि भाजप यांनी विरोधी बाकांवर असताना विरोध केला होता तर "स्वच्छ भारत' योजना ही कॉंग्रेसप्रणीत सरकारच्या "निर्मल भारत' योजनेचेच नव्याने पावडर-कुंकू करून पुढे आणलेले नवे रूपडे आहे, हे विसरता येणार नाही. त्याच वेळी काळे धन मोदी हे विदेशातून परत कधी आणणार, याचीही वाट जनता पाहत आहे.

मोदी यांचे काही निर्णय वादग्रस्तही ठरले आणि त्यावरून विरोधकांनी रान उठवण्याचा प्रयत्नही जरूर केला. "आयपीएल' क्रिकेट मालिकेचा तथाकथित बादशहा ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचे सरकारला हूल देऊन झालेले परदेशगमन आणि मुख्य म्हणजे काश्‍मीर प्रश्‍न सोडवण्यात आलेले संपूर्ण अपयश तसेच पाकिस्तानबरोबरचे धरसोडीचे धोरण हे मोदी सरकारवर ठपका ठेवणारेच आहे.

मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर कॉंग्रेस ही झडझडून उभी राहिलीच नाही आणि त्यामुळे मोदी तसेच भाजप यांच्यापुढे राजकीय आव्हानच शिल्लक राहिले नाही. खरे तर मोदी यांच्यासारख्या खेळाडूला तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी सामोरा असता, तर कदाचित आवडलाही असता! नियतीने मात्र वेगळेच फासे टाकले आणि मोदी यांचे "कॉंग्रेसमुक्‍त भारता'चे स्वप्न साकार करण्यास कॉंग्रेसच जातीने हातभार लावत आहे की काय, असा प्रश्‍न आज जनतेच्या मनात उभा आहे. अर्थात, कॉंग्रेसमधील नेत्यांना आणि विशेषत: "डागी' नेत्यांनाच भाजपमध्ये आणून हे स्वप्न साकार केले जात आहे की काय, असा प्रश्‍नही निवडणुका जिंकण्याच्या तंत्रात कमालीचे यश मिळवल्याने पुढे आला आहे. त्यामुळेच पुढचे वर्ष हे या सरकारच्या आश्‍वासनपूर्तीसाठी कळीचे वर्ष आहे; कारण त्यानंतर थेट निवडणुकांचेच वारे वाहू लागेल, हे मोदी यांच्यासारख्या धूर्त नेत्याच्या ध्यानात आले असेलच!

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:

घोषणा झाल्या, आता प्रतीक्षा अंमलबजावणीची!

निम्मे पुणेकर नोटाबंदीवर खूश!

हायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य

शेतकऱ्यांना न्याय देण्यात मोदी सरकारला अपयश - राजू शेट्टी

घोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच

Web Title: India News Maharashtra News Modi Cabinet Modi Sarkar Narendra Modi BJP Government Sakal esakal