मैत्रीच्या आणाभाकांचा उपचार (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

इम्रान खान यांनी पाकिस्तानची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पण नवा सत्ताधीश आला म्हणून संबंधांत आमूलाग्र बदल होईल असे नाही आणि याची कारणे पाकिस्तानच्या व्यवस्थेतच आहेत.

इम्रान खान यांनी पाकिस्तानची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पण नवा सत्ताधीश आला म्हणून संबंधांत आमूलाग्र बदल होईल असे नाही आणि याची कारणे पाकिस्तानच्या व्यवस्थेतच आहेत.

भारत आणि पाकिस्तान या सख्ख्या शेजारी देशांपैकी कोठेही सत्तांतर झाले की पहिला प्रश्‍न उभा राहतो तो आता या दोन देशांमधील संबंध कसे राहतील, हाच! पाकिस्तानात गेल्या आठवड्यात सत्तांतर झाले आणि शनिवारी इम्रान खान यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाल्यावरही हीच चर्चा सुरू झाली असली, तरी दोन्ही देशांनी या निमित्ताने सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्याच्या आशा पुन्हा प्रज्वलित झाल्या आहेत. मात्र या आशेला अनेक परिमाणे आहेत आणि पाकिस्तानमधील निवडणुका पार पडल्या असल्या तरी भारतातील निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या चर्चेला अपेक्षेप्रमाणेच राजकीय वळणही लागले आहे. इम्रान यांचा शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पत्र पाठवून, दोन्ही देशांमध्ये ‘अर्थपूर्ण, तसेच सकारात्मक संपर्का’ची गरज प्रतिपादन केली. मात्र, त्यावर लगेचच पाकिस्तानचे नवनिर्वाचित परराष्ट्रमंत्री शाह महंमद कुरेशी यांनी जणू आपणच बाजी मारल्याच्या थाटात, पाकिस्तानबरोबर भारत चर्चेला तयार असल्याचे वक्‍तव्य केले. त्यानंतर भारताने ‘सकारात्मक संपर्क’ याचा अर्थ ‘चर्चेला तयारी’ असे नसल्याचे खडसावल्यावर पाकिस्तानला घूमजाव करणे भाग पडले! आता दस्तुरखुद्द इम्रान यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचे, त्यांनी केलेल्या ‘ट्विट’मुळे स्पष्ट झाले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष टाळण्याचा, संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे. मात्र या संघर्षाचे मूळ असलेल्या दहशतवादाबद्दल त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. पण सामंजस्याची त्यांची भाषा आणि इरादे यांना तेथील लष्कर किती साथ देणार, हा खरा प्रश्न आहे. लष्कराच्या पाठबळावर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इम्रान यांना सतत लष्कराकडे पाहताच कारभार करावा लागणार आहे. तेव्हा द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी उभय देशांनी ठोस पावले टाकली नाहीत, तर मैत्रीच्या या आणाभाका उपचारच ठरण्याची शक्‍यता आहे.

मात्र, या साऱ्या घडामोडी होत असताना, भारतीय जनता पक्षाने ही चर्चा आपल्याला हव्या त्या दिशेने नेण्यासाठी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीचे आणि तेथे त्यांनी पाक लष्करप्रमुखांच्या घेतलेल्या गळाभेटीचे भांडवल केले आहे. सिद्धू यांना इम्रान यांनी शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले होते आणि तेही त्यांना एकट्याला नव्हते! कपिल देव, सुनील गावसकर यांनाही इम्रान यांनी आमंत्रणे दिली होती. पैकी फक्‍त सिद्धूच या सोहळ्यास उपस्थित राहिले. त्यांना पाकिस्तानला जाण्याची परवानगी भाजपच्याच सरकारने दिली होती आणि तेथे जाऊन त्यांनी कोणतेही बेकायदा कृत्य केलेले नाही. खरे तर मोदी यांना जे ‘सकारात्मक वा अर्थपूर्ण सहकार्य’ हवे आहे, त्याच्या पूर्वतयारीचेच एक पाऊल सिद्धू यांच्या या भेटीमुळे उचलले गेले, असे म्हणता येईल. तरीही आता भाजप नेते आणि सोशल मीडियावरील त्यांचे भक्‍तगण यांनी यावरून निष्फळ वाद उभा करून, भाजपला निवडणुकीच्या राजकारणासाठी हव्या असलेल्या तथाकथित ‘राष्ट्रवादा’चे ढोल वाजविले आहेत. सरकारच्या परवानगीने पाकिस्तानात गेलेल्या सिद्धू यांना त्या सरकारने नेमके पाकव्याप्त काश्‍मीरच्या प्रमुखाशेजारची जागा दिली. अर्थात, त्यामागेही पाकिस्तानचे काही हेतू असणारच! मग सिद्धू यांनी तेथून उठून जायला हवे होते काय? की पाक लष्करप्रमुखांनी हात पुढे केल्यावर, तो नाकारायला हवा होता? शिवाय, सिद्धू यांनी त्यांची गळाभेट का घेतली, असा प्रश्‍न विचारणाऱ्यांनी नवाज शरीफ यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यास अचानक जाऊन, मोदी यांनी घेतलेल्या त्यांच्या गळाभेटीबद्दल मात्र मिठाची गुळणी धरली आहे! अर्थात, इम्रान यांनाही हा वाद जितका चिघळेल, तितका हवाच आहे, असे त्यांनी केलेल्या आणखी एका ‘ट्‌विट’मुळे दिसते. त्यांनी सिद्धू यांचे वर्णन ‘शांतिदूत’ असे केले असून, पाक जनतेने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, असे आवर्जून नमूद केले आहे.

गेल्या चार दिवसांतील या वेगवान घडामोडी, तसेच दोन्ही नेत्यांची वक्‍तव्ये लक्षात घेता, दोन्ही देशांना नेमका रस कशात आहे, शांतता आणि संवाद यांत की राजकीय उखाळ्यापाखाळ्या यांत असा प्रश्‍न पडू शकतो. अर्थात, भाजपचे खरे ‘लक्ष्य’ सिद्धू नसून, त्यांचे सारे बाण हे काँग्रेस व राहुल गांधी यांच्या दिशेने रोखलेले आहेत. त्यांना सिद्धू यांच्या पाकभेटीबद्दल राहुल यांनाच धारेवर धरून आम्हीच ते कसे खरे ‘राष्ट्रभक्‍त’ हे दाखवून द्यायचे असल्यामुळे हे वादळ उभे करण्यात आले आहे, हे उघड आहे. त्यात मग भारत-पाक संबंधांची आहुती पडली तरी त्याची त्यांना फिकीर नाही, हेच खरे!

Web Title: india pakistan relation and imran khan editorial