पाकिस्तानला भारताचा काटशह

डॉ. राजेश खरात (प्रमुख- दक्षिण आशियाई केंद्र, जेएनयू)
शुक्रवार, 19 मे 2017
कथित हेरगिरीच्या आरोपांखाली अटकेत असणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी भारत आजवर काहीच करू शकत नव्हता. आता ते चित्र बदलल्याचे कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात दिसून आले आहे. आता आव्हान आहे ते त्यांना सुखरूप मायदेशी आणण्याचे.
डॉ. राजेश खरात
(प्रमुख- दक्षिण आशियाई केंद्र, जेएनयू)

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे. भारताच्या राजनैतिक प्रयत्नांना या निकालाने यश मिळाले. जाधव यांच्याशी भारतीय उच्चायुक्तालयाला संपर्क साधू द्यायला हवा होता, हा भारताचा मुद्दा न्यायालयाने उचलून धरला. थोडक्‍यात, या निकालाने पाकिस्तानचा दांभिकपणा जगाच्या चावडीवर आणता आला.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतून हेरगिरीच्या कारवाया स्वातंत्र्यापासून आजतागायत चालूच आहेत. एखाद्या देशातील नागरिक दुसऱ्या देशात गेल्यावर हेरगिरी करत होता, असे पुराव्यानिशी सिद्ध करणे सहसा अवघडच असते. अशा परिस्थितीत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सीमेवरील आणखीन एक देश इराण येथून पकडून बलुचिस्तानमध्ये पकडल्याचा जो कांगावा केला आहे, तो खोटेपणाचा कळस म्हणावा लागेल. सत्य काय आहे जगाला माहीत असूनही पाकिस्तानी लष्कराने "राष्ट्रीय सुरक्षिततेस धोका' हे कारण पुढे करून त्यांचे "कोर्ट मार्शल' केले आणि फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात पाकिस्तान जाधव यांना फाशी देण्याची शक्‍यता नाही. 2009 मध्ये इजिप्तमधील शर्म-एल- शेख या ठिकाणी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बलुचिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भारतातील कोणतेही सरकार आपल्या नागरिकास हेरगिरी करण्यासाठी बलुचिस्तानमध्ये पाठविण्याचा अविवेकी विचार करणार नाही. त्यामुळे या खोटेपणाच्या मुळाशी भारतद्वेष आहे आणि पाकिस्तानमधील सरकार; विशेषतः लष्कर यांनी वर्चस्व अबाधित राखण्यासाठी तो कायम तेवता ठेवला आहे, हे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले.

या सगळ्यातून पाकिस्तानला नेमके काय साध्य करायचे आहे, याची उकल आणि चर्चा होणे आवश्‍यक आहे आणि त्यानंतरच पाकिस्तानबाबत भारताने आपले परराष्ट्रीय धोरण आखणे व राबविणे हे जास्त सयुक्तिक असेल. अन्यथा आतापर्यंत किती गुप्तहेर पाकिस्तानमध्ये पकडले गेले असतील आणि त्यांची विल्हेवाट पाकिस्तानने परस्पर लावली असेल याची गणती नाही. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपांखाली अटकेत असणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी भारत काहीच करू शकत नव्हता किंवा हतबल होता हेच काय सत्य होते आणि दुर्दैवदेखील. पंजाबमधील सरबजीत हे ताजे उदाहरण. पण आता परिस्थिती वेगळी आहे. राजनैतिक पातळीवर आपण जोरदार प्रयत्न करू शकतो. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले आणि आंतरराष्ट्रीय लवादासमोर हिरिरीने आणि निडरपणे भारताची बाजू मांडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वकील हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधवांच्या निमित्ताने पाकिस्तानच्या इभ्रतीचा पंचनामाच जगभरात मांडला. (हे दोघेही मराठीच आहेत. मोठ्या उद्दिष्टासाठी त्यांनी एकत्र येणे हा एक सुखद योग.)

कुलभूषण जाधव यांच्या अटकेस भारत-पाकिस्तान संबंधात महत्त्व प्राप्त झाल्याची काही कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे कुलभूषण यांची भारतीय नौसेनेतील एक माजी अधिकारी ही ओळख; तसेच सैनिकी व पोलिस सेवेची त्यांच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी. दुसरे असे की, त्याच काळात म्हणजे एप्रिल 2016 मध्ये बलुची क्रांतिकारी चळवळीच्या प्रमुख नेत्या प्राध्यापक श्रीमती नेईला काद्री बलोच भारतात येऊन बलुचिस्तानात होणाऱ्या मानवी हक्कांचे उल्लंघनाविषयी जनमत तयार करीत होत्या. एव्हढेच नव्हे, तर भारताने या विषयांत लक्ष घालून बलुचिस्तानास स्वतंत्र करावे अशी विनवणी विविध कार्यक्रमांतून त्यांनी केली. काही दिवसांनी, परदेशी पत्रकारांना "मला कुत्रे म्हणा; पण पाकिस्तानी म्हणून संबोधू नका' असे सांगणारा दुसरा बलुची नेता मजलिस माझीद बलोच जगाच्या राजकारणात "हिरो' ठरला. त्याने तर पाकिस्तानची आणखीनच नाचक्की झाली. नेमक्‍या याच वेळी पाकिस्तानने कुलभूषण यांची अटक जाहीर करून "जशास तसे' उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि ही बातमी देऊन त्या देशाने भारतास शह दिल्याचा आव आणला. तिसरे असे की पाकिस्तात जो भारतद्वेष आहे, त्यात तेल ओतून स्थानिक राजकारणातील सत्तेची समीकरणे मांडण्यासाठी कुलभूषण जाधव यांचा उपयोग केला जाऊ शकतो. भारतात दहशतवादी कारवाया करून पाकिस्तानात आश्रयास असणारा अझर मसूद आणि त्याच्यासारखे असे कितीतरी दहशतवादी भारत सरकारला हवे आहेत, त्यासाठी भारत सातत्याने दबाव आणत आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या विरोधात काम करणारेदेखील पाकिस्तानच्या ताब्यात आहेत, अशी भूमिका घेतल्यामुळे निर्वाचित नवाझ शरीफ सरकारवर पाकिस्तान लष्कराची पकड आणखीन मजबूत होण्यास मदत होईल. चौथे कारण म्हणजे दक्षिण आशियायी राजकारणात स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताचा वरचष्मा राहिलेला आहे. जाधव यांच्या अटकेचा मुद्दा लावून ठेवल्यामुळे शेजारील छोटी छोटी राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय पटलावर भारताच्या नावलौकिकास काळिमा फासण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

जगाच्या राजकारणात पाकिस्तानची एक प्रतिमा ही अपयशी राष्ट्र म्हणून आहे. ती प्रतिमा पुसट करण्यासाठी जगातील इतर राष्ट्रांची सहानुभूती आवश्‍यक आहे. जाधवांच्या निमित्ताने पाकिस्तान जगाकडून सहानुभूतीची आस लावून बसला होता; मात्र भारताने जाधवांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊन पाकिस्तानची पुरती कोंडी केली. आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय वेगळा लागला असता तरी पाकिस्तानने जाधव यांना फाशी दिली नसती. कारण या फाशीमुळे पाकिस्तानची घटनात्मक राष्ट्र म्हणून जी प्रतिमा आणि उरलीसुरली विश्वासार्हता संपुष्टात येईल. आणि तसे काही झाले तर जगभरातून पाकिस्तानची निंदानालस्ती होईल. अमेरिका व युरोपियन देशांकडून विकासासाठी येणाऱ्या आर्थिक स्त्रोताचा मार्ग खुंटू शकेल. तसेच भारतावर बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून असलेली काही इस्लामिक राष्ट्रेही पाकिस्तानला वेगळे पाडू शकतील. चीनसारखा देश मानवी हक्कांना राष्ट्रहितासमोर नगण्य मानत असला तरी पाकिस्तानमध्ये कैदेत असणाऱ्या व्यक्तीस केवळ संशयावर आधारित फासावर लटकविण्याच्या निर्णयाला कदापि दुजोरा देणार नाही. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचा कल हा जाधव यांचा सरबजीत करण्याकडे असेल; पण
त्यामुळेच जाधव यांना सुखरूपपणे मायदेशी आणणे, हे भारतासमोर कडवे आव्हान आहे. त्यात भारताची कसोटी लागणार आहे.

Web Title: India triumphs